computer

माणसे, प्राणी, वनस्पती, आणि रोगही!! कोलंबसाच्या मोहिमांनी कशाकशाची वाहतूक केली?

२०० दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीची सातही खंडे एकमेकांना जोडलेली होती. ही खंडे जोडून पॅन्जिया नावाचा भूभाग तयार झाला होता. पुढे ही खंडे एकमेकांपासून अलग झाली आणि प्रत्येक खंड स्वतंत्ररित्या विकसित होऊ लागला. त्या खंडांची भौगोलिक स्थिती आणि तेथील हवामान यांनुसार तेथे वनस्पती, प्राणी, आणि सूक्ष्मजीव यांच्या वेगवेगळ्या जाती उदयाला आल्या. खंडे अलग होण्याची ही प्रक्रिया वर्षानुवर्षे सुरू होती.

सुमारे बारा हजार वर्षांपूर्वी अमेरिका इतर खंडांपासून पूर्णपणे वेगळी झाली. परंतु हा प्रदेश जगाला ठाऊक झाला तो युरोपीय दर्यावर्दी ख्रिस्तोफर कोलंबस याच्यामुळे. सन १४९२ मध्ये कोलंबसाने कॅरेबियन बेटांवर पाऊल ठेवले आणि अमेरिकेबद्दल जगाला माहिती झाली. कोलंबसाला धाडसी दर्यावर्दी, अमेरिकेचा शोध लावणारा, युरोपीय संस्कृतीची मुळे अमेरिकेत रुजवणारा असे मानणारा एक वर्ग आहे, तर त्यासाठी त्याने केलेल्या अत्याचारांसाठी त्याच्यावर टीका करणाराही गट आहे. मुळात त्याच्या मोहिमांमागील हेतू व्यापारी होता. त्यासाठी त्याने स्पेनचा राजा फर्डिनांड आणि राणी इसाबेला यांना राजी केले होते. या माणसाने हिस्पॅनिओला बेटांवरील ताईनो रहिवाशांना गुलामीच्या खाईत लोटले आणि त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. त्याच्या मोहिमा रक्तरंजित आहेत. काहींच्या मते, कोलंबस केवळ बहामा बेटें शोधून काढण्यातच यशस्वी ठरला होता, तोही अपघाताने. पूर्ण अमेरिका खंडाचा शोध त्याने लावलाच नव्हता. त्यामुळे कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावला हे म्हणणेही पूर्ण खरे नाही.

मग कोलंबसाला नक्की काय म्हणायचे? हिरो की व्हिलन?

कोलंबसाच्या मोहिमांमुळे ग्लोबलायझेशन म्हणजेच जागतिकीकरण आणि रोगप्रसार या दोन्ही गोष्टी घडून आल्या. यालाच इतिहासात कोलंबियन एक्सचेंज असे नाव आहे. कोलंबियन एक्सचेंजचा अर्थ आहे कोलंबसाने अमेरिकेत पाऊल ठेवल्यानंतर माणसे, प्राणी, वनस्पती, आणि रोगराई या सगळ्यांचाच इकडून तिकडे झालेला प्रसार.

सन १४९३ मध्ये कोलंबसाच्या कॅरेबियन बेटांवरच्या दुसऱ्या मोहिमेदरम्यान त्याने आपल्याबरोबर सतरा जहाजे आणि हजारांहून अधिक माणसे आणली होती. हेतू हा की जास्तीत जास्त भूभाग शोधून तिथे वसाहती स्थापन करता याव्यात. या भागाला तेव्हा हिस्पॅनिओला असे म्हटले जाई. आज तेथे हैती बेटे आणि डॉमिनिक रिपब्लिक हे प्रदेश आहेत. या जहाजांवर मेंढ्या, गाई, शेळ्या, घोडे, डुकरे असे शेकडो प्राणी होते, जे अमेरिकेत आढळत नव्हते. घोडा हा प्राणी मूळचा अमेरिकेतला असला तरी मधल्या काळात रोगांमुळे आणि तेथे रहात असलेल्या रहिवाशांमुळे अमेरिकेतून घोडे पूर्णपणे नष्ट झाले होते. त्याच्या जोडीला या युरोपियन लोकांनी गहू, जव, द्राक्षे, कॉफी यांची रोपे आपल्यासोबत आणली होती. अमेरिकेतल्या सुपीक जमिनीवर ते त्यांचे पीक घेणार होते. अमेरिकेतले स्थानिक लोक त्यावेळी खात असलेली मका, बटाटे, बीन्स, टोमॅटो, मिरची, मिरे, शेंगदाणे, व्हॅनिला, अननस यासारखी अनेक पिके या देवाणघेवाणीदरम्यान आधी युरोप आणि नंतर जगभर प्रसिद्ध झाली. मात्र ही देवाणघेवाण खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, पिके यापुरतीच मर्यादित राहिली नाही. त्याच्या जोडीला अनेक रोगही वाहून नेले गेले. १४९८ मध्ये कोलंबसाच्या जहाजांवर असलेल्या डुकरांमुळे अमेरिकेत स्वाइन फ्लू पसरला. यामुळे हिस्पॅनिओलाचे मूळ रहिवासी असलेले ताईनो लोक मोठ्या प्रमाणावर बळी पडले. त्यानंतर १५१९ मध्ये स्मॉल्पॉक्स म्हणजेच देवीरोग आला. तो झपाट्याने मध्य अमेरिकेची मुख्य भूमी आणि त्यापलीकडे पसरला. नंतर अनेक रोग आले. गोवर, इन्फ्लूएंझा, चिकनपॉक्स(कांजिण्या), ब्युबॉनिक प्लेग, टायफस, स्कार्लेट फीवर, न्युमोनिया, मलेरिया, देवी हे रोग मूळ अमेरिकन रहिवाशांना पूर्णतः अपरिचित होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये या रोगांसाठीची प्रतिकारशक्ती नव्हती. कोलंबसाच्या मोहिमांमुळे गुप्तरोगाचा प्रसारही मोठ्या प्रमाणावर झाला. सन १४९५ नंतर पुढील शंभर ते दीडशे वर्षांमध्ये अमेरिकन स्थानिक जमातीच्या लोकांपैकी जवळपास ८० ते ९५ टक्के रहिवासी बळी पडले.

या सगळ्या इतिहासाला काळी किनार आहे ती गुलामांच्या व्यापाराची. अमेरिकेची सुपीक भूमी पाहून युरोपीय लोकांच्या तोंडाला पाणी सुटले होते. ते तिथे ऊस, तंबाखू, कापूस अशा नगदी पिकांचे उत्पादन घेऊन मोठ्या प्रमाणात नफा कमावण्याची स्वप्ने पाहू लागले. त्यासाठी त्यांना मनुष्यबळाची गरज होती. असे मनुष्यबळ, जे स्वस्तात उपलब्ध होईल. त्यातूनच गुलामांचा व्यापार सुरू झाला. शेतातील अंगमेहनतीची कामे करण्यासाठी युरोपियन लोकांनी जवळपास साडेबारा दशलक्ष आफ्रिकन गुलामांना विकत घेऊन अमेरिकेत कामासाठी पाठवले. सोळाव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकापर्यंत ही प्रक्रिया सुरू राहिली.

तर हे सर्व असे आहे. त्यावरून हा मनुष्य चांगला की वाईट हे ज्याचे त्याने ठरवायचे. एका परीने त्याच्या मोहिमांमुळे जग बदलले; जगाचा इतिहासही बदलला. त्यामुळे एक प्रकारे प्रगतीला हातभार लागला. दुसऱ्या बाजूला त्याने शांतताप्रिय, साध्याभोळ्या मूलनिवासी लोकांवर अन्याय केला. त्याची भरपाई कशानेही होऊ शकत नाही. तुम्हाला काय वाटते?

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required