computer

जागतिक तंबाखू विरोध दिनाच्या निमित्ताने वैद्य अश्विन सावंत यांचा हा लेख वाचायलाच हवा

प्रहारितो अपि मार्जारः  *तमाखुं नैव मुञ्चति।
बहुधा बोधितो अपि मूर्खः **तमाखुं नैव मुञ्चति।।
(* उंदीर ** तंबाखू)

या श्लोकाचा भावार्थ असा आहे की
'दांडक्याने कितीही मारले तरी मांजर काही तोंडात पकडलेला उंदीर सोडत नाही; तद्वतच कितीही उपदेश केला तरी मूर्ख माणूस तंबाखुचे व्यसन सोडत नाही.'

"तमाखु" या एका शब्दाचे दोन वेगळे अर्थ आणि त्या एकाच शब्दाची  श्लोका मधील दोन चरणांमध्ये योजना केल्यानंतर निर्माण होणारे सर्वस्वी भिन्न अर्थ असा संस्कृत भाषेची कमाल दाखवणारा हा श्लोक.

या श्लोकाचे आजच्या कोरोना- महामारीच्या पार्श्वभूमीवर मोठे महत्त्व आहे, अर्थातच तंबाखू-प्रेमीं च्या संदर्भात!  तंबाखू-प्रेमीं मध्ये गुटखा, चुना-तंबाखू, पान-तंबाखू चघळणारे आले आणि सिगारेट, बिडी, हुक्का ओढणारेही आले. कोरोना विषाणू हा रक्त-संवहनामध्ये विकृती निर्माण करून शरीराला विकृत करतो. त्यामुळे ज्यांच्या  रक्त वाहिन्या व रक्त-संचरण मुळातच खराब आहे अशा वृद्ध  व्यक्तींमध्ये आणि  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकार आदी आजाराच्या रुग्णांमध्ये (त्या रोगांचा उपचार योग्य झाला नसल्यास) कोरोना संसर्गामुळे धोका बळावतो आणि अगदी तशाच प्रकारे  रक्तवाहिन्या खराब होण्याचा व रक्त संवहन बिघडण्याचा धोका संभवतो तंबाखू मुळे. त्यामुळे खरं तर तंबाखू-प्रेमी मंडळीच रेड झोन मध्ये आहेत.

आता हे झाले ज्याचे-त्याचे वैयक्तिक नुकसान.
दुसरीकडे  या तंबाखूचा आजच्या कोरोना महामारीच्या  परिस्थिती मध्ये संपूर्ण समाजाला धोका संभवतो.

वेगवेगळ्या स्वरूपात तंबाखू चघळणारे दर मिनिटाला इथे-तिथे  थुंकत असतात. इथे-तिथे म्हणजे कुठेही! खिडकीतून, बसमधून, ट्रेन मधून, कारमधून, रिक्षातून, बैलगाडीतून, रस्त्यावर, फुटपाथवर, प्लॅटफॉर्म वर, बसस्टॉप वर, चौकात, दुकानात, दुकाना बाहेर, गटारात, नाल्यात, इमारतीच्या  कोनाड्यात - जिन्यावर-लिफ्ट मध्ये, इमारती च्या प्रांगणात,  चाळीमध्ये, झोपडपट्टी मध्ये, शौचालयात, खेड्यात, गावात, शहरांत ;  गल्ली पासुन दिल्ली पर्यंत; यत्र...तत्र...सर्वत्र!

आणि आता या सगळ्या थुंकण्याच्या जागा   सध्याच्या संसर्ग-काळा मध्ये  कोरोनाचे  दाट वस्ती स्थान बनण्याची  शक्यता आहे.  असे झाले तर शासनाने आणि आपण, मागचे अनेक दिवस केलेल्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी पडेल.तेव्हा वेळीच सावध व्हा आणि त्या तंबाखू-प्रेमींना जागे करा.

कारण दुर्दैवाने  यांनी तंबाखू थांबवला नाही आणि  पूर्वीसारखेच यत्र- तत्र थुंकणे सुरु ठेवले तर परिस्थिती गंभीर होईल. तेव्हा तंबाखू चघळणे थांबवलेच पाहिजे हे त्यांना समजावून सांगा, ऐकत नसतील तर कायद्याची भिती दाखवून धमकवा. कारण आता  प्रश्न केवळ नगर-स्वच्छतेचा,शोभेचा किंवा त्यांच्या वैयक्तिक आरोग्याचा नाहीये.

गंमत म्हणजे या तंबाखू-प्रेमींनी पहिल्या टप्प्यात लॉक डाऊन  कडक असताना उपलब्धच नसल्याने तंबाखू, गुटखा वगैरे सोडला होता  किंवा मोठ्या प्रमाणावर कमी केला होता. याचा अर्थ यांना तंबाखू,गुटखा,बिडी, सिगारेट  यांपासुन दूर राहणे शक्य आहे. मग  ही  व्यसने कायमची  का सोडू नयेत. यांनी तंबाखू सोडला तर तो,  कोरोना-महामारी मुळे सगळं वाईट घडत असतानाही ,  समाजाला झालेला सर्वात मोठा फायदा असेल.

या निमित्ताने सर्व तंबाखू-प्रेमींना देशवासीयां कडून  विनंती आहे की कृपा करून तंबाखू-गुटखा चघळणे थांबवा... स्वतःसाठी, तुमच्या कुटुंबाच्या आणि संपूर्ण समाजाच्या स्वास्थ्यासाठी

वैद्य अश्विन सावंत, मुलुंड

सबस्क्राईब करा

* indicates required