computer

सायकलिंग करताना काय काळजी घ्यावी? या १० गोष्टी लक्षात ठेवा !!

वजन कमी करण्यापासून तर मसल्स बनविण्यापर्यंत, जर तुम्ही योग्य व्यायाम प्रकारचा शोध घेत असाल तर सायकलिंग तुमच्यासाठी अतिशय योग्य पर्याय ठरू शकतो. सायकलिंगमुळे स्टॅमिना वाढतो, तसंच हृदयासाठी ते चांगलं असतं असं जाणकार म्हणतात.

पण सायकलिंग सुरू करण्याआधी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. या टिप्स अंमलात आणल्यात तर तुमचा सायकलिंगचा प्रवास आणि अनुभव भन्नाट होऊ शकतो. काय आहेत या टिप्स?

1) डोक्याची काळजी घ्या.

असं म्हणतात की सिर सलामत तो पगडी पचास!! हे सायकलिंगबाबतही लागू पडते. सायकल जरी बाईकइतक्या वेगात जात नसली तरी सायकलिंगमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या लक्षात घेण्यासारखी आहे. म्हणून सायकलिंग करताना नेहमी हेल्मेट सोबत असू द्यावे.

2) कपड्यांची योग्य निवड

सायकलिंग करताना ढिले कपडे घालू नयेत. अंगासोबत असलेले आरामदायी कपडे घालायला हवेत. विशेषत: स्त्रियांनी सायकलच्या चाकात अडकू शकतील असे ओढणी किंवा घेरदार कपडे टाळावेत. पण हे कपडे खूप तंग नसावेत, सहजपणे त्यात शरीराची हालचाल करता यावी असे कपडे शक्यतो निवडावेत.

3) गियरचा योग्य उपयोग

गियरचा योग्य उपयोग हे सायकलिंगचे महत्वाचे तत्त्व आहे. सायकल चढावर असेल तेव्हा छोट्या गियरचा वापर करायला हवा. त्यामुळे तुमच्या गुडघ्यांना त्रास होणार नाही. जास्त वेळ वरच्या गियरमध्ये सायकल चालवू नये, यामुळे गुडघ्यांना त्रास होतो.
 

4) सायकलची योग्य निवड

सायकलिंग करताना योग्य सायकलची निवड हाही एक महत्वपूर्ण भाग आहे. सायकलचे सगळे पार्ट व्यवस्थित काम करत आहेत का हे बघणे गरजेचे असते. गियर, पॅडल जर योग्यप्रकारे काम करत नसतील तर सायकलिंगची मजा येत नाही.
 

5) बूट घातलेले असू द्या.

सायकलिंग करताना नेहमी बूट घालायला हवेत. चप्पल किंवा स्लीपर पॅडलवरून स्लिप होण्याचा धोका असतो. बूट घातल्याने आरामदायी वाटते आणि सायकलिंग सोपे होते.

6) पोजिशन बदलत रहा.

सायकल चालवताना आपल्या बसण्याच्या स्थितीत सतत बदल करत रहा. हँडलवरील आपले हातसुद्धा अधूनमधून पुढे मागे करत राहिले पाहिजे.

7) नियमांचे पालन करा.

सायकल चालवताना आपली लेन कधीच सोडू नये. लेन सोडल्यास अपघाताचा धोका असतो.

8) इयरफोन वापरू नका.

सायकलस्वार आणि इयरफोन हे समीकरण सर्रास दिसते. पण हे चुकीचे आहे. कानात इयरफोन असल्यास हॉर्नचा आवाज ऐकू येत नाही. त्यामुळे अपघात होऊ शकतो.

9) मान ताठ ठेवा

सायकल चालवताना मानदुखीचा त्रास होऊ नये म्हणून मान नेहमी सरळ ठेवली पाहिजे. तसेच रस्त्यात येणारे अडथळे सुद्धा स्पष्ट दिसतात.

१0) हळूहळू सुरुवात करा.

तुम्ही नव्याने सायकल चालवण्यास सुरवात करणार असाल तर आधी कमी अंतरासाठी आणि हळू सायकल चालवा. जसजसा अनुभव वाढेल तसा स्पीड आणि अंतर वाढवले तर हरकत नसते.

सध्यातरी लॉकडाऊनच्या काळात बाहेर जाणे शक्य नाही. पण हळूहळू हे नियम शिथिल होतील तेव्हा सायकल चालवणे हा उत्तम व्यायाम होऊ शकतो.

सबस्क्राईब करा

* indicates required