हिरोशिमा-नागासाकीबद्दलच्या या १० गोष्टी तुम्हांला माहित आहेत का?

६ ऑगस्ट १९४५, अमेरिकेने हिरोशिमावर जगातला पहिला अणुबॉंब टाकला. हजारो जीव मेले, जे जिवंत राहिले ते किरणोत्सर्गामुळं जिवंतपणी नरकयातना भोगत राहिले आणि पुढच्या पिढ्यांवरही याचा परिणाम तर झालाच. जे झालं ते खूप माणसाच्या इतिहासात खूप दुर्दैवी होतं.
तर मंडळी या आज पाहूया हिरोशिमा-नागासाकी हल्ल्याशी संबंधित काही गोष्टी-
१. अमेरिकेने दिला होता इशारा..
अमेरिकेने आपण असा हल्ला करणार अशी इशारा देणारी पत्रकं जपानमध्ये विमानाद्वारे टाकली होती. यात त्यांनी ते हल्ला करणार असलेल्या शहरांची यादी दिली होती. आमचं युद्ध लोकांसोबत नाहीय, तेव्हा त्यांनी ही शहरं रिकामी करून आपला जीव वाचवावा असं या पत्रकांत म्हटलं गेलं होतं.
२. हिरोशिमा नागासाकीवर टाकले गेलेले बॉंब वेगवेगळे होते
हिरोशिमा नागासाकीवर टाकले गेलेले बॉंब एकसारखे नव्हते. या बॉंब बनवण्याच्या प्रकल्पाची म्हणजेच मॅनहॅटन प्रोजेक्टची सुरूवात १९३९मध्येच झाली होती. हिरोशिमावर टाकल्या गेलेल्या बॉंबचं नाव होतं ’लिटल बॉय’ आणि तो बनला होता युरेनिअम-२३५ या मूलद्रव्यापासून. तर नागासाकी बॉंबचं नांव होतं ’फॅट मॅन’ आणि तो प्लुटोनिअम-२३९ या मूलद्रव्यापासून बनला होता. [स्रोत]
३. हिरोशिमा शांतताज्योत
या हल्ल्यांतल्या बळींच्या स्मरणार्थ १९६४पासून जपानमधल्या हिरोशिमा इथं एक शांतताज्योत आजवर तेवत ठेवण्यात आलीय. जेव्हा पृथ्वीवरून सारी अण्वस्त्रं नष्ट होतील तेव्हाच आम्ही ही ज्योत विझवू हा जपानचा निर्धार आहे.
४. डक-ऍंड-कव्हरने वाचवले प्राण
हिरोशिमा हल्ल्यानंतर तिथला एक पोलिस नागासाकीला गेला आणि त्यानं बॉंबहल्ला झाला तर ताठ उभं न राहता वाकून किंवा झुकून स्वत:चं रक्षण करणं, ज्याला इंग्रजीत डक-ऍंड-कव्हर टेक्निक म्हणतात, ते नागासाकी पोलिसांना शिकवलं. परिणामी जेव्हा नागासाकीवर हल्ला झाला, तेव्हा एकही पोलिस मेला नाही असं सांगण्यात येतं.[ स्रोत]
५. सुदैवी की दुर्दैवी?
हिरोशिमाच्या हल्ल्यातून त्सुतोमु यामागुची( Tsutomu Yamaguchi) नावाचा मनुष्य बचावला आणि त्याचं दुर्दैव असं की तो तिथून त्याच्या नोकरीच्या ठिकाणी नागासाकीला गेला. पण सुदैवानं तो तिथंही बचावला. म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी?? [स्रोत]
६. बॉंब घेऊन जाणार्या १२ जणांपैकी फक्त तिघांना आपण कोणत्या मोहिमेवर जात आहोत हे माहित होतं..
हा हिरोशिमा बॉंब घेऊन जाणार्या विमानाचं नांव होतं इनोला गे. त्यांची ही मोहिम अयशस्वी झाली तर त्या लोकांसाठी विमानात १२ सायनाईडच्या गोळ्या ठेवण्यात आल्या होत्या. [ स्रोत] त्या विमानातल्या १२ जणांपैकी फक्त तिघांना आपण कोणत्या मोहिमेवर जात आहोत हे माहित होतं. [स्रोत]
७. या हल्ल्यात काय काय वाचलं- बँकेचा लॉकर
या बॉंबहल्ल्यातून एका अमेरिकन बँकेचा लॉकर सहीसलामत वाचला होता. जेव्हा ही बॅंक हल्ल्यानंतर पुन्हा उभारण्यात आली, तेव्हा बॅंक मॅनेजरने खास पत्र लिहून हा लॉकर बनवणार्या कंपनीचं अभिनंदन केलं होतं.
८. या हल्ल्यात काय काय वाचलं- झाडं
या हल्ल्यात आणखी काय वाचलं असेल तर ती होती जिन्को बिलोबा(Gingko Biloba) नावाची झाडं. झाडांची ही प्रजात २७करोड वर्षं जुनी आहे असं मानण्यात येतं. या झाडांना किडीचा किंवा कोणत्याही रोगाचा सहसा प्रादुर्भाव होत नाही. या झाडांची हल्ल्यात झालेली हानी लवकरच भरून आली आणि ही झाडं आजही जिवंत आहेत असं सांगण्यात येतं. [स्रोत]
९. हिरोशिमा सावल्या
या बॉंबमधून बाहेर पडणारी उष्णता आणि किरणोत्सर्ग इतके जहाल होते, की त्या उष्णतेमुळे लोकांच्या आणि तिथल्या वस्तूंच्या सावल्या जमीनीवर कायमच्या कोरल्या गेल्या. त्यांना हिरोशिमा सावल्या म्हणून ओळखण्यात येतं.
१०. एका हनिमूनमुळं ओढवलं नागासाकीवर संकट
आता ही खूप गंमतीदार आणि तितकीच दु:खद गोष्ट आहे. खरंतर नागासाकी हे शहर या बॉंबहल्ल्यांच्या यादीत नव्हतंच. यादीतली मूळ ठिकाणं होती – कोकुरा, हिरोशिमा, योकोहामा, निगाता आणि क्योटो. पण अमेरिकेचे युद्धसचिव हेन्री स्टिम्पसन क्योतोला एकेकाळी हनिमून साजरा करायला गेले होते आणि त्या ठिकाणाशी त्यांच्या आठवणी निगडित होत्या, त्यामुळं त्यांनी यादीतून क्योतोचं नांव काढलं आणि नागासाकीवर संकट ओढवलं.
जे झालं ते अर्थातच चांगलं झालं नाही. पण आज ज्यांच्याकडे अण्वस्त्रं आहेत त्यांना या अस्त्रांचा उपयोग केल्यास त्याचे किती गंभीर आणि भयानक परिणाम होतील हे या बॉंबहल्ल्यांमुळं चांगलंच कळालंय. या सर्व राष्ट्रांनी ही अस्त्रं फक्त शक्तीप्रदर्शनासाठी वापरावी आणि त्यांचा प्रत्यक्ष वापर कधी करू नये हीच एक आशा आपण व्यक्त करू शकतो.