computer

DRDO चे नवे औषध कोव्हीड रुग्णांना संजीवनी देणार का ?

संपूर्ण देशाला कोव्हीडच्या संसर्गाने वेढले असतानाच आज एक अत्यंत आशादायक बातमी आली आहे जी आमच्या बोभाटाच्या वाचकांनी वाचलीच पाहिजे अशी आहे. 
Drugs Controller General of Indiaड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडीयाने, 'इनमास' या संस्थेने तयार केलेल्या 2-DG या औषधाला कोव्हीडवर तातडीचा उपाय म्हणून वापरण्यास मान्यता दिली आहे.
इनमास-- इन्स्टीट्यूट ऑफ न्युक्लीअर मेडिसीन अँड अलाइड सायन्सेस ही भारत सरकारच्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचा (DRDO) एक भाग आहे. 2-DG या नावाने ओळखल्या जाणार्‍या या औषधाचे संशोधन आणि विकास इनमासने हैद्राबाद येथील डॉ.रेड्डीज या खाजगी क्षेत्रातील औषध कंपनीच्या सहयोगाने करण्यात आला आहे. 
 

आता जाणून घेऊ या औषधाची उपयुक्ततता !

हे औषध पावडर स्वरुपात उपलब्ध होते. पाण्यात विरघळवून रोग्याला ते सहज घेता येते. हे औषध मानवी पेशींमध्ये पोहचल्यावर पेशीत घुसखोरी केलेल्या व्हायरसची वाढ थांबवते.व्हायरसने ग्रासलेल्या पेशींमध्ये उर्जा निर्मिती होण्याचे कार्य हे औषध थांबवते. परंतु इतर सशक्त असंसर्गीत पेशींवर त्याचा परिणाम होत नसल्याने व्हायरस  संसर्ग थांबवण्यासाठी हे औषध निर्धोक आहे असे आता सिध्द झाले आहे. या औषधाच्या सेवनाने रोगी बरा होण्यास लागणारा कालावधी लक्षणीय रित्या कमी होतो. बाहेरून देण्यात येणार्‍या प्राणवायूवरचे अवलंबीत्व कमी होते.

हे औषध 2-DG- शास्त्रीय नाव  (2-Deoxy-D-glucose) कसे काम करते ते आता समजून घेऊ या.

मानवी शरीराच्या पेशींवर प्रोटीनचे आवरण असते. याला प्रोटीन-वॉल असे म्हणतात. कोणत्याही औषधाच्या रेणूला पेशीच्या आत सहज प्रवेश मिळत नाही. प्रवेश मिळवण्यासाठी पेशीच्या अंतर्गत असलेल्या काही रसायनांची मदत मिळाल्यास औषधाचे रेणू आत पोहचू शकतात.. 2-DG हे प्रकारचे ग्लुकोज आहे.त्याला पेशीत प्रवेश देण्याचे काम 'ग्लुकोज ट्रान्सपोर्टर' हे पेशीच्या अंतर्गत असलेले रसायन करते. सोप्या भाषेत सांगायचे तर औषधाला पेशीत आत पोहोचण्याचा 'गेटपास' देण्याचे काम ग्लुकोज ट्रान्सपोर्टर करते. सर्वसाधारणपणे ग्लुकोजचे रेणू पेशींना उर्जा देण्याचे काम करतात व्हायरसने संसर्गीत पेशींना इतर पेशींपेक्षा अधिक उर्जेची गरज असते पण  2-DG चे रेणू ही उर्जा बनवण्याचे काम स्थगित करतात त्यामुळे संसर्गीत पेशी उपाशी राहून मरतात. त्याच वेळी असंसर्गीत पेशींना या  2-DGचा काहीही उपद्रव होत नाही. यालाच शास्त्रीय भाषेत याला 'सिलेक्टीव्ह' असणे असे म्हणतात.या गुणधर्मामुळे 2-DG हे निर्धोक समजले जाते.

'क्लिनीकल ट्रायल'च्या तीन फेज पूर्ण !

शास्त्रज्ञांना या गुणधर्माची माहिती आधीपासून आहे. कॅन्सरग्रस्त ट्यूमरची वाढ थांबवण्यासाठी 2-DG चा वापर करण्याच्या उद्देशाने बरीच वर्षे 2-DG वर संशोधन सुरु आहे. मानवी शरीर 2-DG चे किती प्रमाणात ग्रहण करू शकते याचा संख्यात्मक अंदाज आधीच तयार आहे. हेच तंत्र व्हायरसची वाढ थांबव्यसाठी वापरता येईल याचा अंदाज आतापर्यंत कोणी केला नव्हता त्यामुळे हे औषध- ज्याला औषधशास्त्रात 'मॉलीक्यूल' असे संबोधन आहे -ते आजपर्यंत वापरले गेले नव्हते. पण  मे  २०२० ते मार्च २०२० या दरम्यान इनमासने 'क्लिनीकल ट्रायल'च्या तीन फेज पूर्ण केल्यावर आता DCGI तातडीचे आपत्कालीन औषध म्हणून 2-DG मान्यता दिली आहे. 

आता या संशोधनातले महतावे टप्पे समजून घेऊ या

एप्रील २०२० फेज-१
इनमास-डीआरडीओ आणि सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलीक्युलर बायोलॉजी या संस्थांनी प्रयोगशाळेत केलेल्या संशोधनात असे आढळले की कोव्हीडच्या व्हायरसच्या वाढीला आळा घालण्याचे काम  2-DG करते.
फेज-२
यानंतरच्या दुसर्‍या टप्प्यात  Drugs Standard Control Organization (CDSCO) या सरकारी संस्थेकडून परवानगी घेऊन कोव्हीडच्या काही रोग्यांना हे औषध देण्यात आले. या चाचण्या ऑक्टोबर २०२० पर्यंत करण्यासाठी डॉ रेड्डीज या खाजगी औषध कंपनीची मदत घेण्यात आली.एकूण ६ हॉस्पीटल्मध्ये या चाचण्या घेण्यात आल्या. या औषधाचा किती प्रमाणात वापर करायचा हे तपासण्यासाठी phase -IIb करण्यात आली ज्यामध्ये ११ हॉस्पीटलच्या ११० रोग्यांना हे औषध देण्यात आले.
फेज -३
यानंतर नोव्हेंबर २०२० ते मे २०२० या दरम्यान देशातल्या वेगवेगळ्या राज्यातील २२० रोग्यांना या औषधाचे डोज देण्यात आले. फेज-३ चे सर्व फलीत आणि त्याचे आकडे डिसीजीआयला दिल्यावर १ मे रोजी इतर औषधांच्या सोबत तातडीची निकड भासल्यास या औषधाचा वापर करण्याची परवानगी डीआरडीओला देण्यात आली आहे. फेज ३ मध्ये ६५ वर्षांच्या वर असलेल्या रोग्यानांही आराम पडल्याचे लक्षात आले आहे.त्याखेरीज रोगी बरे होण्याचा कालावधी २.५ दिवसांनी कमी झालेला आढळला आहे.

येत्या काही दिवसातच या औषधाची उपयुक्ततता कळून येईल. जर उपयोग यशस्वी झाला तर हे आपल्या सर्वांच्या फायद्याचे असेल कारणहे औषध सहज बनवता येते,,मोठ्या प्रमाणात बनवता येते, खर्चही कमी आहे. 
येत्या काही दिवसात येणार्‍या बातम्यांवर आपण नजर ठेवू या !

सबस्क्राईब करा

* indicates required