computer

मिठी मारण्याचे शास्त्र आणि इतिहास !!

मिठी मारणे, आलिंगन देणे, गळाभेट घेणे, उराउरी भेटणे.. या सगळ्या एकाच शारिरीक क्रियेच्या अनेक छटा आहेत.  पण त्या छटांचा अर्थ प्रसंगानुरुप, वेळोवेळी, नात्यागणिक बदलत असतो. कवळणे, कवटाळणे किंवा कवेत घेणे हे मराठी शब्द मिठीला, मिठीपेक्षा जास्त जवळचे आहेत. माय लेकराला कवेत घेते. वारकरी एकमेकांना उराउरी भेटतात, सीमेवरचा जवान मरणाला मिठी मारतो, प्रियकर प्रेयसीला आलिंगन देतो किंवा बाहुपाशात घेतो.. या त्या वेगवेगळ्या छटा आहेत. मग सध्या आपण नव्या पिढीतील सर्वांना भेटल्यानंतर मिठी मारताना बघतो ती मिठी समजायची, की कवळ, की आलिंगन, की गळाभेट ?? नक्की  समजायचं तरी काय ?

मग नेमकं हे काय हे आज आपण समजून घेऊ या !!

स्रोत

सर्वप्रथम हे समजून घेऊ या की हा एक नविन सामाजिक रिवाज (सोशल प्रोटोकॉल )आहे. एकमेकांना स्पर्श करून स्वागत करण्याची, जवळीक साधण्याची सामाजिक प्रथा आपल्याकडे कधीच नव्हती. अगदी दहा वर्षांपूर्वी पण ही मोकळीक आपल्या समाजात नव्हती. शेकहँड करणं इतकाच सोशल प्रोटोकॉल तेव्हापर्यंत होता. आजही स्त्री भेटल्यावर हातमिळवणी करण्यापेक्षा नमस्कार करणं किंवा नमस्ते करणं हे जास्त शिष्टसंमत समजलं जातं. मग प्रश्न असा आहे की हा नविन प्रकार आला कुठून ??

केविन झाबोर्नी (स्रोत)

हा अमेरीकेतून आलेला नविन सामाजिक शिष्टाचार आहे. इंग्रजीत याला हग किंवा हगींग असं म्हणतात. (हे मराठीत म्हणताना फारच विचित्र वाटतं नाही का?) तर हे हगींगचं खूळ बोकाळलं एका अमेरीकन माणसामुळं. त्याचं नाव आहे केविन झाबोर्नी. केविनच्या मते अमेरीकन लोक प्रेम किंवा जिव्हाळा व्यक्त करताना फारच कंजूसी करतात. म्हणून २१ जानेवारी हा दिवस हगींग डे म्हणून साजरा करायचा प्रस्ताव त्यानी लोकांसमोर मांडला आणि तेव्हापासून म्हणजे १९८६ पासून अमेरीकेत २१ जानेवारी "नॅशनल हगींग डे" साजरा केला जातो. हळू हळू ही हगींगची प्रथा पसरत गेली आणि आता नव्या पिढीची प्रातिनिधीक प्रथा झाली आहे. हे झालं अमेरीकेचं.  त्यानंतर हाच हगींग डे वॅलेंटाइन डे च्या आठवड्यात म्हणजे वॅलेंटाइन डे चा सातवा दिवस हगींग डे म्हणून साजरा व्हायला लागला!! या हगींग डेला रोमँटीक झालर आहे.  पण २१ जानेवारीचा हगींग डे शुध्द मैत्रीचा दिवस आहे.

आता हगींग हा सामाजिक शिष्टाचाराचा भाग झालाच आहे तर हे हगींग नक्की कशा पध्दतीने करावं याचे काही सामाजिक संकेत पण आहेत. 

१. कामानिमित्त भेटणार्‍या व्यक्तिंना हग करणे अत्यंत चुकीचा शिष्टाचार आहे. इथे शेक हँड किंवा हस्तांदोलन पुरेसे आहे.

२. अनौपचारिक भेटीत पहिल्यांदा भेटल्यावर लगेच हगींग करण्याची घाई करू नका.

३. हग करताना दुसर्‍याच्या शरीरावर भार किंवा दबाव पडणार नाही याची काळजी घ्या.

४. एकूण पाच सेकंदात हगींग संपले पाहिजे !

५. ज्याला आपण हग करतो त्याच्या सांस्कृतीक शिष्टाचारात हगींग बसत नसेल, तर हग करू नका.

६. बर्‍याच जणांना अनोळखी स्पर्शाची अ‍ॅलर्जी असते, वावडे असते, म्हणून काळजी घ्या.

आता बघू या हगींगचे विज्ञानातून सिध्द झालेले काही फायदे....

१. कार्नेगी मेलन या विद्यापीठाने एकूण चारशे लोकांना प्रश्न विचारला होता तो असा :

(कार्नेगी मेलन विद्यापीठ)

"गेल्या दोन आठवड्यात तुम्ही किती जणांना  हग केले आहे ?" त्यांच्या उत्तरावरून असा एक निष्कर्ष निघाला की ज्यांनी जास्त हग केले होते, ते कमी आजारी पडले.  त्यांना कमी जंतूसंसर्ग झाला आणि त्यांचा मानसिक ताण पण कमी झाला होता.

२. हस्तांदोलन किंवा हात हातात घेणे किंवा हग करणार्‍यांचे ब्लड प्रेशर कमी झाले.

३. सतत मरणाची भिती किंवा काही अनामिक भितीने पछाडलेल्या व्यक्तिंचा मानसिक ताणतणाव कमी झाला.

४. ऑक्सीटोसीन हे मेंदूत स्त्रवणारे रसायन समाधानाची अनूभूती देते. डोपामाईन हे रसायन सुखाची अनूभूती देते, सोरोटोनीन हे रसायन मूड ठिकठाक करते. या तिन्ही रसायनांचा स्त्राव हगींगने वाढतो.

५. हृदयाचे ठोके नियमित होतात.

आता, हे सगळे वाचल्यावर तुमची खात्री पटलीच असेल की "जादू की झप्पीच्या" मागे पण एक वैज्ञानीक सत्य आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required