computer

थायलंडमध्ये कुत्र्यांच्या मार्फत कोरोना रुग्ण कसे शोधले जात आहेत? ही पद्धती आपल्या देशात पण राबवायला हवी का?

गेल्या वर्ष दीड वर्षापासून संपूर्ण जग कोरोना महामारीच्या विळख्यात सापडलेलं आहे. जवळपास प्रत्येक देशाला हे ग्रहण लागलं आहे. सर्व देश यातून वाचण्यासाठी आपापल्या परीने धडपड करत आहेत, बहुतेक ठिकाणी वॅक्सिनेशनही मोठ्या प्रमाणावर सुरू झालंय. पण संपूर्ण वॅक्सिनेशन कार्यक्रम राबवून नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढवून कोरोनाचं आव्हान संपुष्टात यायला अजून किमान वर्ष सहा महिने तरी लागतील असा अंदाज आहे. निदान तोपर्यंत तरी आपल्याला प्रतिबंधात्मक उपायांचाच आधार घ्यावा लागणार आहे. वैयक्तिक पातळीवर मास्क, हातांची नियमित स्वच्छता आणि सोशल डिस्टंसिंग ही प्रतिबंधासाठीची त्रिसूत्री सगळ्यांनाच माहिती आहे. तसाच शासकीय पातळीवरचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे चाचण्यांचं प्रमाण वाढवणं आणि जे रुग्ण पॉझिटिव्ह असतील त्यांचं विलगीकरण.  

कोरोना चाचण्यांसाठी आरटीपीसीआर, रॅपिड अँटीजेन टेस्ट यासारख्या प्रमाणित चाचण्या तर आहेतच, पण फिनलंड, जर्मनी, भारत, संयुक्त अरब अमिराती यासारख्या देशांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह पेशंट्स डिटेक्ट करण्यासाठी श्वानपथकाचीही मदत घेण्यात येत आहे. या देशांच्या पंगतीत आता अजून एक देश जाऊन बसला आहे, तो म्हणजे थायलंड. आपली वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती आणि पर्यटनस्थळं यामुळे जगाच्या नकाशावर प्रसिद्ध असलेला हा आग्नेय आशियातला चिमुकला देश. आज मात्र हाही देश कोरोनाच्या वेढ्यात सापडला आहे.  कोरोना रूग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याचे लक्षात आल्यावर थायलंडने टेस्टिंगसाठी श्वानपथकाची मदत घेण्याचं ठरवलं आहे आणि त्यासाठी सहा लॅब्रॅडॉर रिट्रीवर्सचं एक पथक तयार करण्यात आलं आहे.

लॅब्रॅडॉर ही श्वानांची प्रजाती खेळकर, मैत्रीपूर्ण स्वभावाची, उच्च आकलनक्षमता असलेली म्हणजेच बुद्धिमान अशी असते. त्यामुळे यांना ट्रेन करणं तुलनेनं सोपं असतं. शिवाय या श्वानांची वास घेण्याची क्षमतादेखील उत्तम असते. त्यामुळे सध्या कोरोना पेशंटच्या टेस्टिंगसाठी त्यांना बरीच मागणी आहे.

ही टेस्ट करण्यासाठीचा आधार आहे पेशंटचा घाम आणि त्याला येणारा विशिष्ट गंध. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाचे रुग्णांच्या घामाला विशिष्ट असा गंध असतो आणि श्वानपथकातील प्रशिक्षित श्वान हा गंध ताबडतोब ओळखू शकतात.

यासाठी ज्याची टेस्ट करायची आहे त्या व्यक्तीने एक कॉटन बॉल म्हणजे कापसाचा बोळा आपल्या काखेत थोडा वेळ ठेवायचा जेणेकरून त्यावर घामाचं सॅम्पल मिळेल. नंतर या बोळ्याची प्रयोगशाळेत श्वानांमार्फत चाचणी केली जाते. चाचणी पॉझिटिव्ह असेल तर त्या बोळ्याला येणाऱ्या विशिष्ट वासामुळे श्वान ते सॅम्पल असलेल्या कंटेनरसमोर बसतो आणि जर निगेटिव्ह असेल तर तिथून पुढे निघून जातो. या चाचणीचा सक्सेस रेट जवळपास ९५ टक्के आहे. मुख्यतः जे रुग्ण बाहेर जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी अशा प्रकारची चाचणी वरदान ठरत आहे. त्यांना फक्त आपलं सॅम्पल लॅबकडे पाठवणे एवढंच करायचं आहे.

थायलंडमध्ये कन्स्ट्रक्शन साइट्स, मोठ्या बाजारपेठा आणि दाटीवाटीने उभ्या असलेल्या झोपडपट्ट्या अशा ठिकाणी या श्वानपथकांमुळे मास स्क्रीनिंग शक्य होत आहे.

सहा श्वानांच्या पथकापैकी एंजल, बॉबी, आणि ब्रावो अशा तीन श्वानांनी बँकॉकच्या चुलालॉंगकॉन युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग अशा जवळपास एक हजार जणांची गेल्या दहा मे पासून चाचणी केलेली आहे. श्वानपथकाचा कोव्हिड टेस्टिंगसाठी उपयोग होऊ शकतो ही गोष्ट थायलंडमधील तज्ञांना माहिती होती. परंतु थायलंडमधील स्वादिष्ट आणि चमचमीत खाद्यसंस्कृती विचारात घेता ही टेस्ट येथील एकंदर वातावरणात यशस्वी होईल की नाही याबद्दल त्यांना शंका होती. मात्र आता ही शंका फिटली आहे. 

आता देशाचे जे भाग कोव्हिड हॉटस्पॉट बनले आहेत त्या त्या सर्व ठिकाणी हे श्वानपथक टेस्टिंगसाठी पाठवण्याच्या दिशेने थायलंड सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी एक खास मोबाइल युनिट तयार करण्यात आले आहे. श्वानपथक आपलं काम मोबाईल युनिटमध्ये करेल, तर सॅम्पल कलेक्शन करणारी टीम वस्त्यांमध्ये फिरून नमुने गोळा करेल. 

अमेरिकेतील तज्ञांच्या मते कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे श्वानांमध्ये रोगाची लागण होऊ शकते, परंतु श्वानांमुळे माणसांना लागण होण्याची शक्यता खूपच कमी आहे.

या श्वानांना कोरोनाव्हायरसची लागण होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून थायलंडमधील संशोधकांनी सॅम्पलसाठी खास प्रकारचे कंटेनर्स डिझाईन केले आहेत, जेणेकरून श्वानांच्या नाकाचा सॅम्पलशी थेट संपर्क येणार नाही. शिवाय संशोधकांच्या मते श्वानांच्या श्वसनमार्गातील पेशी आणि त्यावरील रिसेप्टर्स (पेशींच्या बाहेरील सिग्नल आत पाठवणारे प्रथिनांचे सूक्ष्म तंतू) हे कोरोनाव्हायरसच्या प्रवासासाठी पूरक वातावरण निर्माण करत नाहीत. त्यामुळे योग्य काळजी घेऊन श्वानांना सुरक्षित राखणं शक्य होतं.

एरवी वरदान ठरत असलेल्या या पद्धतीच्या काही मर्यादाही आहेत. यातलीच एक म्हणजे वेळेची मर्यादा. साधारणतः संध्याकाळी पाच ही या श्वानांच्या जेवणाची वेळ असते. त्यामुळे शरीराकडून भुकेचा सिग्नल आल्यानंतर पावणेपाचनंतर त्यांचं लक्ष विचलित व्हायला सुरुवात होते. या काळात त्यांच्याकडून काम करून घेणं अवघड असतं. शिवाय जेवणानंतर त्यांना थोडी विश्रांती आवश्यक असते. त्यामुळे दिवसाच्या कालावधीतच जास्तीत जास्त टेस्टिंग करण्यावर टेस्टिंग टीमचा भर असतो, मात्र ते नेहमीच शक्य होत नाही. 

काहीही असलं तरी हे श्वान आज आणि उद्याचे हीरो ठरणार आहेत, हे मात्र खरं. बघा, तुम्हाला पटतंय ना?

 

लेखिका: स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required