computer

शेवग्याच्या पाने: पुराणकथा ते स्वस्त-सहज उपलब्ध असा हिमोग्लोबिन आणि क्षयरोगावरचा उपाय!!

लोकप्रिय देवांचा 'पॉप्युलारीटी इंडेक्स' बनवायचा ठरला तर जास्तीतजास्त मतं कृष्णाला मिळाली असती यात शंका नाही. चार शब्द पुढे जाऊन असंही म्हणता येईल की 'योगेश्वर कृष्ण' या प्रतिमेपेक्षा ' बाळकृष्ण' किंवा 'कान्हा' ही प्रतिमा अधिकच लोकप्रिय आहे! उद्या जन्माष्टमीचा सण आहे. सण म्हटला की त्यानुसार खाणंपिणं आलंच. देवाला नैवेद्य म्हणजे आपली खाण्याची चंगळ हे काही वेगळं सांगायला नकोच. उत्तरेत मथुरा पेढे, लोणी, साखर, मखाणे घालून केलेली पंजीरी, टरबूजाच्या बियांची बर्फी  असा थाट असतो. तर दक्षिणेत वेगवेगळ्या खिरी म्हणजे पायसमची रेलचेल असते. पण प्रादेशिक समृध्दीनुसार हे नैवेद्याचे प्रकारही बदलत असतात.  

कोकणात ज्या दिवशी गोविंदा असतो त्या दिवशी घावने, काळ्या वाटाण्याची उसळ यांच्या जोडीला एक वेगळीच भाजी केली जाते ती म्हणजे शेवग्याच्या पाल्याची भाजी. आता ही भाजी चवीला काही विशेष नसते. इतर पालेभाजीसारखी ही पण भाजीच. थोडी तुरट, कडवटपण असते. तर मग काल्याच्या दिवशी या भाजीचं असं काय महत्व आहे हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयास केला. थेट असं उत्तर कोणाकडेच नव्हतं. पण बोभाटाचे मित्र श्रीयुत पाटणकर यांनी एका लोककथेतून ते  रहस्य उलगडून सांगितलं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तर ती लोककथा अशी!!

पांडव अज्ञातवासात वनात असताना एक दिवशी दुर्वास ऋषी पांडवांकडे आले. त्यांच्या सोबत इतर ॠषीही होते.  आम्ही स्नान करून येतो तोपर्यंत जेवणाची तयारी करा असा आदेश देऊन निघून गेले. द्रौपदीला मोठाच प्रश्न पडला कारण नुकतीच सगळ्यांची जेवण आटपून तिने भांडीकुंडी स्वच्छ करून पालथी ठेवलेली होती. हाताशी शिधादेखील नव्हता. आता तिने कृष्णाचा धावा सुरु केला. अकस्मात श्रीकृष्ण हजर झाला आणि द्रौपदीला म्हणू लागला,"मलाही भूक लागली आहे काहीतरी, लवकर खायला दे." द्रौपदीने त्याला सांगितलं की घरात आता शिधाही शिल्लक नाही. त्यावर कृष्ण म्हणाला, "भांड्याला काहीतरी लागलेला असेल, बघ बघ तरी!"  द्रौपदीने बघितलं. भांड्याच्या तळाला एक इवलेसे पान होते. श्रीकृष्ण म्हणाला ते मला दे. त्या पानाने श्रीकृष्णाची भूक भागली. तेव्हापासून ते अक्षयपात्र कधीच रिकामे झाले नाही. कितीही लोक आले तरी त्या पात्रातले जेवण संपत नसे. तेच हे द्रौपदीचे अक्षय पात्र! 

या पात्राला जे इवलेसे पान चिकटलेले होते ते म्हणजे शेवग्याचे पान! तेव्हापासून कृष्णअष्टमीला शेवग्याच्या पानाची भाजी करण्याची प्रथा सुरू झाली. 

ही झाली लोककथा. पण आजच्या काळातही याच शेवग्याच्या पानांचा औषध म्हणून वापर करून अनेक क्षयरोग्यांना संजीवनी देणार्‍या एका डॉक्टरांची-डॉ. ललितकुमार आनंदे- ओळख आम्ही तुम्हाला करून देणार आहोत. 

डॉ. ललितकुमार आनंदे बृहनमुंबई महानगरपालिकेच्या शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत. या रुग्णालयात क्षयरोगाने ग्रासलेल्या रोग्यांची गर्दी असते. त्यांना तपासताना डॉक्टरांच्या असे लक्षात आले की समाजाच्या तळागाळातून आलेल्या रोग्यांना महापालिकेकडून औषध मिळते. पण रोगाशी झगडण्यासाठी जो आहार असावा लागतो तो त्यांना परवडत नाही. परिणामी रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढत नाही. यानंतर त्यांनी जो अभ्यास सुरु केला त्यात त्यांना संजीवनीच सापडली असे म्हणता येईल.

आहारातील ओरॅक म्हणजे Oxygen Radical Absorbance Capacity या गुणधर्माचा अभ्यास करताना त्यांना असे आढळले की शेवग्याच्या पानात  Moringa oleifera  शरीरातील फ्री रॅडीकलचा सामना करण्याची शक्ती ओरॅक रेटींगमध्ये खूपच उच्च दर्जाची आहे. आता शेवग्याची पानं आणि शेंगा तर कुठेही मिळतात. रोग्यांनी त्याचा वापर केल्यास काहीच आठवड्यात हिमोग्लोबीनचे प्रमाण सुधारते आणि क्षय रोगाशी टक्कर घेण्यास रोगी समर्थ होतो. 

यानंतर आपल्या कर्तव्य क्षेत्राच्या आणि तासांच्या बाहेर जाऊन त्यांनी शेवग्याच्या पानांचे महत्व समजावून सांगायला सुरुवात केली. गर्दीच्या ठिकाणी जाऊन शेवगा थेरपीचा प्रचार केला. अनेक रोग्यांच्या रक्तात हिमोग्लोबीन वाढून त्यांना जीवदान मिळाले. 'मुंबई मिरर' या वर्तमानपत्राने त्यांचा सुधा मूर्ती यांच्या हस्ते गौरव केला. आजही त्यांचे प्रयत्न अव्याहत चालूच आहेत. 

आज आम्ही लेख लिहिताना डॉ ललितकुमार आनंदे  करोना योध्दा म्हणून २४ तास कार्यरत आहेत. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की शेवग्याच्या पानाची प्रचिती देण्यासाठी कृष्ण कसा येईल ते काही सांगता येत नाही. 

आमच्या वाचकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा !!

 

लेखक : रविप्रकाश कुलकर्णी

सबस्क्राईब करा

* indicates required