computer

या फळात आहेत कॅन्सरला रोखू शकणारे गुणधर्म!

लाल चुटूक रंगाचे दाणे असणारं डाळिंब आपल्याकडे सर्रास आढळतं. याचं मूळ मध्यपूर्व आशिया खंडातील देशांतलं. या प्रदेशात त्याच्या वाढीसाठी लागणारं पोषक हवामान आहे. डाळिंबाची चव गोड, तुरट अशी असते. हे तसं जादुई फळ आहे कारण यातल्या काही घटकांमुळे कॅन्सरसारखे दुर्धर आजारही तग धरू शकत नाहीत. म्हणूनच 'ऍन ऍपल अ डे कीप्स डॉक्टर अवे' हा सफरचंदाबद्दलचा वाक्प्रयोग डाळिंबालाही तंतोतंत लागू होतो. डाळिंबाचे गुणधर्म जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.

अँटीऑक्सिडन्ट्स आणि कर्करोगाशी सामना करणारे गुणधर्म:
डाळिंबामध्ये असणारं अँटीऑक्सिडन्ट्सचं प्रमाण ग्रीन टी वा रेड वाईनमधील अँटीऑक्सिडन्ट्सच्या तुलनेत तिप्पट आहे. हे अँटीऑक्सिडन्ट्स प्रदूषण, धूम्रपान यासारख्या गोष्टींपासून पेशींचं संरक्षण करण्यात मदत करतात. याशिवाय कर्करोगासारख्या गंभीर आजारास कारणीभूत ठरू शकणारा डीएनएमधील बिघाड दुरुस्त करतात. प्रोस्टेट, ब्रेस्ट, लंग आणि कोलोन कॅन्सरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डाळिंब उपयुक्त आहे. रोजच्या आहारात डाळिंबाचा समावेश केल्याने एकंदर पोषणमूल्यात भर पडते. डाळिंबाचा ज्यूस हा एलडीएल (घातक) कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी, बीपी कमी करण्यासाठी वापरतात.

पचनाला मदत:
कोणत्याही फळाचा ज्यूस काढल्यामुळे त्याच्यातील फायबर म्हणजे तंतूमयता नाहीसा होतो. ही गोष्ट डाळिंबालाही लागू पडते. यात असलेल्या फायबरमुळे पचनाला मदत होते. त्यामुळे डाळिंबाचा ज्यूस करण्यापेक्षा डाळिंबाच्या बिया खाणं केव्हाही जास्त चांगलं. दीड कप डाळिंबाच्या दाण्यांमध्ये ७२ कॅलरीज एवढी ऊर्जा, ३.५ ग्रॅम फायबर, १४ ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि फक्त १२ ग्रॅम शुगर असते. शिवाय फोलेट, व्हिटॅमिन के, इ, बी६ ही जीवनसत्त्वं आणि पोटॅशियमसारखी खनिजं आहेत. हे फळ कोणत्याही सॅलडमध्येही घालता येतं. स्वाद आणि पोषण असा दुहेरी फायदा होतो.

प्रोस्टेट ग्रंथींचं आरोग्य:
डाळिंब प्रोस्टेट ग्रंथीच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. डाळिंबाचा ज्यूस हा प्रोस्टेटचा कॅन्सर असणाऱ्या पुरुषांच्या प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन किंवा पीएसए ची ( वीर्यामध्ये आढळणारा घटक) पातळी स्थिर ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. एका अभ्यासानुसार डाळिंबाच्या रसामुळे कर्करोगाच्या पेशींच्या प्रसारासाठी प्रोत्साहन देणाऱ्या रासायनिक सिग्नल्सप्रति असलेलं पेशींचं आकर्षण कमकुवत होतं. परिणामी या पेशींची हालचाल आणि रोगाचा प्रसार रोखण्यास मदत होते.

हृदयाचं आरोग्य:
कोलेस्टेरॉल आणि फॅट्सची वाढ हे हृदयाशी संबंधित अनेक समस्यांचं प्रमुख कारण आहे. यावरचा उपाय म्हणजे डाळिंबाचं सेवन. एका संशोधनानुसार डाळिंबाच्या बियांमध्ये असलेले अँटिऑक्सिडन्ट्स हे बीपी आणि एलडीएलची- घातक कोलेस्टेरॉलची- पातळी खाली आणतात. इस्राएल येथील एका अभ्यासानुसार डाळिंबामधील अँटिऑक्सिडन्ट्स हे रक्तवाहिन्यांच्या आतल्या भिंतींवर जमा झालेले चरबीचे थर कमी करतात. शिवाय एचडीएल अर्थात चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळीही वाढवतात. आर्थरोस्क्लेरोसिस नावाच्या हृदयाच्या आजारावर डाळिंब प्रभावी ठरतं. या आजारात हृदयाच्या धमन्यांच्या आतील भिंतींवर फॅट, कोलेस्टेरॉल इत्यादीचा थर निर्माण होतो. यामुळे रक्तवाहिन्यांच्या आतील बाजूला ब्लॉकेजेस तयार होतात. तज्ज्ञांच्या मते, दिवसातून एक कप डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने हृदयाचं पोषण करणाऱ्या धमन्यांमधून होणाऱ्या रक्तप्रवाहावरचा अतिरिक्त ताण कमी होतो.

मधुमेह नियंत्रण:
मधुमेह नियंत्रणात डाळिंबाची भूमिका महत्त्वाची आहे, कारण त्याच्यातील साखरेचं प्रमाण इतर फळांच्या तुलनेत कमी आहे. मधुमेहग्रस्त व्यक्तींनी डाळिंबाचं नियमित सेवन केल्यास त्यांचा मधुमेह नियंत्रणात राहू शकतो. काही अभ्यासांनुसार डाळिंब इन्शुलन रेझिस्टन्समध्ये सुधारणा दाखवतं.

गर्भावस्थेत मेंदूचं संरक्षण:
डाळिंब गर्भवती महिलांच्या भ्रूणांचा मेंदू सुरक्षित ठेवायला मदत करतं. हार्वर्ड येथील डॉक्टरांच्या संशोधनातून काही प्राथमिक निष्कर्ष पुढे आले आहेत. त्यातील एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे, गर्भवती महिलांच्या आहारात बाकीच्या आहाराबरोबरच डाळिंबाचं सेवन हे भ्रूणाच्या मेंदूचं संरक्षण करतं. अपुरी वाढ झालेल्या अर्भकांच्या मेंदूला होणाऱ्या दुखापतीचा धोका डाळिंबाच्या सेवनामुळे कमी होतो.

एवढ्या बहुगुणी असणाऱ्या फळाचा आहारात समावेश करायलाच हवा. नाही का? तुम्हाला काय वाटतं?

 

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required