काय निर्लज्ज जाहिरात आहे ही ?असं वाटंलं असेल तर हा किस्सा वाचाच !
दचकलात ना, ही जाहिरात बघून ! हा असा विषय आणि बोभाटावर ?आज लेखक भांग प्यालेत का काय ?तर मंडळी तसं काहीही नाही. जाहिरातीत जे म्हटलंय ते समजण्यासाठी जाहिरात एकदा पुन्हा वाचा !
जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीची ही जाहिरात १९९३ साली जेव्हा पेपरात आली तेव्हा सगळेच वाचक पहिल्या क्षणी हबकले होते. जॉन्सन अँड जॉन्सन ही जगात सर्वत्र पसरलेली कंपनी आहे. ती अशी जाहिरात का करेल ? या प्रश्नाचं उत्तर असं आहे कंपनीला त्यांच्या बेबी ऑइल उत्पादनासाठी मॉडेल्सची आवश्यकता होती. आता लहान बाळं जाहिरात कशी वाचणार ? पण बाळांचे पालक नक्कीच वाचतील. असं असलं तरी त्यांचं लक्ष वेधून कसं घ्यायचं हा प्रश्न होताच !
जॉन्सन अँड जॉन्सनची अॅड एजन्सी 'त्रिकाया'(नंतरची त्रिकाया-ग्रे) नावाची कंपनी होती.या जाहिरात कंपनीत असलेले क्रिस रोझॅरिओ आणि विकास गायतोंडे यांना ही भन्नाट कल्पना सुचली ! एकदा का या जाहिरातीत NUDE MODELS WANTED असं लिहिलं की सगळेच वाचक उत्सुकतेपोटी ही जाहिरात वाचतील याची त्यांना खात्री होती. झालं ही तसंच , ही जाहिरात इतकी गाजली की पालकांनी आपापली बाळं घेऊन कंपनीत हजेरी लावली !
अजूनही या जाहिरातीत असलेली गंमत लक्षात आली नसेल तर अधोरेखित उल्लेख जरूर वाचा !




