computer

जखम, सूज, मुका मार यांच्यावर बर्फाचा शेक देताय? मग त्या मागचं शास्त्र एकदा वाचून घ्या!!

तुम्हाला ती कैलास जीवनची जाहिरात आठवते? तिचे शब्द होते, "बोट कापलं? हाताला भाजलं? पायाला भेगाही पडल्यात?... अहो, मग कैलास जीवन लावा...'' बारीकसारीक इजांसाठी कैलास जीवनादी मलमं आहेतच, पण त्याहून स्वस्त आणि सहज उपलब्ध होण्यासारखा, सर्व प्रकारच्या जखमा, सूज, मुका मार यांच्यावरचा साधासोपा इलाज तर आपल्या स्वयंपाकघरातच आहे. तो आहे बर्फ. बर्फ हा प्रत्यक्ष औषधाचं काम करत नसला तरी प्रथमोपचार किंवा सहायक उपचार म्हणून नक्कीच कामाला येतो. त्याच्यामुळे प्रत्यक्ष उपचार होत नसले तरी आराम पडतो. ठणकत असलेला अवयव बर्फाचा शेक दिल्याने ठणकायचा थांबतो हा सर्वसामान्य अनुभव आहे. पण नक्की ही आईस थेरपी आहे तरी काय?

त्यासाठी मुळात बर्फ काय करतो ते पाहू. 

कुठेही जखम झाली किंवा खरचटलं की रक्त येऊ लागतं. ही जखम भरून काढण्यासाठी शरीराची नैसर्गिक यंत्रणा काम करायला लागते. त्या जागी होणारा दाह (इन्फ्लमेशन) ही जखम भरून येण्याच्या प्रक्रियेचाच एक भाग आहे. टिश्यूजचं वाढलेलं तापमान, लालसरपणा, सूज ही सगळी त्याचीच लक्षणं आहेत. त्या ठिकाणी शरीर जास्त प्रमाणात रक्त आणि पांढऱ्या पेशी पाठवतं. त्या जागी बर्फाचा शेक दिल्यास बर्फ हा वाढीव रक्तपुरवठा कमी करतो. या क्रियेला व्हासोकॉन्सट्रिक्शन म्हणतात. यामुळे सूज कमी होते. जखम झाल्यावर त्या ठिकाणी वेदनेच्या संवेदना (पेन सिग्नल्स) निर्माण होतात आणि थेट मेंदूपर्यंत पोहोचतात. शरीरात अमुक एका ठिकाणी काहीतरी गडबड आहे, तिकडे ताबडतोब सैनिक पेशी पाठवा हा आदेश मेंदू शरीराला देऊ शकतो ते या सिग्नल्समुळेच. हे पेन सिग्नल्स बर्फाच्या शेकाने निष्प्रभ होतात. त्यामुळे वेदना कमी होतात.  

पण हा बर्फाचा शेक घेताना काही गोष्टी लक्षात घ्या. 

१. सर्वप्रथम बर्फ थेट जखमेवर किंवा सूज आलेल्या, मुकामार लागलेल्या जागी ठेवू नका. पातळ कापडाची पिशवी, टॉवेल यांचा लेयर बर्फ आणि त्वचा यांच्यात असू द्या.  

२. बर्फ वर्तुळाकार हळूहळू फिरवत मसाज करा. बर्फ एकाच ठिकाणी जास्त वेळ ठेवू नका. 

३. बर्फाचा शेक एका वेळी १५ मिनिटांपेक्षा जास्त नको, आणि दोन शेकांच्या मध्ये कमीत कमी ४५ मिनिटांचं अंतर हवं. एकाच वेळी १५-२० मिनिटांपेक्षा अधिक काळ बर्फ एकाच ठिकाणी चोळल्याने त्या ठिकाणच्या त्वचेच्या पेशींना दीर्घकाळ रक्तपुरवठा न झाल्याने इजा पोहोचू शकतो. 

४. बर्फाचा शेक घेणं कधी थांबवायचं हे समजण्यासाठी CBAN तंत्र वापरा. यात C म्हणजे कोल्ड (Cold), B म्हणेज बर्न (Burn), A म्हणजे एक (Ache), आणि N म्हणजे नंब (Numb). याचा अर्थ बर्फ लावल्यावर सगळ्यात आधी थंडगार वाटतं(Cold), मग किंचित चुरचुरतं(Burn), काही मिनिटांनी परत वेदना सुरू होतात(Ache) आणि त्यानंतर थोड्याच वेळात तो भाग बधिर होऊ लागतो(Numb). जेव्हा ती जागा बधिर होते तेव्हा बर्फ लावणं थांबवायला हवं. 

५. बर्फाचा शेक घेताना, शक्यतो जखम झालेला अवयव हृदयाच्या वरच्या बाजूला येईल अशा बेताने ठेवा. 

बर्फाचा शेक घेताना बर्फाची पिशवी वापरली जाते. त्याशिवाय इतरही काही साधनं वापरून तोच परिणाम मिळतो. उदाहरणार्थ, पेपर कप्समध्ये पाणी भरून डीप फ्रीझ करून बनवलेला आईस कप, फोझन फूडच्या पिशव्या आणि विशिष्ट अवयवासाठी कस्टमाईझ्ड डिझाईन केलेले बाजारात मिळणारे विविध आईसिंग प्रॉडक्ट्स प्रत्यक्ष बर्फाच्या ऐवजी वापरता येतात. 

एक मात्र खरं, बर्फ़ाने शेक देणं हा काही कायमस्वरूपी उपचार नाही अथवा वैद्यकीय उपचारांना पर्यायही नाही. त्यामुळे जखम मोठी असेल, वेदना थांबत नसतील, किंवा सूज कमी होत नसेल तर लवकरात लवकर वैद्यकीय उपचार घेतलेले कधीही चांगले.

 

लेखिका: स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required