computer

हे झाड खरंच डायबेटीसचं झाड आहे का? आम्ही याचा तपास केलाय !!

हे झाड 'इन्सुलिन' किंवा डायबेटीसचं झाड म्हणून ओळखलं जातं. या झाडाचं एक पान रोज खा आणि त्या पानातलं इन्सुलिन रक्तात असलेलं साखरेचं प्रमाण कमी करेल असा या झाडाबद्दल गवगवा आहे. उपनगरातल्या काही भागांतल्या भाजीबाजारात एक पान पाच रुपयांना विक्रीला उपलब्ध असतं. या सर्व माहितीतील सत्यता आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्यातून मिळालेली योग्य माहिती आज आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत. 

पहिल्यांदा आमच्यासमोरच्या झाड किंवा झुडूप जे काही असेल त्याची जातकुळी शोधून काढणं आवश्यक होतं.  म्हणून आम्ही प्लँटस्नॅप या अ‍ॅपचा वापर करून या झाडाचे फोटो काढले. हे अ‍ॅप फोटोसोबत वनस्पतीची पुरेशी माहितीही देते. ही झाली शोधाची पहिली पायरी. पण या अ‍ॅपने आम्हांला सरळ तोंडघशी पाडलं. हे झुडूप हे पण असू शकते, ते पण असू शकते असा 'नरो वा कुंजरो वा' असा पर्याय दिल्यावर मूळच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच नाही. इतकंच कळलं की 'कॉस्टस' प्रजातीतलं हे झुडुप आहे.

आता इतक्या सगळ्या पर्यायात नक्की उत्तर शोधायला गुगलबाबाचे पाय धरावेच लागले. मग गुगल लेन्सचा वापर केला आणि दुसर्‍याच क्षणात या झुडुपाची ओळख पटली. 'कॉस्टस इग्नियस' हे या वनस्पतीचं नाव निश्चितच कळलं. पण आता तुमच्यासमोर हा प्रश्न आला असेल की या उचापतींचा 'बोभाटा' करण्याची आवश्यकता काय? तर याचं उत्तर तुम्हाला आमच्या या लेखात मिळेल.

मधुमेहाचा आजार असलेल्या व्यक्तींच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण दोन्ही बाजूला झुकत असतं. जेव्हा रक्तातील साखर कमी होते तेव्हा त्याला हायपोग्लायसेमीया म्हणतात आणि ती वाढते तेव्हा त्याला हायपरग्लायसेमीया म्हणतात. दोन्ही प्रकारांत मधुमेही व्यक्तींच्या आरोग्याला धोका असतोच. मधुमेह किंवा ज्याला डॉक्टरी भाषेत डायबेटीस मेलीटस म्हणतात, तो असलेल्या व्यक्तींच्या रक्तातल्या साखरेची पातळी 'नॉर्मल' रहावी यासाठी जे उपाय केले जातात त्याला ग्लायसेमीक कंट्रोल म्हणतात. या ग्लायसेमीक कंट्रोलसाठी शरीलाला गरज असते 'इन्सुलिन'ची!  

कॉस्टस इग्नियसचे पान चावून चावून खाल्ले तर इन्सुलिनचा स्त्राव वाढतो. हा स्त्राव वाढला की रक्तातली साखर 'नॉर्मल' होते. आता पुढची पायरी होती की हे पान चघळून खरोखर इन्सुलिनचा स्त्राव वाढतो यावर काही शास्त्रीय मापदंड लावलेले संशोधन झाले आहे किंवा नाही याचा तपास करणं. हा शोध घेताना एक विश्वसनीय अहवाल आम्हाला मिळाला! 

जर्नल ऑफ क्लिनिकल अँड डायग्नॉस्टीक रीसर्च (JCDR) या संस्थेने केलेल्या प्रयोगात एकूण ३० मधुमेहींना संपूर्ण एक महिना इन्सुलिनच्या झाडाची पाने नियमित घ्यायला लावली. या गटात २४ पुरुष आणि ६ स्त्रिया होत्या. यापैकी १२ जणांना नियमितरीत्या इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागायचे. १४ जण मेटफॉर्मिंन या औषधावर अवलंबून  होते. इतर चार रुग्ण घरगुती औषधं आणि इतर आयुर्वेदिक औषधांवर अवलंबून होते. रोज रिकाम्यापोटी इन्सुलिनच्या झाडाची ताजी पाने किंवा एक चमचा पानाची भुकटी या सर्व रुग्णांना देण्यात आली. या औषधाचा परिणाम १५व्या दिवशी दिसून आला. त्यानंतर हीच औषधयोजना सुरु ठेऊन त्यांचे अनुभव गोळा करण्यात आले. ते असे होते -

ज्या ६ रूग्णांच्या पावलांना अल्सर होता, ते बरे झाले. २ रुग्णांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया मधुमेहामुळे शक्य नव्हत्या, त्यांची रक्तशर्करा नियमित स्वरुपात झाली. जे १२ रुग्ण केवळ इन्सुलिनच्या इंजेक्शनवर अवलंबून होते, त्यांच्या इन्सुलिनची मात्रा ५० टक्क्यावर आली. अशा प्रकारे ६० दिवसानंतर या रुग्णांचा ग्लायसेमिक कंट्रोल सशक्त माणसाइतका झाला. 

पण वाचकहो, बोभाटा केवळ एका संशोधनावरती अवलंबून राहत नाही. हे तुम्हालाही माहिती आहे. यापेक्षा अधिक काटेकोर पद्धतीने केलेले प्रयोग आणि त्यांची मीमांसादेखील आम्ही तपासून बघितली. सांगण्याचे तात्पर्य असं आहे की हे झाड खरोखर मधुमेहाच्या रुग्णांना उपयुक्त आहे. 

जाता जाता :

बोभाटाच्या वाचकांसाठी ही संक्षिप्त माहिती इथे प्रकाशित केली आहे. परंतु अशा प्रकारची औषधे घेण्यापूर्वी आपल्या नियमित वैद्यकीय सल्लागाराला विचारूनच याचा वापर करावा.