computer

ही कडकनाथ कोंबडी काय प्रकरण आहे? अयाम सेमानी आणि कडकनाथ हे एकच की कसे? सगळी उत्तरे इथेच मिळतील...

कडकनाथ कोंबडी हे नाव थोडे वाचायला आणि ऐकायला वेगळे विचित्र वाटते. नाव जसे भन्नाट आहे, तशीच कोंबडीची ही जातही लोकांच्या चांगल्याच आवडीची आहे. गेली काही वर्षं महाराष्ट्रात कडकनाथ कोंबडी गाजत आहे. २०१८ साली कडकनाथला जीआय नामांकनही मिळाले. तर मग या कडकनाथबद्दल अजून काही माहितीची भर आमच्या वाचकांमध्ये घालावी म्हणून या लेखाचे निमित्त झाले. अनेकांना कडकनाथ आणि अयाम सेमानी हे एकच वाटतात तो फरकसुद्धा वाचकांना या निमित्ताने समजून येईल.

कडकनाथ कोंबडीचे वैशिष्ट्य म्हणजे यांची प्रत्येक गोष्ट काळी असते. मांस, चोच, अंडी... पूर्ण शरीर काळे असते. देशातील हे एकमेव डार्क चिकन आहे. काही संशोधनांनुसार यात कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असल्याचे सांगितले जाते. यात चरबी कमी असते. या सर्व गोष्टींचा थेट फायदा डायबेटीस आणि हृदयरोगींना होताना दिसतो. बॉयलर कोंबडीच्या तुलनेत यांची चव चांगली असते. या कोंबड्यांमध्ये अमिनो ऍसिडची पातळी जास्त असते. एकेकाळी खुद्द विराट कोहलीला देखील कडकनाथ खाण्याचा सल्ला देण्यात आला होता.

कडकनाथचा उगम होतो तो म्हणजे मध्य प्रदेशातील झाबुआ या भागात. पुढे जाऊन कडकनाथ महाराष्ट्रासहित, आंध्र, छत्तीसगढ, तमिळनाडू येथे पण दिसू लागल्या. कडकनाथच्या प्रजाती म्हणाव्यात तर त्या तीन आहेत: पेन्सिल, जेड ब्लॅक आणि गोल्डन.

गोल्डन कडकनाथच्या पंख्यांवर सोनेरी छिद्रं असतात. जेड ब्लॅकचे पंख पूर्ण काळे असतात. पेन्सिल म्हटले म्हणजे पंख पेन्सिलच्या आकाराचे आहेत. म्हणजे बरोबर त्या विशेषतेप्रमाणे या प्रकारांना नावे देण्यात आली आहेत. कडकनाथच्या रक्ताचा वापर हा अनेक रोगांमध्ये केला जातो आणि त्यांचे मांस देखील कामोत्तेजक म्हणून वापरले जाते.

सामान्य कोंबड्याची प्रोटीन क्षमता ही १८ ते २० टक्के असते. मात्र कडकनाथ कोंबड्यांमध्ये हीच क्षमता २५ टक्के असते. देशाचा क्रिकेट सुपरस्टार धोनीही कडकनाथ व्यवसायात उतरलेला आहे. सामान्य कोंबडीच्या मानाने कडकनाथची किंमत ही २० ते ३० टक्के जास्त असते.

आता अयाम सेमानी आणि कडकनाथमधील फरक समजून घेऊ.

आयम सेमानी ही इंडोनेशियातील कोंबडीची दुर्मिळ जात आहे. या कोंबड्यांमध्ये एक डॉमीनंट जीन म्हणजे प्रबळ जनुक असते. यामुळे हायपरपिग्मेंटेशन (फायब्रोमेलॅनोसिस) होते आणि कोंबडी बहुतेक काळी बनते. यात मग पंख, चोच आणि अंतर्गत सगळेच अवयव येतात. बहुतेकदा रंगसाधर्म्यामुळे या दोन कोंबड्यांची तुलना केली जाते. अयाम सेमानीची अंडी ही पूर्ण काळी नसतात. ती क्रीम रंगाची असतात. जावा बेटांवर या जातीची कोंबडी ही परंपरेचा भाग म्हणून खाल्ली जाते. अयाम सेमानी खाणे हे तिथे स्टेटस सिम्बॉल समजले जात असते. त्याचप्रमाणे ही कोंबडी पण अनेक रोगांसाठी उपयोगी समजली जाते.

किंमतीच्या बाबतीतही अयाम सेमानी ही कडकनाच्या तुलेनेने अतिशय महाग आहे. कारण कडकनाथपेक्षा अयाम सेमानीची संख्या ही मोजकी समजली जाते. तसेच अयाम सेमानी ही प्रजाती टिकवण्यासाठी देखील अनेक प्रयत्न होताना दिसत आहेत.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required