computer

Pandemic म्हणजे काय आणि तो केव्हा घोषित करतात, त्याचा परिणाम काय होतो?

काल संध्याकाळी जागतिक आरोग्य संस्थेने (WHO) कोरोनाव्हायरसला Pandemic घोषित केलं आहे.  हे Pandemic म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहित आहे का? 

तुम्हाला वाटेल की हा शब्द तुम्ही पहिल्यांदाच ऐकला आहे, पण खरंतर दहा वर्षांपूर्वी म्हणजे २००९ साली जेव्हा स्वाईनफ्ल्यू पसरला होता तेव्हाही WHO ने त्याला Pandemic घोषित केलं होतं. साहजिकच त्यावेळी जिओचं इंटरनेट कनेक्शन नसल्यानं आपली बरीचशी पब्लिक सोशल मिडियापासून दूर होती आणि  तेव्हा त्याची फारशी चर्चा झाली नाही. आज चर्चा होतेय, खरेखोटे मेसेजेस, अफवा पसरत आहेत आणि लोकांच्या मनात बऱ्याच शंकाही येत आहेत. म्हणूनच कालपासून लोक विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया. 

Pandemic म्हणजे काय आणि तो केव्हा घोषित करतात, त्याचा परिणाम काय होतो?

Pandemic म्हणजे काय?

Pandemic म्हणजे जगभरात एकाचवेळी प्रमाणाबाहेर पसरणारा साथीचा रोग. जागतिक आरोग्य संस्थेकडून एखादा आजार Pandemic म्हणून घोषित केला याचा अर्थ तो आजार अत्यंत जलदगतीने जगभरात पसरत आहे आणि या आजाराशी लढण्यासाठी लोकांकडे पुरेशी रोगप्रतिकार शक्ती नाही.

Pandemic ठरवण्यासाठी कोणते निकष लावले जातात?

आधी तर जे रुग्ण प्रवासी देशाबाहेर प्रवास करून आपल्या देशात परतले आहेत, किंवा या प्रवाशांमुळे ज्या लोकांना संसर्ग झाला आहे अशा लोकांना बाजूला काढलं जातं. याला इंडेक्स केस म्हणतात. Pandemic घोषित करायचं की नाही हे आजाराच्या दुसऱ्या लाटेवरून ठरवलं जातं. या दुसऱ्या लाटेत आजार एका माणसाकडून  दुसऱ्या माणसाकडे आणि पुढे पूर्ण समाजात कसा पसरतो हे पाहिलं जातं.

हा संसर्गजन्य आजार काही लोकांपुरता किंवा काही देशांपुरताच मर्यादित राहिलेला नाही यावर जेव्हा शिक्कामोर्तब होतं तेव्हा त्या आजाराला Pandemic घोषित केलं जातं. उदाहरणार्थ, २००३ साली जेव्हा कोरोनाव्हायरससारखाच SARS आजार पसरला होता, तेव्हा त्याला Pandemic घोषित करण्यात आलं नव्हतं. कारण तो केवळ चीन, हॉंगकॉंग, तैवान, सिंगापूर आणि कॅनेडापुरताच मर्यादित होता. 

कोरोना आजाराला Pandemic घोषित केल्याने काय परिणाम होईल?

कोरोना बरा करण्याची पद्धत किंवा त्याच्यापासून स्वतःचा बचाव करायची पद्धत यात काहीही बदल होणार नाही. Pandemic घोषित केल्यामुळे जगभरातील सर्व देशांनी एकत्र येऊन या आजाराशी दोन हात करण्याची गरज अधोरेखित होते.

आजाराला Pandemic केल्याने जसे फायदे आहेत तसेच त्याचे तोटेही आहेत. Pandemic आजार जाहिर केल्याने लोकांमध्ये घबराट पसरण्याची शक्यता असते. २००९ साली स्वाईनफ्ल्यूला Pandemic घोषित केल्यानंतर लोकांमध्ये घाबराट पसरली होती आणि सरकारी यंत्रणांना लोकांना आवरण्यात प्रचंड पैसा खर्च करावा लागला. 

तर मंडळी, कोरोनाबद्दल ज्या अफवा पसरत आहेत त्यांच्यावर लगेच विश्वास ठेऊ नका. जागतिक आरोग्य संस्थेच्या https://www.who.int/health-topics/coronavirus या अधिकृत संकेतस्थळावर दिलेली माहिती वाचा.

सबस्क्राईब करा

* indicates required