computer

इतिहासातील १० विचित्र नोकऱ्या !!

तंत्रज्ञानाचा विकास होण्याआधी सर्व कामे माणूस स्वतः करायचा. ती काळाची गरजही होती. पुढे तंत्रज्ञान विकसित झाल्यांनतर त्यातली बरीच कामे मशीन्स करू लागली. उदाहरणच द्यायचं झालं तर, मोबाईल फोन आल्यामुळे पत्रव्यवहार मोठ्या प्रमाणात बंद झाला. त्यामुळे पत्र पोहोचवण्याच्या संपूर्ण यंत्रणेवर परिणाम होऊन ती जवळजवळ बंद होत आली. तसेच हातमागाच्या कापड गिरण्या आधुनिक मशीन्समुळे बंद पडल्या.

खरं तर अश्या कामाची गिनतीच नाही राव. आज आम्ही इतिहासातल्या त्या कामांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्याबद्दल तुम्ही कधीही ऐकलं नसेल. खरं तर तुम्हाला प्रश्न पडेल की खरच या प्रकारची कामं होती का ?

चला आज वाचूयात इतिहासातील १० विचित्र नोकऱ्यांबद्दल.

१. विमानाचा आवाज ऐकणारा

प्रथम आणि द्वितीय विश्वयुद्धाच्या वेळी जेव्हा रडार नव्हते तेव्हा शत्रूच्या बॉम्ब वर्षाव करणाऱ्या विमानाचा शोध घेण्यासाठी एक यंत्र विकसित केलेलं होतं. या यंत्राच्या मधोमध एक माणूस बसलेला असायचा जो त्या यंत्राद्वारे हवेतील कंपन आणि बारीकसारीक आवाज टिपून शत्रू सैन्याच्या हवेतील हल्ल्यासंबंधी अंदाज बांधायचा. पण अर्थात ही यंत्रणा पूर्णपणे विश्वासार्ह नव्हती. पुढे जाऊन रडारचा शोध लागल्यानंतर या यंत्राचा आणि त्याला सांभाळणाऱ्या माणसाचा असा दोघांचाही उपयोग संपला.

२. बगलेतले केस कापणारा

हा एका विचित्र प्रकार खरोखर अस्तित्वात होता राव. पूर्वीच्या काळी वॅक्सिंग सारखा प्रकार नव्हता. त्यामुळे ऐतिहासिक रोमन साम्राज्यातील लोक काही खास माणसांना बोलवायचे जे बगलेतले केस काढण्याचं काम करायचे. हे काम कठीण असल्याने ते प्रत्येकालाच परवडत नसायचं त्यामुळे हा एक प्रतिष्ठेचा भाग होता. असं म्हणतात की हे काम फक्त उच्चभ्रू करून घ्यायचे.

३. बिछाना उबदार ठेवणारा.

असा पण कोणता जॉब असतो का ? हो असतो भाऊ.

कडाक्याच्या थंडीच्या दिवसात झोपण्याचा बिछाना सुद्धा थंड असायचा. अश्या बेडवर झोपणं कठीण असायचं म्हणून काही उच्चभ्रू त्यांच्या नेमलेल्या माणसांकडून झोपण्यापूर्वी तो बिछाना उबदार करून घ्यायचे. म्हणजेच मालकाच्या झोपण्यापूर्वी ही नेमलेली माणसं बिछान्यात थोडावेळ झोपायची. आजच्या काळात त्यांची जागा ‘हिटर’ने घेतली आहे.

४. खास प्रकारचे जोकर

हे खास जोकर काय करायचे ? तर हे जोकर अंत्यविधीच्या वेळी जालेल्या समस्त जनतेचं मनोरंजन करायचे. हे जोकर मृत व्यक्तीच्या आवाजाची, चालण्याच्या लकबीची, आणि त्यांच्या हावभावाची नक्कल करून बसलेल्यांच मनोरंजन करायचे. या विदुषकांमुळे तिथलं वातावरण हलकं फुलकं व्हायचं.

५. राजाच्या ‘शी’ ची काळजी घेणारा नोकर

हे काम जरा जास्तच विचित्र आहे भाऊ.

ब्रिटनच्या ८ व्या हेन्रीच्या काळात अश्या प्रकारचं काम करणाऱ्याला “Groom of the stool” हे नाव दिलं गेलं होतं आणि अशी कामे करणारी माणसे नोकरी म्हणून हे काम करायचे. यांच काम थोडं किळसवाणं म्हणता येईल अश्याच प्रकारात मोडत होतं. राजाच्या हगवणीची वेळ तपासणे आणि त्याप्रमाणे राजाच्या जेवणाची तयारी करणे तसेच राजाला जेव्हा ‘शी’ यायची तेव्हा ती साफ करण्यापर्यंतची कामे ही लोक करत. आजच्या काळात अश्या प्रकारच्या कामाची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही.

६. फटके खाणारा मुलगा

हा प्रकार तुम्हाला थोडा क्रूर वाटू शकतो.

पूर्वीच्या काळी सरदार, अमीर उमराव, राजे आपल्या मुलांसाठी काही मुलांची नेमणूक करत. ही मुलं त्या सरदारांच्या मुलांच्या बदल्यात शिक्षकांचे फटके खात. या मुलांना त्यांच्या बदल्यात मार खाण्यासाठीच नेमलं जायचं. यापाठी एक छुपा हेतू सुद्धा होता. सुरुवातीला अश्या मुलांची उच्चभ्रू मुलांसोबत मैत्री करून दिली जायची. काही काळाने त्यांची मैत्री जेव्हा घट्ट व्हायची तेव्हा शिक्षक सरदारांच्या मुलांच्या बदल्यात या मुलांना मारायचे. असं म्हटलं जातं की आपला मित्र आपल्या बदल्यात मार खातोय हे बघून या मुलांच्या चुकांमध्ये सुधारणा व्हायची.

७. बोलिंग पिन्स सेट करणारा.

ज्या बोलिंग खेळाचा आपण आज आनंद लुटतो तो एके काळी मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार मिळवून देत होता. ज्या काळात बोलिंग पिन्स सेट करण्यासाठी मशीन विकसित झाली नव्हती त्या काळात पिन्स नीट आपल्या जागी ठेवण्यासाठी माणसांची मदत घेतली जायची. म्हणजेच आज जे मशीन एका झटक्यात करते ते काम त्या काळात माणसं करायची. तंत्रज्ञानामुळे ही नोकरीच संपुष्टात आली.

८. मानवी अलार्म क्लॉक

ज्या काळात अलार्म सारखा प्रकार अस्तित्वात नव्हता तेव्हा लोकांना उठवण्याचं काम ही मंडळी करायची. हे लोक एका नळीतून मटार फुंकून लोकांना जागं करायचे. हा खरोखर भलताच जॉब होता भाऊ.

९. वाचक

आज जसं कामाच्या व्यापामुळे आपल्याला रोजच्या बातम्या बघायला आणि वृत्तपत्र वाचायला वेळ नाही तसच पूर्वीच्या काळीही होतं. यावर उपाय म्हणून फॅक्ट्री मध्ये काम करणाऱ्या माणसांसाठी एका व्यक्तीला पुस्तके आणि बातमी वाचण्यासाठी बसवलेलं असायचं. हा माणूस मोठ्या आवाजात वाचन करायचा जेणेकरून सगळ्यांना ते ऐकू जाईल.

१०. धुराडे साफ करणारी मुलं

ज्या भागात बर्फ पडतो त्या भागात या प्रकारची नोकरी गरीब घरातल्या मुलांना दिली जायची. ही मुलं हिवाळा यायच्या आत घराचे धुराडे (चिमणी) आतून साफ करून द्यायचे. यासाठी त्यांना चिमणीच्या आत देखील उतरावं लागायचं. सडपातळ आणि सहज धुराडीत जाता येतील अश्याच मुलांना हे काम दिलं जायचं.

 

तर, अशी ही १० विचित्र कामं आता फक्त इतिहासाच्या पुस्तकातच वाचायला मिळतात.

सबस्क्राईब करा

* indicates required