computer

म्युकरमायकोसिस किंवा ब्लॅक फंगस काय आहे? याचा धोका नेमका कधी आणि कुणाला होतो?

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने भारतात थैमान घातले आहे. या नव्या स्ट्रेनच्या प्रादुर्भावाला बळी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मधुमेह, रक्तदाब किंवा आणखी कुठल्याही गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी कोरोना आधीच जीवघेणा ठरत होता. त्यात आता म्युकरमायकोसिसची किंवा ब्लॅक फंगस नावाच्या नव्या रोगाची भर पडली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेतही याचे काही रुग्ण आढळले होते, पण यावेळी म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या चार-पाच पटीने वाढली असल्याचे भारतीय आरोग्य खात्याचे म्हणणे आहे. कोरोनामधून बरे झालेले रुग्णही या संसर्गाला बळी पडत आहेत. कोरोनाच्या तुलनेत या रुग्णांची संख्या कमी असली तरी, याच्यात रुग्णाची दृष्टी जाण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा रुग्णांवर अधिक सजगपणे उपचार करण्याचे निर्देश सरकारनेही डॉक्टरांना दिले आहेत.

काय आहे हा म्युकरमायकोसिस किंवा ब्लॅक फंगस? याच्याबद्दल विविध तज्ञांचे मत काय आहे? याचा धोका नेमका कधी आणि कुणाला होतो? अशा प्रश्नांच्या उत्तरांसोबतच त्याबाबतची काही तथ्ये जाणून घेऊया या लेखातून.

१. मधुमेह असणारे किंवा ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे अशा रुग्णांच्या लक्षणांकडे डॉक्टरांनी बारकाईने लक्ष द्यावे अशा सूचना इंडियन मेडिकल कौन्सिलने सगळ्या डॉक्टरांना दिल्या आहेत. अशा रुग्णांमध्ये सायनस, एकच नाकपुडी गच्च होणे, चेहऱ्याची एक बाजू जड होणे, एकाच बाजूला डोके दुखणे, सूज किंवा सुंद पडणे, दात पडणे अशी काही लक्षणे आहेत का याची तपासणी करावी, असेही सांगितले आहे.

२. म्युकरमायकोसिसमध्ये रुग्णाच्या नाकाची एक बाजू काळी पडते. नाकातून काळसर द्रव वाहू लागतो. डोळ्यांनी अंधुक दिसायला लागते किंवा समोरची वस्तू, व्यक्ती डबल दिसू लागते. मधुमेही रूग्णामध्ये छातीत दुखणे, श्वास घ्यायला त्रास होणे या नेहमीच्या लक्षणांसोबतच खोकल्यातून रक्त पडण्याची लक्षणेही दिसतात.

३. कोव्हीड-१९ रुग्णांनी जर कोरोना उपचाराच्या दरम्यान स्टेरॉइड्स घेतले असतील तर त्यांच्यातही हा संसर्ग होऊ शकतो. विशेषत: ज्यांनी दवाखान्यात आयसीयुमध्ये जास्त काळ उपचार घेतले आहेत, अशा रूग्णामध्येही याचा संसर्ग आढळून आला असल्याची माहिती आयसीएमआरने दिली. आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या ५% रुग्णांना तरी सध्या हा संसर्ग होत आहे. हा आकडा पुढे वाढण्याचीही शक्यता आहे.

४. मधुमेह असलेल्या कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार करताना डेक्सामिथोसेन सारख्या स्टेरॉइडचा वापर करावा लागतोच. या स्टेरॉइडचा वापर केलेल्या रुग्णांत ब्लॅक फंगसचा संसर्ग झाल्याची उदाहरणे भारतासोबतच ब्रिटन, अमेरिका, फ्रांस, ऑस्ट्रिया, ब्राझील आणि मेक्सिकोमध्येही आढळली आहेत. दुर्दैवाची गोष्ट हीच की, भारतात याचे प्रमाण तुलनेने अधिकच आहे.

५.  याबाबत आधीच सावध राहून काळजी घेतली आणि डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार करताना सतर्कता बाळगली तर हा संसर्ग टाळता येतो. किमान याचे गंभीर परिणाम तरी निश्चितच टाळता येतात.

६. कोरोना येण्याआधीही मधुमेहाच्या रुग्णांमध्ये याप्रकारचा संसर्ग आढळून येत असे. मधुमेही रुग्णांना या संसर्गाचा धोका नेहमीच आहे. कोरोनामुळे सध्या हे प्रमाण जास्तच वाढले आहे.

७. आताच्या काळात मात्र याचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. ज्यांना रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी औषधे दिली होती, अशा रुग्णांनाच याचा धोका जास्त आहे. त्यातही मधुमेह असेल तर याची गुंतागुंत अधिक वाढते. याकाळात अशा काही रुग्णांना जीव गमवावा लागला आहे तर काहींनी दृष्टीही गमावली आहे.

८. भारतात आणि खास करून मुंबई आणि गुजरातमध्ये या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. गुजरातमध्ये जवळपास ३०० रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांवर विशेष उपचार करता यावेत म्हणून गुजरातमध्ये अशा रुग्णांसाठी विशेष रुग्णालयांची सोय करण्यात आली आहे.

९. म्युकरमायकोसिसवर उपचार करण्यासंदर्भात भारतीय आरोग्य खात्याने ज्या सूचना जारी केल्या आहेत त्यात कोव्हीड-१९ मधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये याचा संसर्ग होण्याचे प्रमाण चार-पाच पटीने वाढल्याचे सांगण्यात आले आहे. महामारीच्या आधीही हा संसर्ग आढळून येत असला तरी त्याचे प्रमाण निश्चितच इतके नव्हते.

१०. या संसर्गावर उपचार करताना ज्या भागाला संक्रमण झाले आहे तो भाग काढून टाकावा लागतो. काही काही रुग्णांत तर संपूर्ण डोळा देखील काढावा लागला आहे. या फंगसवर उपचार करण्यासाठी जी औषधे वापरली जातात ती अधिक महागडी आणि सर्वसामान्यांचा आवाक्याबाहेरची आहेत. यासाठी डॉक्टरांच्या निगराणीखालीच अँटी-फंगल थेरपीची ट्रीटमेंट घ्यावी लागते.

११. ब्लॅक फंगसवर उपचार करताना येणारा अवाढव्य खर्च आणि ऑपरेशनची शक्यता या सगळ्या शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने या आजाराचे उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील १००० रुग्णालये या योजनेच्या अंतर्गत येतात.

१२. या आजारावर अॅम्फोथ्रीसिन बी प्लेन या औषधाच्या १४ वायलचा डोस गरजेचा आहे. सध्या त्याचाही राज्यात तुटवडा जाणवत आहे. राज्यातील अनेक भागात हे इंजेक्शन उपलब्ध नाही.

एकूणच कोरोनापासून सावध राहणे हीच सध्या काळाची गरज आहे. म्हणून शक्यतो सतत हात धुणे, मास्क वापरणे आणि इतरांपासून योग्य ते अंतर राखणे या त्रिसूत्रीचे पालन केल्यास आपण स्वतःला आणि आपल्या आजबाजूच्या लोकांनाही सुरक्षित ठेवू शकतो. म्हणूनच घरी राहा, सुरक्षित राहा!

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required