computer

कोरोना कसा पसरतो आणि बाहेर पडल्यावर काय काळजी घ्यायची? मग हे वाचायलाच हवं

आपण लॉकडाऊनच्या चौथ्या टप्यात आहोत. लवकरच लॉकडाऊन शिथिल होण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे आपल्याला बाहेर अत्यंत काळजीने वावरायचं आहे. निदान काही महिने तरी मास्क आणि सॅनिटायझर हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होणार आहेत. तर, त्यानिमित्ताने आजच्या लेखात आम्ही सांगणार आहोत की कोरोना कसा पसरतो आणि बाहेर गेल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी.

सुरुवातीलाच हे समजून घेतलं पाहिजे की कोविड-१९ ची लागण होण्यासाठी संसर्गजन्य विषाणूचे किती कण गरजेचे असतात. काही तज्ञांच्या म्हणण्यानुसार संसर्गजन्य विषाणूचे १००० कण गरजेचे असतात. ह्या दाव्याला जगभर मान्यता मिळालेली नाही, तरी त्याला प्रमाण मानून कोणत्या गोष्टींमधून संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असतो आपण पाहूया.

१. बाथरूम

माणसाच्या विष्ठेमधून कोरोनाचं संक्रमण होतं की नाही या गोष्टीला अजून मजबूत आधार मिळालेला नाही. पण बाथरूम ही एक अशी जागा आहे जिथल्या गोष्टींपासून आपल्याला संक्रमण होण्याचा धोका मोठ्याप्रमाणात असतो. एका अभ्यासानुसार फ्लशमधून विषाणू हवेत फेकले जाऊ शकतात. म्हणून बाथरूमचा वापर करताना सर्वाधिक काळजी घ्यायला हवी. सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर शक्य तितका टाळल्यास उत्तम!

२. खोकला

खोकताना एकावेळी जवळजवळ ३००० थेंब ताशी ८० किलोमीटरच्या वेगाने बाहेर फेकले जातात. आकाराने मोठे असलेले थेंब त्यांच्या आकारामुळे हवेत फार काळ टिकत नाहीत, पण लहान थेंब हे बराचवेळ हवेत तरंगत असतात आणि एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात.

३. शिंक

एका शिंकेतून साधारण ३०,००० इतके थेंब हवेत फेकले जातात. हा वेग जवळजवळ तशी ३२१ किलोमीटर म्हणजे एका बुलेट ट्रेनच्या वेगा एवढा असतो. शिंका-खोकला आणि कोरोनाच्या संसर्गाचा विचार करायचाच झाला तर हवेत फेकल्या गेलेल्या एका थेंबात जवळजवळ २००,०००,००० संसर्गजन्य विषाणूचे कण असतात. या आकड्याला ३००० किंवा ३०,००० थेंबांनी गुणल्यास किती मोठा आकडा येईल हे तुम्हीच पाहा.

४. श्वासोच्छ्वास

शिंका आणि खोकल्याशी तुलना केलीत तर उच्छ्वासातून बाहेर पडणारे थेंब कमी असतात. पण त्यांच्याबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे. श्वासोच्छ्वासामधून साधारण ५० ते ५००० थेंब बाहेर पडतात. श्वसनप्रक्रियेचा वेग कमी असल्याने ते हवेत फार काळ राहत नाहीत. कमी वेगामुळे श्वासोच्छ्वासावाटे संसर्गजन्य विषाणूचे कण बाहेर फेकले जाण्याचं प्रमाण अत्यंत कमी असतं.

वरील मुद्दे बघितल्यावर आम्ही तुम्हाला घाबरवतोय असं वाटू शकतं. पण आम्ही देत असलेल्या माहितीतून तुम्ही जास्तीतजास्त जागरूक व्हावं ही एवढीच अपेक्षा आहे. शिंका किंवा खोकल्यातून बाहेर फेकल्या जाणाऱ्या विषाणूंना रोखण्यासाठी एक मास्क पुरेसा ठरू शकतो. हात स्वच्छ धुणे आणि वेळोवेळी सॅनिटायझर वापरणे यासारख्या उपयांमधून धोका टाळता येऊ शकतो.

तर, आता पाहूया घराबाहेर कोरोनाचा धोका किती प्रमाणात आहे.

कोरोनाचा सर्वात जास्त प्रसार कोणत्या ठिकाणी झाला याचा विचार केल्यास आपल्या लक्षात येईल की हॉटेल्स, धार्मिक स्थळं, कामाची ठिकाणं, कारागृह यांसारख्या ठिकाणी जिथं मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले, तिथेच सर्वात जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली. याचं कारण असं की मोठ्याप्रमाणात लोक जमले म्हणजे ते एकमेकांशी बोलणार, एकमेकांच्या संपर्कात येणार, आणि प्रत्येकाने मास्क लावला असला तरी धोका हा असतोच. कामाच्या जागेचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की ज्या ठिकाणी १०० पेक्षा जास्त लोक एकाचवेळी काम करत आहेत तिथल्या बंदिस्त जागेमुळे, कोंडलेल्या हवेमुळे आणि माणसांच्या गर्दीमुळे विषाणू पसरलायला मदत झाली.

या आधारावर आपण भविष्यात जेव्हा घराबाहेर पडू तेव्हा काही खास काळजी घ्यावी लागेल.

कामाच्या ठिकाणी किंवा हॉटेल-दुकान यांसारख्या बंदिस्त जागेत संक्रमणाची शक्यता सर्वात जास्त असते. बंदिस्त जागांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम कितीही पाळले तरी संक्रमणाची शक्यता टाळता येत नाही. तुम्ही इतरांपासून कितीही लांब असलात किंवा हवेतील विषाणूचं प्रमाण कमी असलं तरी त्या जागेत जास्त काळ राहिल्यास विषाणूचं संक्रमण होऊ शकतं.

मग काय करायचं?

बंदिस्त जागांमध्ये जाताना आधी तर तिथे हवा खेळती आहे का, त्या जागेत माणसं किती आहेत, लोक कितीवेळासाठी त्या जागेत वावरत आहेत, या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी हवा खेळती आहे आणि माणसांचा वावर कमी काळापुरता आहे तिथे संक्रमणाची शक्यता सर्वात कमी असते.

हाच नियम तुमच्या कामाच्या ठिकाणाबद्दल आहे. मोठ्या जागेत एकाचवेळी भरपूर लोक काम करत असतील, तर तिथली हवा कोंडलेली आहे का आणि त्या जागेत प्रमाणापेक्षा जास्त लोक आहेत का, ह्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. एकंदरीत सध्याची परिस्थितीत पाहता कमी लोक, मोठी जागा आणि हवेशीर वातावरण गरजेचं आहे.

आता थोडं बंदिस्त जागेतून बाहेर येऊ. तुम्ही गर्दीतून चालत आहात, समजा कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्ती तुमच्या जवळून गेला तर काय? तर घाबरून जायचं नाही. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे श्वासावाटे कमीतकमी विषाणू बाहेर फेकला जातो. दुसरी महत्त्वाची गोष्ट संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात ५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ घालवल्यास धोका निर्माण होऊ शकतो.

तर वाचकांनो, बाहेर विषाणू आहे तर तुमच्याकडे पण हत्यार आहे. योग्यरीतीने मास्क लावा, सॅनिटायझर जवळ बाळगा, माणसांपासून जास्तीत जास्त अंतर राखा, गर्दीच्या जागा टाळा. या काही मोजक्या गोष्टी लक्षात ठेवल्या तरी तुम्ही धोका टाळू शकता.

 

माहिती स्रोत

https://www.sciencemediacentre.org/expert-reaction-to-questions-about-covid-19-and-viral-load/

https://www.vox.com/future-perfect/2020/4/24/21233226/coronavirus-runners-cyclists-airborne-infectious-dose

https://www.erinbromage.com/post/the-risks-know-them-avoid-them

सबस्क्राईब करा

* indicates required