या ११ देशांच्या ध्वजांचा सारखेपणा पाहून चक्रावून जाल...पाहा बरं भारताचा ध्वज कोणत्या देशाने ढापलाय ते !!

राष्ट्रध्वज हा देशाचं प्रतिक आणि अस्मिता असतो. कोणतीही सामाजिक चळवळ किंवा क्रांती ही ध्वजाशिवाय घडून आलेली नाही. ध्वजाचं महत्त्व बघता जगातल्या प्रत्येक देशाने आपलं प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रध्वज तयार केला आहे आणि ती त्यांची ओळख बनली आहे. आपला तिरंगादेखील आपल्या देशाबद्दल खूप काही बोलून जातो.
मंडळी, जगभरात प्रत्येक देशाचा वेगळा ध्वज असला तरी काही देश असेही आहेत ज्यांनी दुसऱ्या देशाचा झेंडा जवळजवळ कॉपी केला आहे. आता हेच बघा ना, आपल्या भारताच्याच ध्वजामध्ये थोडा फार फेरबदल करून नायजर या देशाने स्वतःचा ध्वज तयार केला आहे.
अशी काही उदाहरणे घेऊन आम्ही आज आलो आहोत. चला तर पाहूयात ते कोणते देश आहेत ज्यांचे ध्वज जवळजवळ सारखेच आहेत. त्यांनी एकमेकांची कॉपी तर केली नाही ना ?
१. नेदरलँड आणि लग्झेम्बर्ग

दोन्ही देशांचे ध्वज सारखेच आहेत, पण त्यांच्या रंगांच्या शेड्समध्ये फरक आहे. यात एक लक्षात घेतलं पाहिजे की लग्झेम्बर्गचा झेंडा १८३० साली स्वीकारला गेला होता तर नेदरलँडचा झेंडा १९३७ साली स्वीकारला गेला.
२. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

हे दोन्ही देशांवर ब्रिटिशांनी राज्य केलं असल्याने इंग्लंडचा ‘युनियन जॅक’ या दोन्ही देशांच्या झेंड्यावर आहे आणि त्याचबरोबर थोड्या फार फरकाने बनावटसुद्धा सारखीच आहे.
३. आयर्लंड आणि कोत द'ईवोआर

आयर्लंडच्या ध्वजाचा स्वीकार १९२२ साली झाला तर ‘कोत द'ईवोआर’ चा झेंडा १९५९ रोजी स्वीकारला गेला. आपल्या तिरंग्याशी मिळते जुळते रंग या दोन्ही देशांच्या झेंड्यांमध्ये आहेत.
४. अमेरिका आणि मलेशिया

१७७७ साली स्वीकारल्या गेलेल्या अमेरिकेच्या ध्वजाशी मलेशियाचा ध्वज मिळताजुळता आहे. अमेरिकेच्या ध्वजावर ५० चांदण्या दिसून येतात, जे ५० राज्यांचं प्रतिक आहे.. तर मलेशियाच्या झेंड्यात असलेला चंद्र हा इस्लामी राष्ट्राचं प्रतिक आहे.
५. इटली आणि मेक्सिको

दोन्ही देशांचे झेंडे दिसण्यास सारखे असले तरी त्यांचा वापर दोन्ही देश स्वतंत्रपणे फार पूर्वीपासून करत आहेत. त्यामुळे ही कॉपी आहे की योगायोग हे ठरवायला जागा नाही. रंग सारखे असले तरी मेक्सिकोच्या झेंड्याच्या मधोमध मेक्सिकोचं बोधचिन्ह दिसून येतं.
६. इजिप्त, इराक, सिरीया, सुदान आणि येमेन

या पाचही देशांचा समूह हा अरब राष्ट्रांमध्ये मोडत असल्याने त्यांच्या राष्ट्रीय ध्वजांमध्ये बरीच समानता दिसून येते.
७. कतार आणि बहारीन

कतार आणि बहरीनचे राष्ट्रध्वज हे जवळजवळ सारखेच आहेत. फरक इतकाच की दोन्ही ध्वजांचा रंग आणि आडवे त्रिकोण हे वेगळे आहेत. बहरीनचा झेंडा लाल रंगात असून त्याचे ५ त्रिकोण हे इस्लामच्या ५ आधारस्तंभांना दर्शवतात, तर कतारच्या ध्वजाचा रंग हा जांभळा असून त्यात ९ त्रिकोण आहेत.
८. निकारगुवा आणि अर्जेन्टिना

या दोन्ही देशांच्या राष्ट्रध्वजांमध्ये असलेला रंग आणि त्यांच्या मधोमध असलेल्या बोध चिन्हांमुळे ते सारखे वाटतात. पण इथेसुद्धा शेड्सचा फरक आहेच.
९. मोनॅको आणि इंडोनेशिया

या दोन्ही देशांचे राष्ट्रध्वज जवळजवळ मिळतेजुळते आहेत. फरक फक्त रंगांच्या शेड्सचा आहे आणि तो फरकही लगेच समजून येत नाही. पण यात इंडोनेशियाचा झेंडा हा सर्वात आधी स्वीकारला गेला होता.
१०. नेदरलँड आणि फ्रान्स

या दोन देशांचे झेंडे एकच आहेत, फक्त एक आडवा आहे तर दुसरा उभा. आठवतं, गेल्या वर्षी फ्रान्समधल्या नीस वर हल्ला झाला तेव्हा कित्येक ठिकाणी फ्रान्सचा समजून नेदरलँडचा झेंडा लावण्यात आला होता..
११. भारत आणि नायजर

भारताच्या राष्ट्रध्वजातील केशरी रंग नायजरच्या ध्वजातही आहे, पण केशरी रागाची वेगळी शेड नायजरच्या ध्वजात वापरली गेली आहे. आपल्या अशोकचक्राच्या जागी नायजरच्या ध्वजामध्ये मधोमध केशरी ठिपका आहे, जो सूर्याचं प्रतिक आहे. भारताचा झेंडा अस्तित्वात आल्यानंतर कित्येक वर्षांनी (१९५९) नायजरचा झेंडा स्वीकारला गेला होता.