computer

कोविड-१९वर औषध आलंय? त्याची किंमत, डोस, उपलब्धता, परिणामकारकता आणि बरंच काही जाणून घ्या.

गेले अनेक महिने कोविडच्या उपचारासाठी औषधांच्या चाचण्या सुरु आहेत. या चाचण्यातून पार पडून औषध म्हणून स्वीकारले जाण्याच्या पातळीवर कोणतेही संशोधन पोहोचलेले नाही. या रोगावरचे व्हॅक्सीन बाजारात येण्यासाठी आणखी पाच सहा महिने जातील असा औषध कंपन्यांचा अंदाज आहे. पण यादरम्यान काही जुनी औषधे पर्यायी औषध म्हणून वापरण्याचा प्रयत्न जगात सुरु आहे. सुरुवातीला हिवतापावरचे औषध हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची उपयुक्तता वाटल्याने त्याचा वापर करण्यात आला. काही रोगी बरे झालेही, पण त्याची उपयुक्ततता फारच मर्यादित असल्याचे थोड्याच दिवसांत कळून आले. त्यानंतर इबोलासाठी बनवण्यात आलेले रेमेडीसेवीर वापरून बघण्यात आले. पण तेही फारसे उपयोगाचे नाही हे थोड्याच दिवसांत कळले. 

गेल्या आठवड्यात डेक्सामेथसोन या स्टिरॉईडचा वापर ब्रिटनमध्ये का केला गेला?

डेक्सामेथासोन हे स्टिरॉइड कॉर्टीकोस्टीरॉइड या वर्गात मोडते. यापूर्वी हे स्टीरॉइड मेंदूला येणारी सूज, आर्थ्रायटीस, अ‍ॅलर्जी, दमा अशा विविध त्रासांवर औषध म्हणून वापरले जायचे. आता ते कोवीडच्या रोग्यांसाठी उपयुक्त आहे असे वाटते आहे. काही अत्यंत अत्यवस्थ असलेल्या रोग्यांवर डेक्सामेथासोन काम करते आहे असे निरिक्षणात आले आहे. याच दरम्यान काल ग्लेनमार्क या भारतीय औषध कंपनीच्या फॅबी-फ्लू या औषधाला मानवी चाचणीसाठी वापरण्याची परवानगी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने दिली आहे. आज आपण  प्रश्नोत्तरातून जाणून घेऊ या फॅबी-फ्लू काय आहे?

फॅबी-फ्लू काय आहे?

फॅबी-फ्लू हे ग्लेनमार्कच्या औषधाचे ब्रँडनेम आहे. याचे जेनेरीक नाव म्हणजे औषध शास्त्रानुसारचे नाव फॅवीपीरावीर आहे. फॅवीपीरावीरचे एपीआय म्हणजे अ‍ॅक्टिव्ह फार्मास्यूटिकल इनग्रेडीअंट, थोडक्यात या औषधाची मूळ रेसेपी ग्लेनमार्कने त्यांच्या प्रयोगशाळेत यशस्वीरित्या बनवली आहे. अँटी व्हायरल म्हणून हे औषध आधीपासून वापरले जाते.

हे औषध उपयुक्त आहे अथवा नाही हे कसे कळते?

कोणतेही औषध मानवी वापरापूर्वी अनेक वेगवेगळ्या पातळीवरच्या परिक्षणांतून जात असते. ज्याला 'फेज ' असे म्हणतात.

फेज १ - औषधाचा शोध लागून उपयुक्ततेची शक्यता आजमावणे. या पातळीवर केवळ एक उपयुक्त ठरू शकेल असा रासायनिक पदार्थ या पलीकडे त्याला मान्यता नसते.
फेज २ - या टप्प्यावर प्रयोगशाळेतील प्राण्यांवर या औषधाची चाचणी घेण्यात येते. या परिक्षणाला प्री-क्लिनीकल टेस्ट असे म्हणतात.
फेज ३ - या पातळीवर हे औषध रोग्यांवर केवळ चाचणी म्हणून वापरण्यात येते. त्यासाठी दोन वेगवेगळ्या गटातल्या रोग्यांना एकाच वेळी औषध देण्यात येते. एका गटाला औषधाचे डोस देण्यात येतात तर दुसर्‍या गटाला प्लासीबो म्हणजे औषध दिले आहे असे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात जे दिले जाते ते औषध नसते, तर औषधासारखेच पण निरुपद्रवी डोस असतात. त्या दोन्ही गटाचे अहवाल बघून औषधाची उपयुक्तता कळते. 

फेज ४ - या टप्प्यावर औषध ड्रग कंट्रोलर या सरकारी संस्थेकडे तपासणीस पाठवले जाते.
फेज ५ - ड्रग कंट्रोलरच्या परवानगीने औषध बाजारात विक्रीस येते. पण कंपनीला वापराचे अनेक तपशिल द्यावे लागतात. या पातळीवर पोहचलेल्या औषधांवर पण बंदी आल्याचे बर्‍याच वेळा घडले आहे. 

ग्लेनमार्कचे औषध सध्या फेज -३ वर असतानाच बाजारात विक्रीची  परवानगी देण्यात आली आहे.

फेज ३ मधील औषध थेट बाजारात आणण्याची परवानगी कशी दिली असेल?

फॅबी-फ्लू किंवा फॅवीपीरावीर या अगोदरही फ्लूसाठी वापरात होते. त्यामुळे ते मानवी उपयोगासाठी निर्धोक आहे याची चाचणी झालेली आहे. आता हे करोनाच्या व्हायरसवर किती प्रमाणात यशस्वी ठरते हे बघायचे आहे. यासाठी "इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन" म्हणजे आणीबाणीच्या प्रसंगी देण्यात येणार्‍या परवानगीच्या नियमावलीप्रमाणे औषध बाजारात येणार आहे. दिवसेंदिवस वेगाने वाढत जाणारी रोग्यांची संख्या बघून ही परवानगी देण्यात आली आहे.

हे औषध आणखी कोणत्या देशात वापरले जाते आहे का?

फॅवीपीरावीर 'अ‍ॅव्हीजेन' या ब्रॅण्डनेमखाली जपानमध्ये फ्लूसाठी २०१४ सालपासून वापरले जाते. बांगला देश आणि संयुक्त अरब अमिरातीत ते बरेच दिवस कोवीडसाठी वापरले जाते आहे. भारताखेरीज कॅनडा-अमेरिका, इटली, चीन, फ्रान्स, इंग्लंड या देशात ३००० अधिक रोग्यांवर त्याच्या चाचण्या चालू आहेत. बांगलादेशात हे औषध युमीफेनोवीर या दुसर्‍या औषधासोबत दिले जाते आहे. त्याचाही अभ्यास ग्लेनमार्कचे संशोधक करत आहेत.

हे औषध महागडे आहे का? किती दिवस घ्यावे लागेल? किती मात्रा घ्याव्या लागतील?

या औषधाची किंमत ३४ गोळ्यांसाठी रुपय ३५०० आहे. पहिल्या दिवशी २०० मिलीग्रॅमच्या ९ गोळ्या घ्यायच्या आहेत, तर नंतर ४ गोळ्या रोज घ्यायच्या आहेत. एकूण १४ दिवस हे औषध घ्यायचे आहे. ज्या रोग्यांमध्ये कोवीडची सौम्य ते मध्यम स्वरुपाची लक्षणे दिसत आहेत त्यांच्यासाठी हे औषध उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. औषध यशस्वी असल्याचे प्रमाण ८८ ते ९० टक्के आहे. 

या औषधाची उपयुक्ततता बघता ते साठा करण्याच्या वृत्तीला वाव देईल का?

नाही. ग्लेनमार्क आणि भारत सरकार दोन्ही एकत्र काम करत असल्याने असे होणे शक्य नाही. 

फॅबी-फ्लूचा तुटवडा पडेल का ? 

ग्लेनमार्कच्या गोळ्या बाजारात उपलब्ध होतच आहेत. पण सोबत स्ट्राइड फार्मा, ब्रिंटन फार्मा, लासा सुपरजेनीक्स, ऑप्टीमस फार्मा या कंपन्या पण हेच औषध बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे तुडवडा होण्याची शक्यता दिसत नाही असे आता तरी वाटते आहे. 

हे औषध केवळ तीन महिन्यांत एक्सपायर होते. त्यामुळे साठेबाजांना इथे खूप वाव असेल असे वाटत नाही.

येत्या काही दिवसातच चाचण्यांचे निकाल हाती येतीलच. पण त्याआधी काही महत्वाचे मुद्दे सांगावेसे वाटतात-

१. हे औषध 'सेफ' असल्याचे माहिती आहेच. ते पोटातून घेण्याचे औषध असल्याने ते सहज देता येते. 

२. सध्या ९० टक्के रोगी सुरुवात ते मध्यम स्वरुपाच्या पातळीवर आहेत. आंतरराष्ट्रीय निरिक्षणाप्रमाणे ८८ टक्के यश मिळाल्यास हॉस्पीटलमध्ये असणार्‍यांची संख्या कमी होईल. परिणामी पुरेशा सुविधा उपलब्ध होतील. वैद्यकीय -पोलीस- प्रशासकीय कार्यालय यांच्यावरचा ताण बराच कमी होईल.

३. नोकरी -व्यापार यासाठी बाहेर पडणार्‍या जनतेत आत्मविश्वास निर्माण होईल.

४. ग्लेनमार्क ही संपूर्ण भारतीय कंपनी असल्याने भारतीय असण्याचा एक नवा सार्थ अभिमान मनात तयार होईल. ग्लेममार्क हे जरी विदेशी नाव वाटत असले तरी ते ग्रेशस सलढाणा यांच्या दोन मुलांची नावे एकत्र करू ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ग्लेन सध्या कंपनीचा मुख्याधिकारी आहे.

५. बाहेरील देशांचे बाजारातील असलेले वर्वस्व कमी होईल. 

आता सगळ्यात मनोरंजक मुद्दा :

आपल्याला ग्लेनमार्कच्या औषधाबद्दल या आठवड्यातच कळले आहे. पण ही बातमी शेअर बाजाराला मे मःईन्याच्या शेवटच्या आठवड्यातच कळली असावी. ग्लेनमार्कच्या शेअरची किंमत २८ मे रोजी ३४३ रुपये होती आणि काल ती ४०९ रुपये झाली. म्हणजे दोन आठवड्यांत ६६ रुपयांचा फरक पडला. याला कदाचित इनसाइडर ट्रेडींग जबाबदार असेल, पण तो मुद्दा आपण नंतर कधीतरी बोलू या!

सबस्क्राईब करा

* indicates required