computer

मुंबईत भेट द्यायलाच हवी अशी १० ठिकाणं...तुम्ही किती पाहिलीत ?

आजच्या मुंबईला विविधतेचे अनेक पदर आहेत. मुंबईमध्ये जे जे आले, त्यांनी आपला प्रभाव मुंबईवर पाडला. दक्षिण मुंबईत इंग्रजांचा प्रभाव आढळतो, थोडं पुढे आलं की आधुनिक इमारतींनी गजबजलेला परिसर आपल्याला दिसेल, याच आलिशान इमारतींच्या सानिध्यात उभ्या राहिलेल्या झोपडपट्ट्यासुद्धा आपल्याला दिसतील. मुंबईत महालक्ष्मी आहे तर दुसरीकडे ‘हाजी अली दर्गा’ सुद्धा आहे. मुंबईच्या या विविधतेला बघताना आपल्याला दिवस पुरणार नाही.

...पण जर तुम्हाला मुंबई फिरायचीच असेल तर खालील १० ठिकाणांना नक्की भेट द्या. तर मग चला मंडळी, आज पाहूयात मुंबईतली १० सुंदर ठिकाणं ज्यांनी मुंबईची ओळख निर्माण केली आहे...

१०. छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय

छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय त्यात असणाऱ्या ऐतिहासिक संग्रहाशिवाय त्याच्या बांधणीमुळेदेखील प्रसिद्ध आहे. राजपूत शैली, जैन शैली, इस्लामी शैली अशा  विविध स्थापत्यशास्त्राचा मिलाप या इमारतीत दिसून येतो. या सुंदर इमारतीबरोबरच संग्रहालयात ठेवलेल्या 50,000 प्राचीन कलाकृती या संपूर्ण जागेला एक वेगळंच महत्वं निर्माण करून देतात.

९. गेटवे ऑफ इंडिया

छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयपासून जवळच गेटवे ऑफ इंडिया आहे. जॉर्ज पंचम याच्या भारतभेटीच्या वेळी गेटवे ऑफ इंडियाची स्थापना केली गेली. इंडो-इस्लामी स्थापत्यशैली आणि गॉथीक स्थापत्यशैलीचा कौशल्यपूर्ण मिलाफ या वास्तूत बघायला मिळतो. गेटवे ऑफ इंडिया ही मुंबईची ओळख आहे, त्यामुळे इथे तर नक्कीच जायला हवं.

८. ससून डॉक

ससून डॉक ही एकेकाळची प्रसिद्ध गोदी होती. शिवाय इथे बाजारसुद्धा भरायचा. पण आता ही जागा वेगळ्या गोष्टीने ओळखली जात आहे. भित्तीचित्र, शिल्प, कलाकृतींनी भरलेल्या भिंती आपल्याला इथे पाहायला मिळतील. यासाठी एशियन पेंट्स आणि ‘स्टार्ट मुंबई अर्बन आर्ट फेस्टिव्हल’ यांनी  मिळून डॉक आर्ट प्रोजेक्ट तयार केला आहे. देश विदेशातील ३० कलाकार या कामात व्यग्र असतील असं म्हटलं जातंय. या भित्तीचित्रात नेमकं काय असेल? तर यात असेल मुंबईतील समुद्र, माणसं आणि त्यांच जीवनमान. मंडळी, एकंदरीत मुंबईच्या सौंदर्यात आणखी एक भर पडली आहे.

७. चर्चगेट स्टेशन

चर्चगेट स्टेशन आता नव्या कारणाने ओळखलं जात आहे. ते म्हणजे स्टेशनवरील २५ फूट उंच महात्मा गांधींच्या भित्तीचित्रामुळे. Eduardo Kobra नामक ब्राझिलियन कलाकाराने तयार केलेले हे भित्तीचित्र असून एशियन पेंट्स आणि ‘स्टार्ट इंडिया’च्या सहयोगाने तयार करण्यात आले आहे. चर्चगेट स्टेशनला यामुळे नवी ओळख मिळाली आहे.

६. एशियाटिक सोसायटी लायब्ररी

१८०४ साली बांधलेली ही एशियाटिक सोसायटी लायब्ररी आजही सुस्थितीत आहे.  ग्रीक आणि रोमन पद्धतीची स्थापत्यशैली आपण इथे पाहू शकतो. अनेक पोथ्या, दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखितं इथे जतन करून ठेवण्यात आले आहेत. पु. ल. देशपांडे आणि दुर्गा भागवत यांच्या हस्तलिखिताच्या प्रती देखील याच लायब्ररीच्या स्वाधीन आहेत. गेटवे ऑफ इंडियापासून जवळच ही लायब्ररी आहे.

५. पृथ्वी थियेटर

शशी कपूर आणि त्यांच्या पत्नी जेनिफर कपूर यांनी मिळून पृथ्वी थियेटरची स्थापना केली. पृथ्वीराज कपूर यांच्या आठवणीत त्यांनी थियेटरला ‘पृथ्वी’ हे नाव दिलं. मुंबईमधील सर्वोत्कृष्ट नाट्यगृह म्हणून पृथ्वीची ओळख आहे. अनेक नाटकं इथे सादर केली जातात. मुंबई बघायची असेल तर या थियेटरला भेट देणं आवश्यक आहे.

४. जहांगीर आर्ट गॅलरी

जहांगीर आर्ट गॅलरी हे  मुंबईतील आणखी एक प्रसिद्ध ठिकाण. कलेच्या चाहत्यांसाठी आणि कलाकारांसाठी जहांगीर आर्ट गॅलरी एक परफेक्ट डेस्टीनेशन आहे. जहांगीर आर्ट गॅलरीची स्थापना १९५२ साली झाली. याच भागात भरणारा काला ‘घोडा फेस्टिवल’ देखील प्रसिद्ध आहे.

३. लव मुंबई

बांद्र्याच्या समुद्रकिनार्यावर मोठ्या अक्षरात ‘लव मुंबई’ लिहिलेलं तुम्हाला दिसेल. या मोठ्या अक्षरातील लव मुंबईची निर्मिती काला घोडा फेस्टिवलसाठी करण्यात आली होती.  पण आता त्याला कायमचं मुंबईने आपलसं केलं आहे. याचं डिझाईन तयार केलं आहे हितेश मालवीय आणि हनीफ कुरेशी यांनी. मुंबईला यामुळे एक नवा सेल्फी पॉईंट मिळाला आहे.

२. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

युनेस्कोच्या वर्ल्ड हेरीटेज वास्तूंच्या यादीत छत्रपती शिवाजी टर्मिनसचा समावेश आहे. मुंबईमध्ये ही इमारत सी. एस. टी. या नावाने प्रसिद्ध आहे. भारतीय आणि गॉथीक शैलीतल्या बांधकामाची झलक या इमारतीत बघायला मिळते. गेटवे ऑफ इंडियानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबईची शान आहे.

१. मरीन ड्राईव्ह!!

संपूर्ण मुंबई बघून झाल्यानंतर मरीन ड्राईव्हवर येऊन एक मस्त संध्याकाळ घालवणे म्हणजे निव्वळ सुख आहे मंडळी. मरीन ड्राईव्हवर घालवलेली संध्याकाळ सहसा कोणीही विसरू शकत नाही. मुंबई दर्शनची सांगता तुम्ही या जागी करू शकता.

तर मंडळी मुंबई फिरायची असेल तर वरच्या सर्व ठिकाणांना नक्की भेट द्या बरं का !!