computer

'एम आर आय' सेंटरमध्ये जाण्यापूर्वी या ५ गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे !!

एमआरआय मशीन मध्ये खेचला गेल्याने ‘राजेश मारू’ या तरुणाचा काल जीव गेला. राजेश त्याच्या बहिणीच्या सासूला एमआरआय स्कॅनिंग सेंटर पर्यंत नेत होता. त्याच्या हातात यावेळी ऑक्सिजन सिलेंडर होतं. एमआरआय स्कॅनींग मशीन जवळ कोणतीही धातूची वस्तू नेण्यास मनाई असतानाही राजेशने ऑक्सिजन सिलेंडर मशीन असलेल्या रूम मध्ये नेलं. काही वृत्तपत्रांच्या बातमी नुसार यावेळी एमआरआय मशीन बंद असल्याचं सांगून वॉर्डबॉयने त्यांना आत सोडलं होतं पण खरं तर यावेळी मशीन चालू होती. आत गेल्या गेल्या राजेशला मशीनने काही क्षणात खेचून घेतलं. त्याला लगेचच बाहेर काढण्यात आलं पण थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला.

एमआरआय स्कॅनिंग मशीन मध्ये असलेल्या जबरदस्त चुंबकीय शक्तीमुळे तिच्या आजूबाजूला कोणतीही धातूची वस्तू ठेवणं धोकादायक असतं. धोकादायक असलं तरी एमआरआय मशीन वैद्यकीय दृष्ट्या तितकीच महत्वाची देखील आहे आणि म्हणूनच आज आपण बघणार आहोत एमआरआय स्कॅन करण्याआधी महत्वाच्या काळजी घ्यायच्या ५ गोष्टी.

१. एमआरआय स्कॅनिंगच्या वेळी घालावयाचे कपडे.

एमआरआय  स्कॅनिंग करताना घ्यायची पहिली काळजी म्हणजे रुग्णाला जे कपडे घालावयास दिले जातील त्यात कुठेही धातू नसला पाहिजे. १०० % कॉटनचे कपडे यासाठी योग्य ठरतात. याशिवाय नेलपॉलीश, मेकअप, सारख्या गोष्टींमध्ये सुद्धा धातूचे कण असल्याने त्याही मशीनच्या आजूबाजूला नसतील याची काळजी घेतली पाहिजे. तसेच केसांतल्या क्लिपा, जोडव्या किंवा इतर चांदी/मेटलचे, दागिने, दातांतल्या क्लिपा आणि मेटलचे ब्रिज, काही विशिष्ट प्रकारचे टॅटूज, आयलायनर हे सगळं रेडियेशन क्षेत्रात नसल्याची खात्री करून घेतली पाहिजे.

२. धातूच्या सगळ्या गोष्टी एमआरआय रुमच्या बाहेर ठेवून या.

अंगठी, दागिने, नाणी, बेल्ट, घड्याळ, मोबाईल फोन इत्यादी ज्या गोष्टींमध्ये धातू आणि खास करून लोखंड असेल त्या एमआरआय मशीनच्या जवळपासही नसतील याची काळजी घेतली पाहिजे. जेव्हा मशीन चालू करण्यात येते तेव्हा याच गोष्टी घातक ठरू शकतात. ज्या स्ट्रेचर वरून रुग्णाला आणलं जातं ते रेडियेशन विरहित असेल याची दक्षता घ्यावी. धातूच्या गोष्टी घातक ठरण्याबरोबरचच याचा परिणाम एमआरआय रिपोर्टवरही होतो.

३. मशीन मध्ये ‘हले डुले’ चालणार नाही

एमआरआय स्कॅनिंगच्या आधी काय करावं हे तर बघितलं आपण, पण जेव्हा प्रत्यक्षात स्कॅनिंग करतो त्यावेळी सुद्धा एक काळजी घ्यावी. आपण मशीन मध्ये असताना स्तब्ध राहण्या पलीकडे काही करू नये. मशीनची रचना सुद्धा अशी असते की तुम्हाला हालचाल करता येत नाही. याचं कारण म्हणजे स्कॅनिंग मधून येणाऱ्या रिझल्टवर याचा परिणाम होऊ नये.

४. कानात बोळे आणि डोळे बंद

एमआरआय मशीन चालू झाल्यानंतर त्याचा आवाज कानांना त्रास देऊ शकतो त्यामुळे स्कॅनिंग सुरु करण्याआधी कानात बोळे घालणं कधीही चांगलच. किंवा काहीवेळा डॉक्टर्स आपल्याला हेडफोन उपलब्ध करून देता ज्यातून आपण गाणी ऐकत पडून राहू शकतो. मशीनची घरघर आणि हालचाल करण्यास मनाई असताना आपल्याकडे एकच ऑप्शन उरतो तो म्हणजे डोळे बंद करून पडून राहणे.

५. मानसिक दृष्टया तयार व्हा

एमआरआय स्कॅनिंग हे प्रत्येकासाठी वेगळा अनुभव असतो त्यामुळे आपण आधीच तयार असणं गरजेचं असतं. मशीनचं काम करणं, ते वातावरण, स्कॅनिंगची प्रक्रिया या सर्वात भांबावून न जाता शांत राहणं गरजेचं असतं त्यासाठी आपल्याला मानसिक दृष्ट्या तयार असायलाच पाहिजे.

 

तर या आहेत ५ गोष्टी ज्या एमआरआय सेंटर मध्ये जाण्याआधी नक्की लक्षात ठेवा.

सबस्क्राईब करा

* indicates required