computer

जन्मानंतर ११ मिनिटांनी पाहिला श्वास घेणारे बाळ....त्या ११ मिनिटात काय घडलं होतं?

जन्माला आलेल्या क्षणापासून तो योध्दा आहे हे सिध्द कराव्या लागणार्‍या एका नवजात शिशूची ही कथा आहे. असं काय घडलं होते त्या बाळासोबत? अशी कोणती लढाई त्याला जन्माला येतानाच लढावी आणि जिंकावी लागली? चला जाणून घेऊ या चिरंजीवाची कथा !

हा योद्धा आहे उत्तर बंगळुरूच्या रेनबो चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये नुकतेच जन्मलेले बाळ.. या बाळाला आपला पहिला श्वास घेण्यासाठी तब्बल ११ मिनिटे झगडावे लागले. हे बाळ फ्लॅपी कंडिशनमध्ये म्हणजे शरीरावर कोणतेही नियंत्रण नसलेले- जन्माला आले होते. म्हणजेच जन्म झाल्यावर ते श्वास घेऊ शकत नव्हते की रडू शकत नव्हते किंवा त्याचे हृदयाचे ठोकेही ऐकू येत नव्हते. शरीराची, श्वासोच्छवासाची कोणतीही हालचाल दिसून येत नव्हती. जवळजवळ मृतवत अवस्थेत ते जन्माला आले होते. पण ते 'जवळजवळ' मृतावस्थेत होते, म्हणजे अजूनही जीवनाची धुगधुगी शिल्लक होती. आणि पुढच्या ११ मिनिटात तो चमत्कार घडला, बाळाने श्वास घ्यायला सुरुवात केली.

बाळाला पहिल्या दिवसापासून ट्रीटमेंट देणार्‍या बालरोगतज्ञ डॉ. एम. एस. श्रीधर  म्हणाले की बाळाच्या एकंदर अवस्थेमुळे त्याच्या पालकांना खूप मोठा मानसिक धक्का बसला होता. ते निराश झाले होते आणि सत्य मान्य करायला तयार नव्हते. पण हॉस्पिटलमधील तज्ञ बाळाला योग्य ती ट्रीटमेंट देत होते. त्यांना बाळाच्या आरोग्यासंबंधित आत्ताच्या व भविष्यात येणार्‍या गोष्टींना सामोरे जाण्याची सारी कल्पना पालकांना दिली. त्यांचे समुपदेशनदेखील करण्यात आले. 

रेनबो हॉस्पिटलचे आणखी एका तज्ञ डॉक्टर प्रदीप कुमार यांच्या म्हणण्यानुसार बाळाचा जन्म सामान्य पद्धतीने झाला असला तरी  बाळाचे APGAR गुण खूपच कमी होते. त्यामुळे या साऱ्या गुंतागुंती तयार झाल्या.

APGAR स्कोअर असा पाहतात.. जन्माला आलेल्या बाळाचा

१. त्वचेचा रंग 
२. हृदयाचे ठोके 
३. संवेदन क्षमता 
४. स्नायूंचे बळ आणि  
५. श्वासोच्छवास 
या सर्वांचे गुणांकन (स्कोअर) म्हणजे APGAR . हे गुण १ ते १० अशा मोजपट्टीवर मोजले  जातात. जन्मानंतर लगेच आणि त्यानंतर ५ मिनिटांनी हा  APGAR  स्कोअर बघितला जातो. या बाळाचा APGAR स्कोअर फारच कमी असल्याने त्याचा श्वास सुरु करण्याची खटपट आधी करण्यात आली.

पहिला श्वास आणि उपचार.

बाळाला श्वास घेता यावा यासाठी newborn resuscitation technique म्हणजे श्वास सुरु करण्यासाठी वापरायचे तंत्र वापरल्यावर ११ व्या मिनिटाला बाळाने पहिला श्वास घेतला.  पण तरीही बाळाच्या जीवाला धोका कायम होता. मेंदूला ऑक्सिजन न मिळाल्याने आणखी गुंतागुंत वाढली होती.

या गुंतागुंतीचे नाव होते 'Hypoxic Ischemic Encephalopathy'म्हणजे प्राणवायूच्या कमतरतेमुळे मेंदूंच्या पेशी नाश पावायला लागतात. यावर एकच उपाय आहे तो म्हणजे  'Therapeutic Hypothermia Method' ज्याला दुसर्‍या शब्दात 'Whole Body Cooling Method' असे ही म्हणतात.  या थेरपीत शरीराचे तापमान २४ तास ८९ डिग्री फॅरनहिटपर्यंत खाली आणले जाते. ही थेरपी  नवजात बालकांत वापरण्याची  शक्यता फार कमी असते. 

Therapeutic Hypothermia थेरपीनुसार बाळाच्या शरीराचे तापमान कमी/थंड ठेवले गेले व त्यानंतर १२ तासांत बाळाचे शारीरिक तापमान पुन्हा उबदार केले गेले. या दरम्यान त्याच्या प्रत्येक लहानमोठ्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात आले होते. तसेच बाळाला मधूनच येणार्‍या झटक्यांवरही (मेंदूच्या कार्यावर नियंत्रण नसल्याने शरीराला बसणारे शॉक्स किंवा झटके) योग्य उपचार केले गेले.

यानंतर या चिरंजीवांची तबियत एकदम सुधारली. मेंदूला सूज अथवा इतर काही धक्का पोहचला नाही याची खात्री करण्यासाठी बाळाचा ' MRI Scan' करण्यात आला. 'MRI Scan चा 'निष्कर्ष सामान्य आल्यानंतर बाळाला हॉस्पिटल मधून घरी पाठवण्यात आले.

खरंच या लढवय्या बाळाने डॉक्टरांच्या मदतीने धावून आलेल्या देवाच्या मदतीने जगण्याची जिद्द दाखवत मृत्युशी असलेली लढाई जिंकली आहे.

(बाळाचे सर्व फोटो प्रातिनिधिक)

 

लेखिका: मानसी चिटणीस

सबस्क्राईब करा

* indicates required