कांदा-लसूण का खाऊ नयेत आणि का खावेत? वाचा आयुर्वेद याबाबत काय म्हणतो..

शाकाहारातल्या जैन आणि वैष्णव प्रकारच्या जेवणात कांदा आणि लसूण खात नाहीत. इतरही बर्‍याच घरांत विशेषतः कोणत्याही गणपती, चातुर्मास अशा धार्मिक काळात केलेल्या स्वयंपाकातही कांदा आणि लसूण घालत नाहीत.  हे असं का आहे, याच्यामागचं कारण काहीसं धार्मिक आहे.

आयुर्वेद मानतो की आपल्या शरीरात सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण असतात. त्यातला तम हा गुण स्थितीदर्शक आहे. म्हणजे ज्याच्याकडे तम जास्त असेल, तो माणूस आहे आहे त्या स्थितीतच राहतो. काही कष्ट करावेत, कामं करावीत आणि आयुष्यात यश मिळवावं असं काहीही त्या माणसाकडून केलं जात नाही असं मानलं जातं. म्हणजे यात विद्यार्थ्याच्या अभ्यासापासून ते नोकरी-बिझनेसमधले कष्ट हे सगळेच आले. थोडक्यात, तम वाढवणारं अन्न आपल्या आयुष्यात अज्ञानाचा अंधार आणतो अशी खूप जुनी समजूत आहे. आणि आपला हा कांदा आणि लसूण दोघेही तामसिक! त्यामुळेच कांदा आणि लसूण खाऊ नये अशी एक धारणा आहे. 

कांदा आणि लसूण खाऊ नये या समजामागं आणखी एक धार्मिक कारणही आहे. पुराणांमध्ये कांदा आणि लसूण कसे निर्माण झाले याची एक कथा दिली आहे. त्या कथेत असं म्हटलंय की अमृतमंथनानंतर जेव्हा अमृताचं वाटप होत होतं त्यावेळी विष्णूने मोहिनीचं रूप घेतलं आणि सगळ्यात आधी देवांना अमृत दिलं. राहूच्या हे लक्षात आलं. त्यानं विष्णूचा हा कावा बरोब्बर ओळखला आणि तो रूप बदलून देवांमध्ये जाऊन बसला. थोडक्यात, त्यालाही अमृत मिळालं. राहू ते अमृत पीत असताना चंद्र आणि सूर्याने त्याची चुगली केली.  विष्णूला मग राहूचा राग आला आणि त्यानं आपल्या सुदर्शन चक्रानं राहूचं डोकं उडवलं. त्यावेळी राहूच्या रक्ताचे काही थेंब धरतीवर पडले आणि त्यातून कांदा आणि लसूण निर्माण झाला असं या कथेत सांगण्यात आलंय. राहू हा असुर होता. त्याच्या रक्तापासून निर्माण झालेले असल्यामुळे कांदा-लसूण खाऊ नये असं या कथेनुसार मानण्यात येतं. .

वर सांगितलेल्या कारणांमुळे कांदा-लसूण खाऊ नये असं जरी सांगितलेलं असलं तरी हे दोघेही आरोग्याच्या दृष्टीनं  खूप  गुणकारी अन्न घटक  आहेत. असुराच्या रक्तापासून निर्माण झाले असले तरी ते साधसुधं रक्त नाहीये. त्या रक्तात अमृताचा अंशही आहे म्हणून आरोग्याच्या दृष्टीने कांदा-लसूण फारच उपयुक्त आहेत. कांदा हा लसणीपेक्षा थोडासा सौम्य आहे पण दोहोंचेही गुणधर्म सारखेच आहेत. पाहूयात मग त्यांचे काय गुण आहेत –

- गुणाने तीक्ष्ण आणि उष्ण आहेत. त्यामुळं सर्दी-पडशासारख्या आजारांत एकदम गुणकारी आहेत. विशेषत: लसूण.

 

- अन्नपदार्थ पोटातून पुढे सरकवतात, सारक आहेत. 

- अन्नाला चव देतात

- पाचकाग्निची शती वाढवतात

- हृदयाला बल देतात

- शारीरिक बल वाढवतात

- त्वचा आणि केसांसाठी हितकर आहेत

- पोटदुखी, मूळव्याध, जंत, सर्दी, दमा या व्याधीमध्ये उपयुक्त

- अतिप्रमाणात खाल्ल्यास शरीरातून रक्तस्राव होतो म्हणजे रक्तपित्ताचा त्रास होऊ शकतो

 

आहारामध्ये कांदा-लसूण घ्यावे की घेऊ नयेत यांचा निर्णय आम्ही वाचकांवर सोडतो पण आरोग्याच्या आहारामध्ये दृष्टीने कांदा आणि लसूण दोन्ही अत्यंत उपयुक्त ठरतात यात कसलाही संशय नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required