सिझेरियन पद्धतीने जन्मलेल्या बाळाची अशी वाढवतात प्रतिकारशक्ती!!

गेल्या आठवड्यात बोभाटावर तुम्ही लुई पाश्चर आणि त्यांच्या संशोधनाविषयी तुम्ही वाचलं असेलच.साहजिकच बॅक्टेरिया म्हणजे रोग असा तुमचा समज झाला असेल. आपल्या शाळेच्या पुस्तकात पण बॅक्टेरियामुळे होणाऱ्या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून काय काय काळजी घ्यायची हेच आपल्याला शिकवलं होतं.
पण मंडळी, बॅक्टेरियाचा आणि आपल्या शरीराचा ऋणानुबंध इतका घट्ट आहे की तो कधीच तुटत नाही. तर आज बघूया, आपले आणि बॅक्टेरियाचे काय नाते आहे ते.
बॅक्टेरिया हे एकपेशीय सजीव असतात. ते आपल्या संपूर्ण शरीराच्या आत आणि बाहेर पसरलेले असतात. अनेकदा आपल्या स्वच्छतेच्या कल्पनेच्या आहारी जाऊन आपण विविध रसायने वापरून ह्या बॅक्टेरियाना धुवून टाकायचा किंवा मारून टाकायचा प्रयत्न करतो. अनेक जाहिरातीत ह्या बॅक्टरीयाला किटाणू वगैरे पण म्हटलं जातं आणि आमचा साबण कसा इतर साबणाच्या मानाने जास्त बॅक्टेरिया मारतो हेही सांगितले जाते. पण खरंच शरीरावरचे बॅक्टेरिया इतके वाईट असतात का?
एक मजेशीर माहिती देतो. बाळ जेव्हा जन्म घेते तेव्हा ते आईच्या गर्भाशयातून प्रसूतीमार्गाद्वारे जगात प्रवेश करते. जेव्हा हे घडते तेव्हा बाळाच्या शरीराच्या आत जवळजवळ कोणतेही जिवाणू किंवा विषाणू नसतात. बाळाला स्वतःची प्रतिकारशक्तीही नसते. बाळ बाहेरच्या जगात आले की बाहेर जे सूक्ष्मजीव असतील ते त्याच्या शरीरात प्रवेश करतात आणि मग त्यानुसार बाळाची प्रतिकारशक्ती विकसित होते.
बाळ नैसर्गिकरित्या जन्माला येत असताना आईच्या प्रसूतिमार्गातले सगळे बॅक्टेरिया त्याला भेट म्हणून मिळतात. ते बॅक्टेरिया पटापट शरीरावर वाढतात आणि त्यामुळे हानिकारक बॅक्टेरियाला शरीरावर आणि शरीराच्या आत बस्तान बसवता येतं नाही. परंतु बाळाचा जन्म सिझेरियन सेक्शनने होतो तेव्हा अर्थातच त्याला पूर्ण निर्जंतुक केले जाते आणि आईच्या प्रसूतिमार्गातले कोणतेही मायक्रोबीयल कल्चर त्याला भेट म्हणून मिळत नाही. जन्मानंतर त्या बाळाला जगातल्या हानिकारक बॅक्टेरियांच्या हल्ल्याला सामोरे जावे लागते. बऱ्याचदा ह्या मुलांना जास्त प्रमाणात ऍलर्जी, इन्फेक्शन किंवा इतर चयापचयाच्या व्याधींचा सामना करावा लागतो.
ह्यावर उपाय म्हणून हल्ली परदेशात व्हजायनल सीडिंग नावाचे टेक्निक वापरले जाते. ह्यात कापसाचा एक निर्जंतुक बोळा आईच्या प्रसूतिमार्गातून फिरवला जातो. अर्थातच आईच्या प्रसूतिमार्गातील सगळे जिवाणू ह्या बोळ्यावर चिकटतात. सिझेरियन सेक्शनने बाळ जन्माला आले की लगेच त्याच्या संपूर्ण शरीरावर हा बोळा फिरवला जातो. असे केल्याने आईच्या शरीरावरचे सगळ्या प्रकारचे जिवाणू बाळाला वारसा म्हणून मिळतात. बाळाची वाढ जास्तीत जास्त नैसर्गिकरित्या होते. त्याची प्रतिकारशक्ती जास्त चांगली विकसित होते.
बाळाची प्रतिकारशक्ती महत्त्वाची खरीच. मग ती नैसर्गिकरित्या तयार होवो किंवा अशा कृत्रिम मार्गाने, ती तयार होणे महत्त्वाचे, नाही का??
लेखक : शैलेंद्र कवाडे
आणखी वाचा :
दोनशे वर्षांपूर्वी जन्मलेल्या या संशोधकाचे हे ६ उपकार आपण आजही मानतो...