computer

मुन्नाभाईतल्या आनंदभाईसारखी खरीखुरी गोष्ट!! १२ वर्षे बोलू न शकलेला 'सब्जेक्ट' अखेर बोलू शकला!!

तुम्ही मुन्नाभाई एमबीबीएस बघितलाय? त्यातील आनंदभाई नावाचं पात्र तुम्हाला आठवत असेल.नाही? मग सब्जेक्ट? आता नक्कीच आठवलं असेल. तर, या चित्रपटातील आनंदभाई कधी बरा होईल ही आशाच डॉक्टरांनी सोडलेली असते तरीही मुन्नाभाईच्या आपलेपणामुळे, जिव्हाळ्यामुळे आनंदभाई बरा होतो आणि आपल्या घरी कलकत्त्याला परत जातो.

मुन्नाभाईतली ही स्टोरी खऱ्या आयुष्यात एका मुलासोबत घडलीय. मार्टिन प्युस्टोरियस हे त्याचं नाव आणि त्याला भेटली एक नर्स. या मार्टिनची अवस्थाही अशीच आनंदभाईसारखी झाली होती. डॉक्टर आणि नातेवाईकांनीही मार्टिन पुन्हा आपले आयुष्य पूर्ववत जगेल ही अशाच सोडून दिली होती. पण नर्सने त्याच्याशी मारलेल्या गप्पा त्याच्यासाठी वरदान ठरल्या आणि मार्टिनने आपल्या घरच्यांना एक सुखद आश्चर्याचा धक्का दिला. निसर्गात चमत्कार होतात यावर जर तुमचा विश्वास बसत नसेल तर मार्टिनच्या आयुष्यातील हा किस्सा तुम्ही वाचायलाच हवा.

१९७५ साली दक्षिण आफ्रिकेत मार्टिनचा जन्म झाला. वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत मार्टिन इतर सामान्य मुलांप्रमाणेच सामान्य जीवन जगत होता. बाराव्या वर्षी अचानकच तो आजारी पडला आणि डॉक्टरांना त्याच्या या आजारपणाचे नेमके निदानच करता येईना. सुरुवातीला मार्टिनला फक्त घशात खवखव होत होती. हळूहळू त्याचे बोलणे बंद झाले, त्याला काही खाताही येईना. नंतर नंतर तो सारखाच झोपून राहू लागला. पुढच्या काही दिवसांत तर त्याच्या शरीराचा एकेका अवयवाचे कामच थांबत गेले आणि मार्टिन पूर्णतः अंथरुणावर खिळून राहिला. पूर्वीचा हसणारा खेळणारा मार्टिन अचानकच नाहीसा झाला.

डॉक्टरांनाही त्याला काय झाले याचे नेमके निदान करता येत नव्हते, पण तोपर्यंत मार्टिन कोमात गेला होता. कदाचित त्याला क्षयरोग किंवा क्रिप्टोकोकल मेनिंजिटिस झाला असावा या अंदाजाने त्यांनी त्याच्यावर उपचार सुरु केले. पण मार्टिन कोणत्याच उपचारांना प्रतिसाद देत नव्हता. बारा वर्षे मार्टिनवर उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी हात टेकले आणि त्याच्या आई-वडिलांना सांगितले की, “मार्टिन बरा होण्याची शक्यता निवळली आहे, त्यापेक्षा त्याला तुम्ही घरी घेऊन जा. तुमच्या नजरेसमोर जितका राहील तितके बरे होईल, कारण अशा अवस्थेत आता तो फार काळ जगेल असे वाटत नाही.”

आपला मुलगा आता फक्त काही दिवसांचा सोबती आहे, हे कळल्यावर त्या आई-वडिलांचे काय झाले असेल विचार करा. मार्टिन आता चोवीस वर्षांचा झाला होता. या बारा वर्षात तो आपल्या आईला धड ओळखूही शकला नव्हता बोलणे तर दूरच. मनावर दगड ठेवून त्या आई-वडिलांनी मार्टिनला घरी आणले. त्याच्या या अवस्थेने संपूर्ण घरावरच अवकळा पसरली होती.

एवढ्या मोठ्या मुलाला अजूनही अंघोळ घालावी लागत होती. त्याला तोंडावाटे अन्न न देता नाकातून नलिका टाकण्यात आली होती. इतक्या सगळ्या यातना कुठल्या आईला पहावल्या असत्या? मार्टिनच्या आईलाही आपल्या मुलाची ती अवस्था अजिबात सहन होत नव्हती. एक दिवस ती मार्टिनजवळ बसलेली असताना त्याला म्हणाली देखील, “आता खरच तू यातून सुटलास तर किती बरं होईल!” पण तिला काय माहीत की, ती जे काही बोलतेय ते मार्टिनला ऐकू जातेय. पण तो त्यावर कुठली प्रतिक्रिया देऊ शकत नाही.

मार्टिन जरी कोमामध्ये असला तरी त्याच्या आजूबाजूच्या व्यक्ती काय बोलताहेत हे त्याला समजत होतं. फक्त तो त्यावर आपली प्रतिक्रिया देऊ शकत नव्हता किंवा शरीराची काही हालचाल करू शकत नव्हता. आईचे ते वाक्य कानावर पडल्यावर मार्टिन फारच दुखवला गेला. त्याने आपल्या बोटांची हालचाल करून आईचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण त्याला ते शक्य झाले नाही. पण मार्टिनने आता ठरवले की जरी आपण कुणाला प्रतिसाद देऊ शकत नसलो तरी आपण पडल्यापडल्या आपल्या शरीराची हालचाल करण्याचा तरी प्रयत्न करू शकतो आणि त्यानुसार त्याने आपल्या बोटावर जोर देऊन हालचाल करण्याचे प्रयत्न सुरु ठेवले. तो इतरांशी बोलू शकत नसला तरी त्याची कल्पनाशक्ती उत्तम होती. याचा वापर करून त्याने आपल्या कल्पनेतच काही पात्रे तयार केली आणि त्यांच्याशी गप्पा मारू लागला.

मार्टिनचे आई-वडील दोघेही नोकरी करत. त्यामुळे घरी कोणी विशेष लक्ष देणारे नव्हते. म्हणून मार्टिनला त्याचे’ आईवडील दिवसभर एका पाळणाघरात ठेवत असत. त्या पाळणाघरात एक नवी सिस्टर आली. ही सिस्टर मार्टिनशी गप्पा मारत असे. खरे तर पूर्वी मार्टिनशी अशा गप्पा कुणी मारल्याच नव्हत्या. कारण आपण जे बोलतो ते त याला समजत असेल असा कुणाला विश्वासच नव्हता. पण त्या सिस्टरला मार्टिनशी गप्पा मारता मारता हे जाणवलं की मार्टिन तिला ऐकू शकतो. इतर लोक समजतात त्याप्रमाणे मार्टिन पूर्णतः कोमात गेलेला नाही.

खरे तर मार्टिन सगळं काही ऐकू शकत होता. त्याला आजूबाजूच्या वातावरणात होणारे बदल म्हणजे दिवस-रात्र, ऊन-पाऊस, उजेड-अंधार हे सगळं काही ओळखता येत होतं. आजूबाजूच्या पदार्थात होणारे बदल त्याला जाणवत होते. पण आपल्याला जाणवतं हे मात्र तो कुणाला जाणवून देऊ शकत नव्हता. त्याच्या पाळणाघरात नव्याने आलेल्या त्या सिस्टरने मार्टिनच्या छोट्या छोट्या हालचालींची नोंद घेतली. ती त्याच्याशी गप्पा मारू लागली. आतापर्यंत पूर्णतः एकटा पडलेला मार्टिन आपल्या कल्पनेतच हरवलेला असायचा मात्र आता त्याच्याशी गप्पा मारेल असं कोणीतरी त्याला मिळालं होतं.

त्या सिस्टरने मार्टिनच्या आई-वडिलांना त्याला सेंटर फोर ऑगमेंटेटिव्ह अँड अल्टरनेटिव्ह कम्युनिकेशनमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला. इथे ज्या लोकांना बोलता येत नाही अशा लोकांसाठी काही विशिष्ट साधने दिली जातात. या साधनांच्या साहाय्याने असे लोक आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी इतरांना सांगू शकतात. या सेंटरमध्ये आल्यावर तिथल्या तंत्रांचा वापर करून मार्टिन आपल्याला हवे नको ते सांगायला लागला. सुरुवातीला मार्टिनचे बोलणे समजून घेणे त्रासदायक वाटत असले तरी हळूहळू मार्टिनने स्वतःमध्ये चांगलीच सुधारणा केली. वयाच्या २६ वर्षांपर्यंत मार्टिनमध्ये बरीच प्रगती झाली. तो आता कॉलेजमध्ये जाऊ लागला. कॉलेज संपल्यावर त्याला नोकरी लागली आणि नंतर अंथरुणाला खिळून राहिलेल्या बारा वर्षांच्या अनुभवावर त्याने एक पुस्तकही लिहिले.

२००९ मध्ये मार्टिनने जॉनाशी लग्न केले. मार्टिनला अजूनही चालता येत नाही. पण त्याचा मेंदू आता सामान्य माणसाप्रमाणेच पूर्णतः कार्यरत असतो. मार्टिनशी लग्न केल्यानंतर डॉक्टरांनी जॉनाला सांगितले होते की तो कधीच बाप बनू शकणार नाही. पण डॉक्टरांची ही शक्यताही खोटी ठरली. आज त्या दोघांच्या संसार वेलीवर एक फूल उमलले आहे. मार्टिन आणि जॉनाला २०१८ मध्ये मुलगा झाला ज्याचे नाव त्यांनी सॅबॅस्टीन ठेवले आहे. जॉना आणि मार्टिन आनंदाने आपला संसार करत आहेत.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required