computer

कोरोना विषाणूचा शोध १९६४ लागला होता? भेटा कोरोनाचा अभ्यास करणाऱ्या पहिल्या संशोधकाला!!

आज आपल्या सगळ्यांनाच कोरोना विषाणू बद्दल माहिती आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, कोरोना विषाणू हा १९६४ साली शोधण्यात आला होता? झालं असं की ज्या संशोधक बाईंनी तो शोधला होता त्यांच्यावर कोणाचाच विश्वास बसला नाही. त्यावेळी कोणालाही माहीत नव्हतं की पुढे जाऊन हाच विषाणू अख्ख्या जगात थैमान घालणार आहे.

कोण होत्या या संशोधक बाई?

या संशोधक बाईंचं नाव होतं डॉक्टर जून अल्मेडा. त्या स्कॉटलंडच्या होत्या. १९६४ साली त्यांनी लंडनच्या सेंट थॉमस हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेत या नव्या विषाणूचा शोध लावला. डॉ. अल्मेडा यांनी कोरोना विषाणूचा शोध कसा लावला याबद्दल आपण सविस्तर वाचूच पण त्यापूर्वी त्यांच्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया.

डॉक्टर जून अल्मेडा कोण होत्या?

अल्मेडा यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९३० साली स्कॉटलंडच्या ग्लासगो येथे झाला. त्यांचे वडील बस ड्राइव्हर होते. त्या शाळेत हुशार होत्या, पण फक्त घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांना वयाच्या १६ व्या वर्षीच शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. पुढे त्यांना ग्लासगो रॉयल इन्फर्मरी मधील प्रयोगशाळेत तंत्रज्ञ म्हणून नोकरी मिळाली. काहीकाळ नोकरी केल्यानंतर त्या लंडनला गेल्या.

लंडनमध्ये त्यांची व्हेनेझुएलाच्या एका कलाकाराशी ओळख झाली. दोघांनी लग्न केलं आणि ते कॅनडाला गेले. कॅनडाच्या ऑंटेरियो कॅन्सर इन्स्टिटय़ूटमध्ये अल्मेडा यांना इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी टेक्निशियनची नोकरी मिळाली.

त्याकाळी कॅनडात संशोधनासाठी कॉलेजची डिग्री गरजेची नसायची. म्हणून अल्मेडा यांना शिक्षण नसूनही संशोधन करता आलं. त्यांनी तोवर माहीत नसलेल्या विषाणूंच्या संरचनेवर काम केलं.

कोरोना विषाणूचा शोध

कॅनडात संशोधन केल्यानंतर अल्मेडा लंडनला परतल्या. तिथे त्यांनी डॉक्टर डेव्हिड टायरेल यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली. डेव्हिड टायरेल हे युकेच्या 'कॉमन कोल्ड रिसर्च सेंटर'चे प्रमुख होते. सर्दी आणि त्याच्याशी निगडित विषाणूंवर संशोधन करण्यासाठी कॉमन कोल्ड रिसर्च सेंटरची स्थापना झाली होती.

संशोधनासाठी वेगवेगळ्या लोकांच्या नाकातील मळाचे नमुने घेण्यात आले होते. या नमुन्यांमधून नवीन विषाणूंचा शोध घेण्यात यश मिळालं होतं. हे करत असताना एकदा एका लहान मुलाकडून मिळवलेल्या नमुन्याचा अभ्यास करताना अडचण आली, म्हणून डेव्हीस टायरेल यांनी तो नमुना परीक्षणासाठी अल्मेडा यांच्याकडे पाठवला. अल्मेडा यांनी नमुन्यात असलेला विषाणूचा अभ्यास केला आणि त्याची छायाचित्रे मिळवली. आज ज्याला आपण कोरोना म्हणतो त्याचं वर्णन करताना अल्मेडा म्हणाल्या होत्या की, 'हा विषाणू शीतज्वरासारखा वाटतो, पण शीतज्वराहून वेगळा आहे.'

अल्मेडा यांनी कोरोना विषाणू शोधण्यासाठी सहज सोप्या आशा 'इम्यून इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी'चा (IEM) वापर केला. विषाणू ओळखण्यासाठी आणि संशोधनासाठी IEM चा वापर केला जायचा. अल्मेडा या IEM चा वापर करणाऱ्या पहिल्या काही संशोधकात मोडतात.

या संशोधनातून हा नवीन विषाणू आहे हे सिद्ध झालं. डेव्हिड टायरेल, सेंट थॉमस हॉस्पिटलचे प्रमुख थॉमस वॉटरसन आणि स्वतः जून अल्मेडा यांनी मिळून नव्या विषाणूला कोरोना नाव दिलं. कोरोनाच का? तर कोरोना हा क्राऊन शब्दावरून घेण्यात आला आहे. या विषाणूवर असलेल्या मुकुटासारख्या रचनेमुळे त्याला हे नाव मिळालं.

दुर्दैवाने या संशोधनाला तेवढी प्रसिद्धी आणि मान्यता मिळाली नाही. अल्मेडा यांनी घेतलेली छायाचित्रे कोणत्याही नव्या विषाणूची छायाचित्रे नसून शितज्वराच्या (इन्फ्लुएंझा) विषाणूचीच चित्रे असल्याचा दावा करण्यात आला. हे फोटो पाहा.

पुढे संशोधनानंतर दोन वर्षानंतर अल्मेडा यांचं संशोधन आणि त्यांनी घेतलेली छायाचित्रे ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित केली.

तर मंडळी, आज जगभरात धुमाकूळ घालत असलेला कोरोना व्हायरस चीनमधून पसरला असला तरी त्याचा इतिहास एवढा जुना आहे. माहिती आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका.

सबस्क्राईब करा

* indicates required