computer

या शंभरीपार कासवाने जन्माला घातली आहेत ८०० पिल्लं....अख्ख्या प्रजातीला वाचवणारा खरा हिरो !!

वेगवेगळ्या कारणांनी कधीकधी प्राण्यांची संपूर्ण प्रजातीच लुप्त होते. आज आम्ही अशा प्राण्यांची एक यादी घेऊन आलो आहोत. या लुप्त होणाऱ्या प्राण्यांचा निसर्गावर, अन्नसाखळीवर परिणाम हा होतोच.  हे थांबवण्यासाठी आता प्रयत्न होताना दिसत आहे. कॅलिफोर्नियाच्या सांता क्रुझ बेटावर असाच एक प्रयत्न झाला होता. परिणामी कासवांची एक संपूर्ण प्रजाती लुप्त होता होता वाचली आहे. आज आम्ही या यशामागे असलेल्या हिरोबद्दल सांगणार आहोत. चला तर भेटूया दियागोला.

सांता क्रुझ बेटावर १९६० साली कासवांच्या ‘चेलोनोइडिस हूडेन्सिस’ प्रजातीला वाचवण्यासाठी प्रजनन कार्यक्रम राबवण्यात आला होता. यासाठी या प्रजातीतल्या शेवटच्या उरलेल्या २ नर आणि १२ मादी कासवांचा सांभाळ करण्यात आला होता. दियागो हा शेवटच्या नरांपैकी एक होता. तेव्हा राबवल्या गेलेल्या प्रजनन कार्यक्रमामुळे ‘चेलोनोइडिस हूडेन्सिस’ कासवांची संख्या आता २००० एवढी वाढली आहे. यातील ८०० पिल्लं एकट्या दियागोची आहेत. 

दियागोच का?

पहिलं कारण मादी कासवांनी त्याला सर्वाधिक पसंती दिली. अभ्यासातून हे सिद्ध झालं आहे की कासवांमध्ये मानवाप्रमाणेच नर आणि मादी यांच्यात नातं निर्माण होतं. दियागोच्या बाबतीत आणखी एक कारण होतं, ते म्हणजे त्याची कमालीची प्रजनन क्षमता.

दियागोचं  वय आता १०० पेक्षा जास्त आहे. ज्या कामासाठी त्याला आणलं होतं ते काम पूर्ण झालेलं असल्याने आता त्याला पुन्हा जंगलात सोडून देण्यात येणार आहे. पुढच्या १०० वर्षात ‘चेलोनोइडिस हूडेन्सिस’ कासव नष्ट होणार नाहीत याची खात्री झाल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आलाय.

चेलोनोइडिस हूडेन्सिस कासव लुप्त होण्याच्या मार्गावर का गेले?

चेलोनोइडिस हूडेन्सिस कासव त्यांच्या मोठ्या शरीरासाठी आणि लांब मानेसाठी ओळखले जातात. १८०० च्या काळात हे कासव नाविकांचं अन्न असायचे. मोठ्या आकारामुळे एका कासवापासून महिनाभर पुरेल एवढ्या प्रमाणात अन्न मिळायचं. या कारणाने ‘चेलोनोइडिस हूडेन्सिस’कासवांची संख्या दिवसेंदिवस कमी होत गेली. यात भर घातली ती जंगली बकऱ्यांनी. वेळीच प्रजनन कार्यक्रम राबवल्यामुळे आणखी एक प्राणी प्रजाती पृथ्वीवरून नष्ट होण्यापासून वाचली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required