९०,००० हून अधिक सदस्य असलेला हा पाककला आणि आरोग्याला वाहिलेला फेसबुक ग्रुप पाहिलात का?

असं म्हणतात चार बायका एकत्र येणं फारच अवघड आहे आणि ते ही स्वयंपाकघरात!!! बापरे बाप!!  स्वयंपाक कसा करायचा याबद्दल प्र्त्येकीचं वेगळं मत, प्रत्येकीची पाककृती वेगळी.. अगदी फोडणीत काय आणि कोणत्या क्रमानं घालायचं, यावर पण मोठी युद्धं होऊ शकतात.  थोडक्यात काय, एकीची  दिशा पूर्व तर दुसरीची पश्चिम!! आणि आजच्या नोकरी-करियरच्या काळात  बऱ्याच स्त्रिया आणि मुलींना तर स्वयंपाकाला बरेचदा वेळच मिळत नाही. मग काय, रेस्टॉरंटला फोन लावला आणि मागवले काय हवे ते!!!

बाकी, स्वयंपाकाची आवड असणाऱ्या सुगरणी आणि सुगरणे यांच्यासाठी सोशल नेटवर्किंगवरही भरपूर ग्रुप्स तयार झालेत.  त्यातपण एका ग्रुपवरून उचल आणि  दुसऱ्या समूहावर स्वतःच्या नावाने टाक...असे ही भरपूर समूह आहेत,  पण "रुचिरा आणि सौंदर्य" अर्थातच "खाणार त्याला चवीचे देणार "या समूहाची बातच और आहे. या समूहावर १०-१५ हजार नाही तर चक्क ९० हजार महिला आहेत. एक मात्र आहे की इतक्या महिला एकत्र असूनही मतभेद किंवा मनभेद नाही.इथे सर्वांच्या विचारांचे स्वागत होते, एकच पदार्थ करायच्या खूप पद्धती मिळतात. 

रेसेपी बिघडली ?? काही हरकत नाही.  टाका पाहू फोटो. बघूया काय झाले रेसेपीला? असं हसत म्हणणारी भाग्यश्री यंगलवार-बंडीवार अशी तरुण महिला या समूहाची ऍडमिन बरं का!!! भाग्यश्री मूळ नागपूरची आणि सध्या पुण्याला असते. भाग्यश्रीच्या स्वतः योग साधना करते. ती एक उत्तम ब्युटीशीयन असून सुगरण आहे, तिच्या पाककृती लोकांना खूप आवडतात. ती दुसऱ्यांच्या कुठल्याही रेसेपी इथे स्वतःच्या नावाने टाकलेलं अजिबात खपवून घेत नाही.  ज्याचं क्रेडिट त्याला दिलेच पाहिजे असं ठामपणे सांगत असते. 

भाग्यश्रीने २०१५ मध्ये वैदर्भीय पदार्थ घराघरात पोहोचावे म्हणून रुचिरा समूह स्थापित केला आणि त्याचबरोबर दिवसभर स्वयंपाकघरात असणाऱ्या स्त्रियांचे सौंदर्य जपता यावे  म्हणून रुचिरा बरोबरच सौंदर्य हा विषय देखील निवडला. समूह सुरू केला तेव्हा अगदी बोटांवर मोजता येतील इतक्याच महिला होत्या.  पण आज बघता बघता ९० हजार महिला तिथं आहेत!!! अगदी तारुण्यात पदार्पण केलेल्या मुलींपासून आपल्या संसाराचे कितीतरी सोहळे साजऱ्या करणाऱ्या महिलासुद्धा आहेत या समूहावर. या साऱ्या अनुभवाचे बोल आणि कृतीतून पाककला शिकवतात.

आता वैदर्भीय जेवणाचे पदार्थच नाही तर, इतर प्रांतातले पदार्थ अगदी विदेशातले पदार्थ देखील समूहांवर टाकण्याची संधी स्त्रियांना मिळालीय.  एकीनं शिकवावं आणि इतरांनी ते करून बघावं, मग फोटो आणि कृतीसकट पाठवावं. बिघडलेले पदार्थ कसे सुधारावेत, उरलेल्या अन्नाचे काय -काय पदार्थ बनवता येतात,   अश्या टिप्सही भाग्यश्री देत असते. अशा अनेक गोष्टींमुळे स्त्रियांमध्ये उत्साह वाढला आणि ज्यांना स्वयंपाक करणे अवघड वाटायचे त्यांचे देखील आत्मबल वाढले. नवीन लग्न झालेल्या मुली किंवा होतकरू मुलीदेखील आपण सुगरण व्हावे म्हणून खेळीमेळीच्या वातावरणात समूहांवर पाककलेचे धडे गिरवताना दिसतात. कारण शेवटी म्हणतात ना "दिल में जाने का रस्ता पेट से होकर गुजरता हैं". अगदी खरंय. अन्न मिळालं आणि ते ही रुचकर, तर परिवार खुश असतो.

स्त्रियांचं चूल आणि मूल बघताना आरोग्याकडे दुर्लक्ष होतं.  तसेच त्या स्वतः ची देखभाल करणेही विसरून जातात.  त्यामुळे हा समूह आरोग्य विषयक जागरूकता आणि त्याबद्दल अधिक माहिती पोहोचवण्याचे काम करत असतो . आरोग्यच जर चांगलं नसेल तर स्वतःच्या सौंदर्याची काळजी कशी घेणार?  हा विचार करूनच सौंदर्य या विषयाचा समावेश केलाय.आज अनेक बायकांना आपले प्रॉब्लेम कसे शेअर करावे समजत नाही, पण आरोग्य विषयक पोस्ट वाचून त्यांना मार्गदर्शन मिळते. भाग्यश्रीनं स्वयंपाकात आणि स्वयंपाकघरात स्वतःला विसरलेल्या स्त्रियांना त्यांच्या देखील आवडीनिवडी आहेत याची जाणीव करवून दिलीय.चूल आणि मूल या पलीकडे त्यांचं विश्व देखील आहे ही ओळख पटवून द्यायला समूह जोर देतो. 

आज भाग्यश्री बरोबर काही महिला मॉडरेटर म्हणून समूहांवर आपले निःस्वार्थ योगदान देत आहेत.  

स्वयंपाक आणि आरोग्य-सौंदर्य जपण्याहून इतरही बऱ्याच चांगल्या गोष्टी या ग्रुपमध्ये केल्या जातात

भाग्यश्रीनं आठवड्याच्या प्रत्येक वारी काहीतरी वेगळं मिळावं म्हणून दिवसाप्रमाणे तिखटा-मिठाचे, गोडा -धोडाचे पदार्थांची वाटणी केलीय. मग आपले स्वतःकडे दुर्लक्ष नको व्हायला म्हणून सौंदर्य, त्वचा, केस,महिलांचे विषय यांवर घरगुती, नैसर्गिक वस्तूंपासून तयार केलेले पदार्थ यांवर चर्चा, उपयोग आणि इतर चर्चेचे विषयांच्या देवाण-घेवाणीसाठी हक्काचे व्यासपीठ महिलांना दिले.

मग एखादा दिवस स्त्रियांनी मनसोक्त जगावं, मनातले काही शेयर करावे, काही छान संकल्प घ्यावे आणि इतरांना द्यावे. चांगले उपक्रम, अनुभव सांगावे इतरांचे ऐकून शहाणे व्हावे असा एक आगळा -वेगळा उपक्रम सुरू केला.

भाग्यश्री यांचे वडील लेखक आहेत. त्यामुळं तिला म्हणून पुस्तकांची आणि वाचनाची ही आवड आहे. ,वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून एक दिवस प्रत्येक व्यक्तिंनी वाचलेले एखादे पुस्तक सांगावे किंवा त्याची माहिती द्यावी,शेवटी "वाचाल तर वाचाल" ही म्हण देखील सर्वांच्या मनात रुजली पाहिजे म्हणून हे उपक्रम.

खूपशा सोशल नेटवर्किंग  ग्रुप्सचा उद्देश्य  लोकांना जोडून मग व्यावसायिक दृष्टीनं त्याचा फायदा घेणे असा असतो.  गरजू लोकं पैसे भरतात आणि आपल्या जाहिराती देतात.  पण अशा ठिकाणी कधीकधी फसगत होऊ शकते.  मात्र या "रुचिरा आणि सौंदर्य" ग्रुपचा "एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ" हाच एक   उद्देश्य आहे. 

९० हजार महिलांना एकत्र घेवून चालणाऱ्या भाग्यश्रीचे खूप खूप अभिनंदन.

 

लेखिका : सौं धनश्री संकेत देसाई ( तोडेवाले)
[email protected]

सबस्क्राईब करा

* indicates required