computer

संधिवात झालेल्या रुग्णांना वादळाची सूचना सर्वात आधी कशी मिळते ?

काही लोकांना वादळाची सूचना आधीच मिळते. वादळ येण्यापूर्वी त्यांच्या हाडांमध्ये वेदना सुरु होतात किंवा ताण जाणवू लागतो. हे सर्वांच्याच बाबतीत घडत नाही, पण संधिवात झालेल्या रुग्णांच्या बाबतीत हे हमखास होतं. या मागे काही विज्ञान आहे की, ही एक भाकडकथा आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

या विषयावर १९९० साली पहिल्यांदा संशोधन झालं. तेव्हा एक प्रयोग करण्यात आला होता. संधिवात असलेल्या काही रुग्णांना एका बॅरोमेट्रिक चेंबर (वायुदाब नियंत्रण करण्यासाठी तयार केलेली खोली) मध्ये ठेवण्यात आलं होतं. हवामानातील बदलानुसार हवेच्या बदलणाऱ्या दाबाचा (बॅरोमेट्रिक प्रेशर) परिणाम या रुग्णांवर काय होतो हे हे प्रयोगात तपासण्यात आलं.

प्रयोगातील एकूण रुग्णांपैकी ४ रुग्णांना खोलीतील दाब कमी झाल्याने हाडांमध्ये त्रास झाला. हे केवळ ४ रुग्ण असल्याने या अभ्यासातून फारसं काही हाती लागलं नाही, पण एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे सांधेदुखी आणि हवामानातील दाब यांचा संबंध आहे.

बॅरोमेट्रिक प्रेशर म्हणजे काय ?

माणसाच्या शरीरावर हवेचा दाब किती असतो हे मोजण्याचं एक साधन म्हणजे बॅरोमेट्रिक प्रेशर. हवामानातील बदलांनुसार शरीरावरील हवेचा दाब बदलत असतो. समजा प्रचंड पाऊस आणि वादळ येणार असेल तर हवेचा दाब कमी होतो. यावर समुद्रसपाटीपासूनच्या उंचीचाही परिणाम होतो.जसजसे आपण समुद्रसपाटीपासून वरच्या भागात जाऊ तसतसा दाब कमी होत जातो. अगदी या उलट समुद्रसपाटीला होतं. एकूण काय तर हवेचं प्रमाण दोन्ही बाजूंना वेगवेगळं असतं.

१९९० नंतर २००७ साली झालेल्या अभ्यासात पुन्हा एकदा हवामानातील बदल आणि सांधेदुखी यांच्यातील संबंध तपासण्यात आला होता. २००७ सालच्या अभ्यासातही दोघांमध्ये संबंध दिसून आला. २०१७ सालचा अभ्यास मात्र या गोष्टीला नाकारतो. २०१७ साली पाऊस आणि त्याचवेळी संधीवाताच्या रुग्णांकडून होणारे विम्याचे दावे असा अभ्यास करण्यात आला होता. पण विचार केल्याप्रमाणे दोन्ही गोष्टींमध्ये परस्परसंबंध आढळून आला नाही.

मंडळी, संधिवात आणि हवेचा दाब यांच्यातील संबंध आजही वादाचा विषय असला तरी हे खोटं असल्याचं कोणीच मान्य केलेलं नाही. हाडे वयानुसार किंवा दुखापत झाल्यामुळे कमकुवत होतात. त्याप्रमाणे हाडांची संवेदनशीलता बदलत जाते.

हाडांचा आणि हवामानाचा काय संबंध आहे ?

या प्रश्नाला एकच एक उत्तर विज्ञानाकडे नाही.काही तज्ञांच्या मते हवामानातील दाब कमी झाल्याने सांध्यांमध्ये वंगण म्हणून काम करणारा द्रव पदार्थ पसरतो. त्यामुळे सांध्यांमध्ये जळजळ होते. काही तज्ञांच्या मते हा त्रास उत्पन्न होत नाही तर तो आधीपासूनच तिथे असतो.

शेवटी काय तर संधिवात आणि हवामानातील बदल यांचा नक्की परस्परसंबंध कोणालाच माहित नाही, पण दोन्ही गोष्ट हातात हात घालून चालतात हे मात्र खरं.