computer

मूत्रतपासणी (रूटीन युरीन अ‍ॅनालिसिस) : का करावी, काय खबरदारी घ्यावी, कधी केली जाते आणि तीमधून काय समजते? सर्व उत्तरे एकाच ठिकाणी!!

मानवी शरीर हे एक वेगळंच मशीन आहे. शरीराच्या आत कायकाय घडते आणि त्याचा शरीरातील अवयवांवर व त्यांच्या कार्यावर काय बरावाईट परिणाम होतो हे सामान्य माणसाच्या आकलनाबाहेरचे आहे. उदाहरणच द्यायचे तर शरीरातील विसर्जन संस्था. हिच्या कामात थोडी जरी गडबड झाली तरी त्याचे पडसाद लगेच शरीरावर उमटतात. हातापायांवर, डोळ्यांखाली आलेली सूज, मूत्रविसर्जन करताना होणारी जळजळ, लघवी करण्याआधी, करताना किंवा त्यानंतर होणार्‍या वेदना, लघवीवाटे होणारा रक्तस्राव ही या बिघाडाची लक्षणे आहेत. मात्र केवळ या लक्षणांवरून आजार किती गंभीर आहे याची नेमकी कल्पना येत नाही. त्यासाठी युरीन टेस्ट केली जाते. वैद्यकीय भाषेत याला युरीन ॲनालिसिस असेही म्हणतात. मधुमेह, किडनीचे विकार आणि मूत्रमार्गातील जंतुसंसर्ग अशा विकारांसाठी मुख्यतः युरीन टेस्ट केली जाते. आज या युरीन टेस्टचे महत्त्व, पद्धत, ती कधी करावी आणि त्यामधून काय समजते हे जाणून घेऊयात.

मूत्रतपासणी करताना लघवीचे प्रमाण, तिचे स्वरूप, आणि संहती(कॉन्सन्ट्रेशन) बघितली जाते. या टेस्टचे निष्कर्ष नॉर्मल नसतील तर हे काहीतरी बिघाड झाल्याचे किंवा एखादा आजार असल्याचे दर्शवते. उदाहरणार्थ मूत्रमार्गाचा जंतुसंसर्ग झाला असेल तर लघवीचा रंग काहीसा धुरकट दिसतो, लघवीमध्ये प्रोटिन्सची पातळी वाढलेली दिसली तर ते किडनीच्या विकाराचे चिन्ह आहे. मूत्रतपासणीचे निष्कर्ष जर अ‍ॅबनॉर्मल असतील तर अनेकदा विकाराचे मूळ शोधण्यासाठी डॉक्टर अतिरिक्त चाचण्या करायला सांगतात

ही चाचणी कशासाठी केली जाते?

मूत्रतपासणी अनेक कारणांसाठी केली जाते. उदाहरणार्थ

एकंदर आरोग्य तपासणी (रुटिन चेक-अप)

जेव्हा रूटीन चेकअपचा भाग म्हणून संपूर्ण आरोग्य तपासणी केली जाते, तेव्हा मूत्रतपासणी हा त्याचा एक भाग असतो. प्रेग्नन्सीमध्ये करावयाचे चेकअप, एखाद्या शस्त्रक्रियेच्या आधी करावयाचे चेकअप, मधुमेह किडनीचे विकार आणि लिव्हरचे विकार अशा वेगवेगळ्या आजारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागल्यास करावे लागणारे चेकअप यामध्ये मूत्रतपासणीचा समावेश असतो.

विशिष्ट लक्षणांवरून आजाराचे निदान करणे

पोटदुखी, पाठदुखी, वारंवार लघवीला जावे लागणे, लघवी करताना वेदना होणे, लघवीमध्ये रक्तस्राव किंवा मूत्रविसर्जनाशी संबंधित इतर समस्या असल्यास त्यांचे कारण शोधण्यासाठी डॉक्टर मूत्रतपासणी करायला सांगतात.

विशिष्ट आजारानंतर रुग्णाच्या प्रकृतीवर देखरेख ठेवणे

जर व्यक्तीला किडनीचे किंवा मूत्रमार्गाचे विकार असतील तर डॉक्टर तुमची प्रकृती आणि आजारावरील उपचारांचा प्रकृतीवर होणारा परिणाम यावर देखरेख करण्यासाठी नियमित काळाने मूत्रतपासणी करायला सांगतात.

मूत्रतपासणीसाठी तयारी कशी करावी?

जर तुम्हाला फक्त युरीन टेस्ट म्हणजेच मूत्रतपासणी करायची असेल तर टेस्टच्या आधी तुम्ही नेहमीप्रमाणे खाऊपिऊ शकता. मात्र त्याच्या जोडीला इतर काही टेस्ट्स करायच्या असतील तर त्यासाठी टेस्टच्या आधी विशिष्ट कालावधीसाठी फास्टिंग म्हणजे अनुशा पोटी राहाणे आवश्यक असते. यासंबंधी तुमचे डॉक्टर तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. त्याचप्रमाणे नॉन-प्रीस्क्रीप्शन ड्रग्ज, व्हिटॅमिन सप्लीमेंट यांसारख्या औषधांचा मूत्रतपासणीच्या निष्कर्षावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मूत्रतपासणी करायच्या वेळी डॉक्टरांना तुम्ही घेत असलेल्या सर्व औषधांची माहिती देणे आणि त्यासंबंधी त्यांचा सल्ला घेणे कधीही चांगले.

लघवीचा नमुना घेताना शक्यतो लॅबमधून आणलेला कंटेनर किंवा बाटली वापरावी. सकाळची पहिली लघवी सहसा टेस्टसाठी चांगली मानली जाते कारण ती कॉन्सन्ट्रेटेड(सघन) असते. त्यामुळे काही विचित्रपणा असल्यास त्या लवकर डिटेक्ट होतात. यासाठी कंटेनरमध्ये साधारण ३० ते ५९ मिलिलिटर लघवी जमा करावी लागते. अनेकदा लघवी जमा केल्यानंतर ती लगेच टेस्टिंग लॅबमध्ये नेऊन देणे शक्य नसते. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने सॅम्पल रेफ्रिजरेट करावे लागते.

काहीवेळा, विशेषतः पेशंट जर टॉयलेटमध्ये जाऊ शकत नसेल तर, कॅथेटरच्या साह्याने लघवीचा नमुना गोळा केला जातो. एकदा का सॅम्पल गोळा केले, की त्याचे परीक्षण करण्यासाठी तीन प्रकारच्या चाचण्या वापरल्या जातात.

१. व्हिज्युअल एक्झाम

यामध्ये लघवीचा रंग आणि स्वरूप याच्यावरून चाचणी केली जाते. लघवीचा रंग साधारण पारदर्शक असतो. तो धुरकट असेल किंवा लघवीला वेगळा वास येत असेल तर मूत्रमार्गातील जंतुसंसर्गाची शक्यता असते. लघवीमध्ये रक्ताचा अंश असेल तर ती लालसर किंवा तपकिरी दिसते. अर्थात पेशंटने टेस्टच्या आधी काय खाल्ले आहे याचाही परिणाम लघवीच्या रंगावर होतो. उदाहरणार्थ, बीट खाल्ल्याने लघवीच्या रंगात लालसरपणाची छटा दिसते.

२. डीप स्टिक टेस्ट

यामध्ये रसायनांच्या स्ट्रिप्स किंवा पट्ट्या लावलेली एक बारीकशी प्लास्टिकची कांडी सॅम्पलमध्ये घालतात. युरीनमध्ये काही विशिष्ट घटक हजर असतील किंवा त्यांची पातळी सामान्य नसेल तर या पट्ट्यांचा रंग बदलतो. ही टेस्ट खालील गोष्टी तपासते

      - युरीनमधील आम्लाचे प्रमाण किंवा पीएचची पातळी : पीएच ची पातळी सामान्य नसेल तर ते किडनीच्या किंवा मूत्रमार्गाच्या विकाराचे लक्षण असते.

      - युरीन कॉन्सन्ट्रेशन किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी : हे प्रमाण जास्त असेल तर याचा अर्थ पेशंटने पुरेशा प्रमाणात पाणी व इतर द्रवपदार्थ घेतलेले नाहीत.

- प्रोटिन्स : युरीनमध्ये प्रोटिन्सची पातळी कमी असणे नॉर्मल आहे. ही पातळी थोडीशी वाढलेली असेल तरी चालते. मात्र प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असल्यास किडनीच्या विकारांची शक्यता असते.

- शुगर : युरीनमध्ये साखरेचे अतिरिक्त प्रमाण आढळल्यास मधुमेहाची चाचणी करणे गरजेचे असते.

- केटोन्स : केटोन्स ही लिव्हरद्वारे तयार केली जाणारी रसायने आहेत. जेव्हा रक्तातील शर्करेचे ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी इन्सुलिन कमी पडते तेव्हा केटोन्स तयार होतात. त्यामुळे युरीनमध्ये केटोन्सचा अंश आढळल्यास शरीरात पुरेशा  इन्सुलिनची निर्मिती होत नाहीये हे समजते. त्यामुळे डायबिटीस टेस्ट करणे गरजेचे असते.

- बिलिरुबिन : लाल रक्त पेशी म्हणजेच रेड ब्लड सेल्सचे विघटन झाल्यानंतर बिलिरुबिन तयार होते. बिलिरुबिन रक्ताद्वारे लिव्हरपर्यंत वाहून नेले जाते. लिव्हरमध्ये ते रक्तापासून वेगळे होऊन पित्तात मिसळले जाते. युरीनमध्ये बिलीरुबिन आढळल्यास ते लिव्हर खराब झाल्याचे किंवा लिव्हरशी संबंधित आजाराचे लक्षण आहे.

- नायट्राइट्स किंवा ल्युकोसाईट एस्टरेज : हे घटक युरीनमध्ये असतील तर ते मूत्रमार्गाच्या जंतुसंसर्गाचे लक्षण आहे.

- रक्त : युरीनमध्ये रक्ताचा अंश आढळल्यास अजून चाचण्या कराव्या लागतात. हे किडनी खराब होणे किंवा किडनीचा जंतुसंसर्ग, किडनी किंवा ब्लॅडरमध्ये होणारे खडे, किडनी किंवा ब्लॅडरचा कॅन्सर किंवा ब्लड डिसऑर्डर्स याचे चिन्ह आहे.

३. मायक्रोस्कॉपिक एक्झाम

या चाचणीमध्ये युरीनचे काही थेंब मायक्रोस्कोप खाली घेऊन त्यांचे परीक्षण केले जाते. पुढे दिलेल्यापैकी कोणत्याही घटकांची पातळी आवश्यकतेपेक्षा जास्त असल्यास अधिक टेस्टिंग गरजेचे असते.

- पांढऱ्या रक्तपेशी (व्हाईट ब्लड सेल्स): हे इन्फेक्शनचे चिन्ह आहे.

- लाल रक्तपेशी (रेड ब्लड सेल्स): हे किडनीचे विकार, ब्लड डिसॉर्डर, किंवा मूत्राशयाचा कर्करोग यासारख्या आजारांचे चिन्ह आहे.

- बॅक्टेरिया किंवा यीस्ट: हे इन्फेक्शन दर्शवते.

- कास्ट्स: हे ट्यूबच्या आकाराचे प्रथिनांचे रेणू असतात. हे किडनीच्या विकारांमुळे तयार होतात.

- स्फटिक: हे युरीन स्टोनचे चिन्ह आहे.

मूत्रतपासणीमधून आजाराचे संपूर्ण निदान झाले नाही तरी ती एक पथदर्शी टेस्ट म्हणून नक्कीच उपयुक्त आहे. तुमची एकंदरीत शारीरिक स्थिती आणि तुम्हाला आढळणारी लक्षणे आणि मूत्रतपासणीचे निष्कर्ष यांच्या आधारे डॉक्टर तुम्हाला समस्यांबाबत मार्गदर्शन करू शकतात.

सबस्क्राईब करा

* indicates required