computer

लॉकडाऊनमध्ये किती खावे? प्रसिद्ध मधुमेहतज्ञ डॉ. नितिन पाटणकर यावर काय म्हणतात?

या लॉकडाउनमुळे या लोकांना काय झालंय ते कळनासं झालंय. एक साधा ‘लाॅकडाउनमध्ये किती खाता हा प्रश्न विचारल्यानंतर अनेक मनोरंजक उत्तरे मिळतात. आता तुम्हीच हे नमुने वाचा...

"जोपर्यंत वस्तू मिळत आहेत तोपर्यंत खाऊन घेऊ. पुढे वस्तू मिळेनाशा झाल्या तर मग उपास आहेच."
"कोरोना काही जाणार नाही. कोणाला केव्हा होईल ते सांगता येत नाही. त्यातून वाचू की नाही माहीत नाही.म्हणून आत्ताच काय ते खाऊन घेतो, उद्याचा काय भरवसा?"
"हल्ली मला चार्वाकाचे तत्वज्ञान पटलंय. यावत जीवेत सुखं जीवेत, आहे तोपर्यंत सुखात जगावं असं म्हणत रोज चविष्ट, चवदार पदार्थ बनवून खाऊन घेतो आहे."
"सध्या मी अशा दोन कुटुंबाना जेवण पुरवतो. ते माणशी जितके खातात तितकेच मी खातो."

अशी अनेक मासलेवाईक उत्तरं आणि सोबत फेसबुकवर नवनवीन रेसिपीजचे फोटो! त्यावर उतारा म्हणून टीकाटिपण्ण्या करणाऱ्या पोस्ट!  

तर या लाॅकडाउनच्या काळात मेजवानी असल्यासारखं, उत्सव असल्यासारखं जेवावं की ज्यांची उपासमार होते आहे त्यांच्यासारखं जेवावं हा ज्याच्यात्याच्या संवेदनशीलतेचा आणि सद्सद्विवेकबुद्धीचा प्रश्न आहे. रेसिपी टाकणारे काहीजण प्रत्यक्ष उत्तेजन देत आहेत, तर त्यांच्यावर टिकेची झोड उठवणारे फेसबुकवरच्या लिखाणापलीकडे काडीचीही मदत करीत नाहीत. म्हणूनच काय बरोबर आणि काय चूक या वादात न पडता ‘किती खावे’ याचं उत्तर शोधूया. हाताशी वेळ आहे तर स्वत:चा. शोध घेऊ या!

आपल्या नेहेमीच्या खाण्याच्या वेळा ठरलेल्या असतील तर त्या वेळेस किती खायचे ते नंतर पाहू. सकाळपासून रात्रीपर्यंत नाश्ता आणि दोन जेवणं यांच्यामधे खरी भूक किती वाजता लागते ते लिहून काढू. यात खरी भूक म्हणजे शरीरातील उर्जेचा साठा मोकळा होण्याची गती कमी झाली की जी  लागते ती खरी भूक. आता ही ओळखायची कशी? सोप्पं आहे. लक्ष दुसरीकडे वेधले गेले म्हणजे उदाहरणार्थ -टीव्हीवर किंवा यूट्यूब वर काही आवडतां प्रोग्रॅम लावलाय, काही छंद असेल आणि त्यात जीव रमवलाय तरीही नाहीशी होत नाही ती खरी भूक!

अगदी नावडता पदार्थ समोर आला तरी तो खावासा भाग पाडते वाटतो ती खरी भूक! खायला सुरवात करण्यापूर्वी आरशात स्वत:च्या शरीरावरील चरबी नीट पाहून, अंदाजे मोजमाप घेऊन, ती चरबी काही झालं तरी कमी करायला हवी असं म्हणूनही नंतर राहते ती खरी भूक. आणि अर्थातच पदार्थ पाहून, वास येऊन किंवा आठवून चाळवली जाते ती खोटी भूक. कंटाळा आला, दुसरं काही करायला नाही म्हणून लागते ती खोटी भूक.

घरातल्या सगळ्यांचं एकमत झालं तर आणखी एक प्रयोग करता येतो. या प्रयोगासाठी माणशी एक टी स्पून मीठ आणि चार टी स्पून तेल सकाळीच बाजूला काढून ठेवायचे. दिवसभराच्या सगळ्या स्वयंपाकाला इतके तेल-मीठाचे प्रमाण पुरेसे असते.  'गरजेप्रमाणे चव बदलणे’ हा उपाय आहे. चवीनुसार गरज बदलणे हे चुकीचे आहे. तसंच ताट वाढून घेण्याची पद्धत बदलायला हवी. पदार्थ किंचित कच्चा चालेल, पण अतिशिजवलेला नको. ‘आर्ट ॲाफ च्यूईंग’ शिकायला हवे. फळं खाणार असाल तर ती पण किंचित कच्ची हवीत. 

हे वरील उपाय ८०% काम करतात. किती खायला हवं ते बरोबर कळतं. आता बाकीचे वीस टक्के काम हे वजन उंची वगैरे गणितावर अवलंबून असते. तुमचे वजन जास्त असेल तर वजनाच्या किलोमागे वीस कॅलरीज दिवसभरात पुरतात. वजन योग्य असेल तर २३ कॅलरी प्रती किलो असा हिशेब असतो.

लाॅकडाऊनमधे कशात किती कॅलरीज आहेत, आपल्या पोटात किती कॅलरीज जातात ते सगळं शोधत बसणे हा पण एक चांगला कार्यक्रम आहे. गुगलबाबा आहेच उत्तरं द्यायला! पण प्रश्न असा आहे की तुम्हाला ‘किती खायला हवं ते?’ हे जाणून घ्यायची मनोमन इच्छा आहे का?

नाहीतर..... पालथ्या घड्यावर पाणी!

 

लेखक : डॉ. नितिन पाटणकर
Consultant - Diabetes, Obesity and Lifestyle Disorders
Wisdom Clinic - Mulund
Jupiter Hospital, Thane

सबस्क्राईब करा

* indicates required