विजेचा शॉक बसून कुणी बेशुद्ध पडले तर हे ९ उपाय तुम्ही नक्की करू शकता !!

स्रोत

अक्षय खन्नाचा ‘हंगामा’ बघितला असेल, तर त्यातला हा सीन बघताना तुम्ही पोट धरून हसले असाल. हंगामाच नव्हे तर इतर बऱ्याच चित्रपटात विजेच्या तारेला चिकटणे हा एक विनोदाचा विषय झाला आहे. परंतु हा विषय अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. गेल्या काही महिन्यात मुंबईत गगनचुंबी इमारतींना लागलेल्या आगी यांचं मूळ कारण इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट आहे. आपल्या देशात सिंगल फेज करंट २२० व्होल्टचा असतो, तर थ्री-फेज करंट ४१५ व्होल्टचा असतो. हे दोन्ही प्राणघातक आहेत.

तुमच्या आसपासच्या परिसराचा आढावा घेतला, तर असे लक्षात येईल की विजेचा धक्का बसलेल्या माणसावर प्रथमोपचार काय करावा हे कोणालाच माहित नसते. थोडक्यात शॉक हा हसण्यावारी नेण्याचा विषय नाही. 

स्रोत

महाराष्ट्र शासनाने ११ ते १७ जानेवारी हा विद्युत सुरक्षा साप्ताह जाहीर केला आहे. बहुतेक सर्व सार्वजनिक ठिकाणी विद्युत सुरक्षेचा संदेश देणारी पत्रकं आणि पोस्टर्स उपलब्ध करून दिली आहेत. या पत्रकातील महत्वाचा भाग म्हणजे “विजेचा धक्का बसून बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीवर करायचे उपचार.” बोभाटाच्या वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

१. सुरुवातीचे उपाय विजेचा धक्का बसून बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीचे कपडे आगीमुळे जळत असल्यास पहिल्याप्रथम आग विझवावी. त्यानंतर अपघातग्रस्ताच्या तोंडात कवळी, पान-तंबाखू असल्यास ती काढून टाकावी. अपघातग्रस्ताचा श्वासोच्छवास चालू असल्याची खात्री करून घ्यावी नि त्यास ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यावे अथवा डॉक्टरला बोलवावे.
२. अपघातग्रस्त व्यक्तीचा श्वासोच्छवास बंद पडल्याचे दिसून आले तर शक्यतोवर भाजण्यामुळे झालेल्या जखमांवर त्याच्या शरीराचा भार न पडेल अशा तर्हेने त्यास पालथे झोपवावे.
३. अपघातग्रस्ताचा चेहरा  छातीच्या बाजूला झुकवून अवस्थेत एका बाजूस करून हात व खांदे डोक्याच्या बाजूस सपाट ठेवून त्याच्या खांद्यावर थोपटून त्याची जीभ मुखात मोकळी असल्याची खात्री करावी व त्यास पोटावर झोपवावे. 

स्रोत
४. सोबतच्या चित्रात दर्शविल्याप्रमाणे अपघातग्रस्तावर ओणवे व्हावे. त्याच्या पाठीवर छातीच्या पिंजऱ्याला बरगड्याच्या मागील बाजूच्या छोट्या भागावर दोन्ही हातांचे पंजे ठेवावे. हातांचे अंगठे जवळजवळ एकमेकांस स्पर्शतील व हाताची बोटे खालच्या बरगड्यांवर पसरून राहतील अशी ठेवावीत.
५. आता हलकेच शांत चित्ताने पण दृढपणे अपघातग्रस्तावर ओणवे होऊन दोन सेकंदभर खालच्या दिशेने एकसारखा दाब वाढवत जावे. 
६. नंतर सोबतच्या चित्रानुसार हात न हलवता हलकेच मागील बाजूस झुकून हळूहळू दाब कमी करावा व दोन सेकंदाने वरील पहिली कृती पुन्हा करावी. 

स्रोत
७. वरील दोन्ही कृती सतत चालू ठेवाव्यात. ह्या कृती एका मिनिटात पंधरा ते सोळा वेळा होतील याची काळजी घ्यावी. 
८. असे करण्यामागे अपघातग्रस्ताच्या फुफ्फुसाचे आकुंचन व प्रसारण होत राहून कृत्रिमपणे व मंदपणे श्वासोच्छवास चालू रहावा हाच हेतू असतो.
९. नैसर्गिकपणे श्वासोच्छवास चालू होई पर्यंत ही क्रिया चालू ठेवणे आवश्यक ठरते. अर्ध्या ते एक तासात या कृत्रिम श्वासोच्छवासाचा इच्छित आणि अपेक्षित परिणाम दिसून येईल.  

 

अधिक माहितीसाठी संपर्क करा :
श्री. सु. रा. बागडे (मुख्य विद्युत निरीक्षक)
०२२-२५२७४६१३

सबस्क्राईब करा

* indicates required