computer

पाणी शुद्ध करण्यासाठी फक्त एक झाकण पुरेसं आहे...वाचा भारतीय संशोधकाच्या 'क्रेझी कॅप'बद्दल !!

पूर्वी पितळेचे फिरकी तांबे घेऊन लोक प्रवास करत असत. त्यानंतर काचेच्या बाटल्या आल्या. प्लॅस्टिकचा वापर सर्रास सुरु झाल्यावर वॉटरबॅग -वॉटर बॉटलचे दिवस आले. प्रवासात पाणी पिण्याची सोय झाली खरी, पण ते पाणी स्वच्छ-अस्वच्छ शुध्द -अशुध्द जसे मिळेल तसेच प्यावे लागायचे. परिणामी प्रवासाच्या दरम्यान आजारी पडण्याचे प्रमाण बरेच होते. गेल्या काही वर्षात 'पॅकेज्ड ड्रिकींग वॉटर' म्हणजे आपल्या रोजच्या भाषेत 'बिसलेरी' आली आणि शुध्द स्वच्छ आरोग्यदायक पाणी मिळण्याची सोय झाली. ही सोय झाली खरी, पण एका लिटरमागे कमीतकमी २० रुपये मोजावे लागतात, ते पाणी खरेच मिनरल वॉटर आहे का याची खात्री नसते आणि सोबत प्लास्टिकचा कचरा वाढत जातो ही बाब पण महत्वाची आहे.

अमेरिकेत राहणार्‍या एका भारतीय तरुणाने-राजेश गुडुरु- या संशोधकाने यावर नामी उपाय शोधून काढला आहे. त्याच्या उपक्रमाचे नाव आहे 'क्रेझी कॅप'!! कॅप म्हणजे बाटलीचे झाकण. या झाकणातून बाटलीत भरलेल्या पाण्यात अल्ट्रा-व्हायोलेट किरणांचा झोत सोडला जातो आणि काही क्षणांत पाण्यात मिसळलेल्या बॅक्टेरिया आणि व्हायरसेसचा खातमा केला जातो. क्रेझी कॅपची आणखी माहिती घेण्यापूर्वी राजेश गुडुरु यांच्याबद्दल थोडी माहिती वाचू या.

मूळचे हैद्राबादच्या राजेश यांनी त्यांचे उच्च शिक्षण अमेरिकेतील फ्लोरिडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीतून डॉक्टरेट मिळवून पूर्ण केले आहे. या दरम्यान त्यांना नोबेल पारितोषक विजेत्या संशोधकांसोबत काम करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला बायोमेडिकल क्षेत्रात काम केल्यानंतर त्यांनी त्यांच्या संशोधनाची दिशा बदलली. इंजीनियरींगचे ज्ञान वैद्यकीय क्षेत्रात कसे वापरता येईल यावर त्यांनी संशोधन केले. या विषयातील अनेक पेटंटची नोंद त्यांच्या नावाने आहे. या संशोधनासाठी प्रवास करताना स्वच्छ-शुध्द पाण्यासाठी त्यांनी पोर्टेबल अल्ट्रा व्हायोलेट मशीन वापरायला सुरुवात केली. असे मशीन प्रवासात वाहून नेणे गैरसोयीचे होते आणि त्यातूनच 'क्रेझी कॅप'चा जन्म झाला.

क्रेझी कॅप आहे तरी कसे?

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर हे पाण्याच्या बाटलीचे झाकण आहे. या झाकणात एलइडी वापरून अल्ट्रा व्हायोलेट किरणांचा झोत निर्माण केला जातो. हा झोत बाटलीतल्या पाण्यात पसरला की पाण्यात असलेले सर्व विषाणू नष्ट होतात.

यासाठी बाटली कोणती वापरायची?

आपण रोजच्या वापरात पाण्याची जी बाटली वापरतो ती बाटली वापरता येते. फरक इतकाच आहे की झाकण फक्त बदलायचे. त्यामुळे क्रेझी कॅप म्हणजे फक्त झाकणसुध्दा विकत घेऊन चालते. बाटली सोबतही केझी कॅप मिळते. पर्याय ग्राहकाने निवडायचा आहे.

आता बघू या क्रेझी कॅप कशी वापरली जाते.

१. बाटलीत पाणी भरून घ्या. हे पाणी नळाचे असू शकते किंवा तलावातून किंवा नदीतूनही थेट घेतले तरी चालते. डोळ्यांना स्वच्छ दिसणारे असे कोणतेही पाणी घेतले तरी चालेल. डबक्यातले चिखलयुक्त नसावे.

२. बाटलीला क्रेझी कॅप लावा. जर नळाचे पाणी घेतले असेल तर झाकणच्या वर असलेले पॅड दोनदा दाबा. जर नदी-तळ्यातून पाणी घेतले असेल तर पॅड पाचवेळा दाबा. पाण्यात अल्ट्राव्हायोलेटचा झोत प्रवाहीत होईल.

३. ६० सेकंद थांबा. या ६० सेकंदांत पाणी पूर्णपणे निर्जंतुक झालेले असेल.

४. आता पाणी प्यायला हरकत नाही.

५. प्रत्येक चार तासाच्या अंतराने क्रेझी कॅपचा अल्ट्रा व्हायोलेट किरणांचा मारा आपोआप चालू होतो आणि बंद होतो. परिणामी शिल्लक असलेल्या पाण्यात बॅक्टेरीया किंवा बुरशीचा नव्याने प्रसार होत नाही. त्याखेरीज इतर बाटल्यांत साठवलेल्या पाण्याला येतो तसा वासही येत नाही.

आता काही इतर प्रश्न मनात येतील त्याची पण उत्तरे शोधूया.

क्रेझी कॅपची बॅटरी कशी चार्ज करायची असते?

सोपं आहे, चार्जींगसाठी पोर्टलेस म्हणजे खाच्यात न जाणारी युएसबी केबल सोबत दिली जाते. ती प्लगला जोडून कॅपवर ठेवा. चार तासांनी बॅटरी चार्ज होते.

अल्ट्राव्हायोलेट किरणांचा दुष्परिणाम काय असतो?

क्रेझी कॅपमध्ये वापरला जाणाऱ्या अल्ट्राव्हायोलेटच्या तरंगांची लांबी २७८nm इतकी असते. हा तरंगपट्टा कोणत्याही प्रकारे आरोग्यास हानीकारक नाही.

बोभाटा क्रेझी कॅपचा प्रचार करते आहे का ?

नाही. एका भारतीय शास्त्रज्ञाने तयार केलेले हे उत्पादन सध्याच्या व्हायरसग्रस्त वातावरणात आपल्याला सगळ्यांना उपयुक्त आहे असे वाटल्याने हा लेख लिहिला आहे. क्रेझी कॅपचा वापर करण्याचा आग्रह आम्ही करत नाही. एक विशेष नोंद अशी की २०२० च्या उपयुक्त आणि नव्या संकल्पनांपैकी उपयुक्त म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या क्रेझी कॅपच्या संकल्पनेचा गौरव केला जातो आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required