computer

मधुर-शीतल कोकम सरबताचे सात फायदे! मग, तुम्ही कधीपासून प्यायला सुरु करणार?

भरपेट जेवणानंतर एक ग्लास कोकम सरबत हवंच. शास्त्र असतं ते! कोकम हा भारतीय, त्यातही महाराष्ट्रीय आहारातील एक अतिशय महत्वाचा पदार्थ. मांसाहारी आणि शाकाहारी अशा दोन्ही पदार्थांसोबत जुळवून घेणारा कोकम तितकाच बहुगुणी आहे. आज आपण या कोकमाचे फायदे जाणून घेणार आहोत.

अँटीऑक्सिडंट गुणांनी भरपूर असलेले कोकम हे उन्हाळ्यातील एक वरदानच आहे. आयुर्वेदात वृक्षमाला म्हणून ओळखला जाणारा कोकम आधुनिक वैद्यकीय भाषेत गार्सिनिया इंडिका म्हणून ओळखला जातो. भारताच्या पश्चिम घाटात आणि अंदमान नोकोबार बेटावर कोकम भरपूर प्रमाणात आढळतो. कोकमाच्या झाडाला लाल रंगाची फळे लागतात. त्यांना रातांबा असं म्हणतात. या रातांब्यावरची सालं उन्हात सुकवली जातात आणि या सुकलेल्या कोकमाचा निरनिराळ्या पदार्थात वापर केला जातो. चवीला आंबट असले तरी कोकमामुळे भाजी, आमटीला मस्त चव येते.

१. ॲसिडीटी कमी करून पचन सुधारते

अपचन झाल्यास पित्त वाढते आणि पित्तामुळे पोटात, छातीत किंवा घशात जळजळ होते, अशावेळी कोकम सरबत घेतल्यास आराम पडतो. कोकमाची फळे सुकवून त्याच्या पानापासून बनवलेला कोकम ज्यूस घेतल्याने पाचक अग्नी सुधारतो आणि त्यामुळे पचनाचे कार्य सुधारते. म्हणूनच जड आणि मसालेदार जेवणानंतर एक ग्लास कोकम सरबत घेण्याची पद्धत आजही काही घरातून आढळते.

२. मूड सुधारणारा मित्र

कोकमाचे फळ म्हणजेच रातांबाही खाल्ला जातो. या फळामुळे चिंता, तणाव कमी होतो आणि मन शांत होते. तुम्हाला जर निराश किंवा थकवा आल्यासारखे वाटत असेल तर अशावेळी कोकमाचे एक फळ खावून पहा. तुम्हाला पुन्हा तरतरी येईल. दररोजच्या आहारात कोकमाचा समावेश असेल तर शरीरातील सिरोटीनचे प्रमाण संतुलित राहते. आपला मूड चांगला राहण्यासाठी सिरोटीन हे द्रव्य महत्वाचे असते. शरीरात जर सिरोटीन योग्य प्रमाणात असेल तर आपण अधिक उत्साही आणि आनंदी असतो.

३. जखम, सूज यावरही गुणकारी

कोकमाच्या फळामध्ये अँटी-इनफ्लेमेंटरी आणि अँटी-ॲलर्जिक गुण असतात. म्हणूनच शरीराच्या जखमा, घाव भरून काढण्यातही कोकम सहाय्यकारी ठरते. शरीरावर जिथे जखम, ॲलर्जी किंवा सूज आली असेल तिथे कोकम लावल्यास फायदा होतो. भाजलेल्या ठिकाणीही कोकम लावल्यास जखम लवकर बरी होते. फुटलेल्या टाचेवरही याचा उपयोग होतो. कोकम पावडर तेलात मिसळून टाचांना लावल्यास टाचांच्या भेगा कमी होतील. भाजलेल्या ठिकाणी कोकम लावल्यास दाह कमी होतो.

४. वजन कमी करायचे आहे? मग तुम्ही दररोज कोकम सरबत घेतलंच पाहिजे

तुमचे वजन जास्त असेल आणि तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर तुम्ही रोजच्या आहारात कोकमाच समावेश केलाच पाहिजे. कोकमामध्ये कॅलरी आणि फॅटचे प्रमाण कमी असते. शिवाय यातून लोहाची कमतरता भरून निघते. अ, ब आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. कोकम सरबत हे एक उत्तम फॅट बर्नर ड्रिंक आहे. ज्यामुळे तुम्हाला सतत भूक लागणार नाही. थोडेसे खाल्ले तरी पोट भरल्याची जाणीव होईल.

५. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त

तुम्हाला जर मधुमेह असेल किंवा तुम्ही प्री-डायबेटिक स्टेजला असल्याचे निदान करण्यात आले असेल, तर तुमचा हा वाढता मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास कोकम तुम्हाला मदत करेल. कोकमाच्या सेवनाने रक्तातील साखर संतुलित राहते. कोकमामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-डायबेटिक गुण असतात. ज्यामुळे शरीराला आवश्यक असणारे काही एन्झाइम्स स्र्वण्याचे प्रमाण सुधारते. पचनक्रिया सुधारते. त्यामुळे इंस्युलीनचे कार्य सुरळीत होते. परिणामत: रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते.

६. पोषणतत्वांनी भरपूर

कोकम फळात अ, ब३, आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते, हे तर आपण पहिलेच शिवाय, कॅल्शियम, आयर्न, मँगेनीज आणि झिंक अशा खनिज द्रव्यांचे प्रमाणही जास्त असते. फॉलिक ॲसिड, अस्कॉर्बिक ॲसिड, हायड्रोक्झीसायट्रिक, ॲसिटिक ॲसिड आणि फायबरचे प्रमाणही चांगले असते. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यापासून ते तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यापर्यंत कोकम किती फायदेशीर आहे पहा.

७. उन्हाळ्यात तरी कोकम हवेच

कोकम हा शीत गुणांनी युक्त आहे. उन्हाळ्याच्या दिवसात शरीरातील उष्णता कमी करून उन्हाळ्याचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला पाण्याची कमतरता भासते, उष्माघाताचा धक्का जाणवू शकतो. अशावेळी शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी आणि उष्माघातापासून बचाव करण्यासाठी कोकम सरबत हा एक उत्तम उपाय आहे. पाण्याची कमतरता कमी करून थकवा दूर करण्यास हातभार लावते. उन्हाळ्याचा दिवसातही तुम्हाला अधिक उत्साही आणि तरीतरीत राहायचे असेल तर कोकम सरबताचे सेवन अवश्य करावे.

‘आरोग्यम धनसंपदा’ असे आपल्या संस्कृतीत म्हटले जाते आणि हे धन नेहमीच वृद्धिंगत व्हावे म्हणून आहारात औषधीय गुणधर्माच्या पदार्थाचा आग्रह धरणारी आपली संस्कृती आज जगभर मान-सन्मान का मिळवत आहे, याचा तुम्हाला अंदाज येईल.

मग तुम्ही कधीपासून घेताय कोकम सरबत?

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required