केरळात पुन्हा निपाह व्हायरस आला आहे? याची लक्षणं आणि संक्रमणाची कारणं काय आहेत?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती अजून संपली नाहीय. त्यातच आता केरळात निपाह वायरसमुळे एका बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने देशभर चिंता पसरली आहे. याच निपाह वायरसचे सध्या केरळात काय स्टेटस आहे आणि त्याला कसे रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत हे जाणून घेऊया.

ज्या मुलाचा मृत्यू झाला त्याच्या संपर्कात आलेल्या २५१ लोकांना विलग करण्यात आले आहे. तसेच लागलीच केंद्र सरकारने पण आपली टीम केरळात पाठवली आहे. केंद्र सरकारच्या टीमने आपल्या तांत्रिक सहकार्यासोबतच हा आजार रोखण्यासाठी कसे उपाय करता येतील याचे पण मार्गदर्शन केले आहे.

केरळ सरकारने पण कोझीकोडे आणि त्याच्या आजूबाजूचे जिल्हे मलप्पूरम आणि कन्नूर या जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा घोषित केला आहे. ज्या २५१ लोकांना विलगीकरणात ठेवले आहे त्यातल्या ११ जणांना लक्षणे असलेली आढळून आली असल्याचे केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. ११ पैकी ८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे, पण अजूनही ३ लोकांचे रिपोर्ट बाकी आहेत.

केरळमधील पशुसंवर्धन विभागाने निपाहमध्ये बळी गेलेल्या मुलाच्या गावातून म्हणजेच चथामंगलम येथून फ्रुट बॅटचे सॅम्पल गोळा केले आहेत. मुलाच्या कुटुंबियांनी आपल्या घराजवळ आणि झाडांवर सातत्याने हे फ्रुटबॅट दिसून येत असल्याचे सांगितले आहे. तसेच सहज दूषित केले जाऊ शकणाऱ्या रंबुटान नावाच्या फळांचेही नमुने घेण्यात आले आहेत.

केंद्र सरकारकडून केरळ राज्याला अजून शोधकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पीडित मुलगा जिथे राहत होता तो पूर्ण परिसर सील करण्यात आला असून घरोघर जाऊन तपासणी केली जात आहे. तसेच अधिकची काळजी म्हणून कोझीकोडे मेडिकल कॉलेजला आर टी पी सी आर टेस्ट आयोजित करण्यात येणार आहे.

केरळात निपाह वायरस पहिल्यांदा उदभवला असेही नाही. याआधी २०१८ साली आलेल्या वायरसमध्ये तेथे १७ लोकांना जीव गमवावा लागला होता. तेव्हा देखील याची चर्चा देशभर रंगली होती. कोरोनाचे मोठे रुग्ण केरळात आढळून येत असताना आता या नव्या वायरसने चिंतेत भर घातली आहे.

निपाह वायरस हा प्राण्यांतून माणसांमध्ये संक्रमित होणारा आजार आहे. तसेच हा अन्नातून आणि थेट माणसांमधून माणसांमध्ये संक्रमित होऊ शकतो. याची लक्षणे डोकेदुखी, ताप, खोकला, उलटी आणि श्वसनास त्रास हे सांगितले जातात. यासाठी पण कोणताही थेट असा उपचार किंवा लस अजून उपलब्ध नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required