computer

पुरुषांची कंबरदुखी-सायटिका- नक्की कशामुळे होते, त्यावर उपाय आणि ती मुळात होऊच नये म्हणून काय करता येईल?

लॉकडाऊनमध्ये पुरुषांनी घरात स्वयंपाक करणं, भांडी घासणं या गोष्टींवर समाजमाध्यमांवर जितके जोक्स आणि मीम्स व्हायरल झाले, त्याच प्रमाणात किंबहुना त्यापेक्षाही जास्त अजून एक गोष्ट सर्वत्र पसरली. ती म्हणजे पुरुषांना होणारी कंबरदुखी. या कंबरदुखीचं शास्त्रीय नाव आहे सायटिका आणि याचं कारण आहे भारतीय स्वयंपाकघरांमधल्या ओट्यांची फीमेल ओरिएंटेड म्हणजे महिलाभिमुख रचना. आपल्या देशात सर्वसाधारणपणे महिलांची उंची ५'६'' पेक्षा कमी असते. त्यामुळे स्वयंपाकघराच्या ओट्याची उंचीही त्यानुसार असते. भारतीय पुरुषांची उंची मात्र बहुतेककरून ५'६'' पेक्षा जास्त असते. काही कारणाने जेव्हा पुरुषांचा ओट्याशी संबंध येतो तेव्हा ही उंची आणि एकंदर ओट्याचं डिझाईन त्यांना अनुकूल नसल्याने स्वयंपाक, सिंकमध्ये भांडी विसळणं ही कामं करताना त्याना कंबरेत वाकावं लागतं. सायटिकाच्या कंबरदुखीचा उगम होतो तो इथूनच. हॉटेल्सच्या किचनमध्ये - बहुधा शेफ पुरुष असल्याने - प्लॅटफॉर्मचं डिझाईन पुरुषांना काम करायला सोयीचं पडेल अशा प्रकारे केलेलं असतं, त्यामुळे तिथे ही समस्या निर्माण होत नाही.

मानवी शरीरातील सर्वात लांब आणि महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या नसांपैकी एक म्हणजे सायटिक नस (sciatic nerve). ही नस कंबरेपासून सुरू होऊन दोन्ही पायांच्या जवळपास घोट्यापर्यंत जाते. कुठल्याही कारणाने या नसेला इजा झाली तर कंबर, पाय, पार्श्वभाग अशा ठिकाणी असह्य वेदना होणं, क्वचित प्रसंगी पायातील शक्ती कमी झाल्यासारखं वाटणं, पायांना मुंग्या येणं, असा त्रास सुरू होतो. हा विकार म्हणजे सायटिका.

याची सुरुवात अचानक व तीव्र वेदनेने होते. ३० ते ५० वर्षांच्या लोकांमध्ये हा त्रास जास्त दिसतो आणि थंडीच्या दिवसांत हा त्रास वाढतो. विशेष म्हणजे सायटिकाच्या वेदना एकावेळी फक्त एकाच पायात होतात. बसताना, खोकताना किंवा शिंकताना जास्तच त्रास होतो. या वेदना जशा अचानक सुरू होतात तशाच अचानक नाहीशाही होतात.

पडणं, अपघात यामुळे कंबरेच्या खाली मार बसणं, मज्जातंतू किंवा सायटिका नसेतल्या गाठी यांमुळेही सायटिकाचा त्रास होऊ शकतो. याचबरोबर हर्निएटेड डिस्क किंवा मणक्यातील चकत्या दाबल्या जाणं, दोन चकत्यांच्या मध्ये असलेल्या कार्टीलेज या मटेरियलची झीज होणं, साठीनंतर मणक्यांची नैसर्गिकरित्या झीज झाल्याने मणक्यांची पोकळी अरुंद होऊन सायटीक नसेच्या मुळांवर दाब पडणं ही या त्रासाची काही अन्य कारणं आहेत. प्रेग्नन्सीमध्ये वाढलेल्या गर्भाशयाचा भार सायटिक नसेवर पडल्याने हा त्रास होताना दिसतो. सायटिका होण्याचं अजून एक कारण म्हणजे पॅन्टच्या मागच्या खिशात ठेवलेलं नोटांनी फुगलेलं पैशाचं पाकीट. हे पैशाचं पाकीट खुब्यामध्ये असलेल्या पिरिफॉर्मिस या स्नायूंवर दाब निर्माण करतं. सतत असा दाब पडून सायटिकाचा त्रास होताना दिसतो. याशिवाय स्नायूंचा दाह, फ्रॅक्चर ही कारणंही आहेत. या विकाराने गंभीर स्वरूप धारण केल्यास आतडी व मूत्राशयावरील नियंत्रण सुटून लघवी किंवा शौचावर रुग्णाचे नियंत्रण राहत नाही. या स्थितीला कॉडा इक्विना सिंड्रोम म्हणतात.

या विकाराचं निदान करण्यासाठी डॉक्टर सगळ्यात आधी प्रत्यक्ष शारीरिक चाचणी म्हणजे फिजिकल एक्झाम करतात. यात पाय गुडघ्यात न वाकवता वर उचलणं, टाचेवर किंवा चवड्यांवर चालणं अशा क्रिया रुग्णाला करायला सांगितल्या जातात. या चाचण्यांमधून सायटीक नर्व्हमध्ये काही समस्या आहे का याचा अंदाज येतो. त्यानंतर एक्सरे, सीटी स्कॅन, एमआरआय या माध्यमांतून प्रत्यक्ष रोगनिदान करता येतं.

इतर अनेक आजारांप्रमाणे सायटिकावर उपचार उपलब्ध आहेत.

- दुखणाऱ्या भागावर बर्फाचा किंवा गरम पाण्याचा शेक घ्यावा. दर दोन तासांनी वीस मिनिटं शेक घ्यावा.

  • वेदना कमी होण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने एस्पिरिन आणि आयब्युप्रोफेन सारखी वेदनाशामक औषधे घ्यावीत. कधीकधी वेदना कमी करण्यासाठी डॉक्टर्स स्टेरॉईडची इंजेक्शन्सही देतात.

  • वेदना होत असतील तरी त्या भागाची शक्य तितकी हालचाल करावी. स्ट्रेचिंग, योगासनं (डॉक्टरी सल्ल्यानुसार) असे व्यायाम करावेत.

  • पंचकर्मसारखी आयुर्वेदिक उपचारपद्धती, फिजिओथेरपी, मसाज थेरपीसारख्या paramedical पद्धतींचाही चांगल्या प्रकारे उपयोग होतो.

  • हर्निएटेड डिस्कमुळे सायटिकाचा त्रास होत असेल तर सायटिकावर शस्त्रक्रिया (operation) केली जाते. यात सायटिका नसेवर दबाव टाकणाऱ्या हर्निएटेड डिस्कचा भाग काढून टाकला जातो. या शस्त्रक्रियेनंतर साधारण महिनाभर वाकणं, जड वस्तू उचलणं, ड्रायव्हिंग या गोष्टी टाळाव्यात. विशिष्ट प्रकारचे व्यायाम फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली करावेत. महिन्याभरानंतर डॉक्टरी सल्ल्याने रुग्ण आपली नेहमीची कामं व्यवस्थित पार पाडू शकतो.

हे झालं सायटिकावरील उपचाराबद्दल. पण ही समस्या उद्भवू नये म्हणून काय करायला हवं? 'दुर्घटना से देरी भली' या न्यायाने काही गोष्टी करायलाच हव्यात.
- नियमित व्यायाम करा. चालणं हा यावरचा चांगला उपाय आहे. स्ट्रेचिंगचा व्यायाम करा. व्यायाम शक्यतो सकाळी करा.

  • सायकलिंग किंवा पोहण्याच्या व्यायामाने कंबरेचे व खुब्याचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते.

  • कंबर आणि पायांवर जास्त भार पडू नये यासाठी वजन आटोक्यात ठेवा.

  • अवजड वस्तू जपून उचला. वाकावं लागलंच तर कंबरेत न वाकता गुडघ्यात वाका.

  • खुर्चीत बसल्यावर पाठीला योग्य आधार मिळेल अशा पद्धतीने बसा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खुर्चीत बसल्यावर आपले पाय फरशीला व्यवस्थित टेकलेले असावेत. जास्त वेळ एकाच स्थितीत बसू किंवा उभे राहू नका.

जोवर चालतंय तोवर चालवायचं असा 'चलता है' अटिट्यूड आपल्याकडे अनेकजणांचा असतो. पण सायटिकासारख्या विकारांत हा अटिट्यूड अजिबात कामाचा नाही. वेळेत उपचार केल्याने रुग्ण पूर्ववत होतो, आणि स्वतःची सगळी कामं पूर्वीप्रमाणे करू शकतो. त्यामुळे काळजी घ्या, आपल्या शरीराचा आदर करा, आणि कुठे काही बिनसलं तर तज्ज्ञाकडून त्याची वेळेत दुरुस्तीही करून घ्या.

-स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required