computer

१०० वर्षांपूर्वी भन्नाट डोक्यालीटीने तयार करण्यात आलेल्या २० गाड्या !!

गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हटले जाते. बऱ्याचदा एखाद्या संकटातून वाचण्यासाठी मार्ग शोधले जातात आणि यातूनच काहीतरी नवनिर्मिती होऊन जाते. युद्धाच्या काळात कधी शत्रूला मात देण्यासाठी म्हणून तर कधी शत्रूपासून बचाव करण्यासाठी म्हणूनही काही नवे शोध लावले गेले. यातील काही शोध आजही टिकून राहिले तर काही शोध मात्र काळासोबत लुप्त झाले. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात काही नाविन्यपूर्ण गाड्यांचा शोध लावला गेला. फक्त युद्ध काळात वापरण्याच्या हेतूनेच या गाड्यांची निर्मिती करण्यात आली असल्याने या गाड्या पुन्हा कुठेही दिसणे शक्यच नव्हत्या. आज या लेखातून आपण अशाच काही वेगळ्या आणि हटके असणाऱ्या गाड्यांची माहिती घेणार आहोत. 

१.

अशा यादीतील पहिली गाडी आहे क्रूप कुगलपँझर. ही गाडी दिसायला खरे तर एखाद्या गाडीच्या चाकासारखीच गोल होती. यात एकावेळी एकच व्यक्ती बसू शकत असे. ही गाडी म्हणजे एक छोटा टँक होता. त्याचा उपयोग शत्रूवर हल्ला करण्यासाठी केला जात असे. या गाडीतून हल्ला करणारी एकही व्यक्ती बचावली नाही हे दुर्दैव. जर्मनीने दुसऱ्या महायुद्धात अशा प्रकारच्या गाड्यांची निर्मिती केली होती.

२.

१९३० च्या दरम्यान जपानने आपल्या शत्रू पक्षाच्या विमानांवर लक्ष ठेवण्यासाठी या प्रकारच्या गाड्या बनवल्या होत्या. या गाड्यांचा आकार तुतारी सारखा असल्याने याला ‘वॉर ट्युबा’ असे नाव देण्यात आले होते. आज रडारच्या सहाय्याने हवेतील शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवता येते, पण रडारचा शोध लागला नव्हता त्याकाळात जपानने या गाड्यांचा वापर केला होता.

३.

१९५०च्या दशकात फ्रांसने एक अँटी-टँक मोटारसायकल बनवली होती. जिला वेस्पा १५० टीएपी हे नाव देण्यात आले होते. स्कूटरलाच टँकवर अटॅक करणारी भलीमोठी गन जोडण्यात आली होती. फ्रांसच्या पॅराट्रूपर्सकडून या स्कूटरचा वापर केला जात असे.

४.

आकाश मार्गे सामानाची वाहतूक करायची असेल तर कार्गो विमानांचा वापर केला जातो. नासाच्या अपोलो प्रकल्पावेळी मोठमोठ्या साधनांची वाहतूक करण्यासाठी एक मोठे कार्गो विमान बनवण्यात आले होते. विशेष म्हणजे या कार्गो विमानाचा आकार एखाद्या गप्पी माशासारखा होता. या विमानातून अंतराळात वापरता येतील अशा विशेष साधनांची वाहतूक करण्यात आली होती. 

५.

ब्रिटीश आणि दक्षिण आफ्रिकन फौजांमध्ये लढल्या गेलेल्या बोअर युद्धात वापरण्यासाठी मोटर वॉर कारची निर्मिती करण्यात आली होती. ही जगातील पहिली शस्त्रसज्ज गाडी होती. खास बोअर युद्धात वापरण्यासाठी याचे डिझाईन तयार करण्यात आले होते, मात्र १९०२ पर्यंत हिला मूर्त रुप देण्यात यशच मिळाले नाही. त्यानंतर या गाडीची निर्मिती करण्यात आली.

६.

१९६० मध्ये कॅडिलॅक सायक्लोन नावाची एक वेगळी कार बनवण्यात आली होती. याच्या पुढच्या टोकांना रडार सेन्सर्स बसवण्यात आले होते. अमेरिकेच्या हर्ली अर्ल यांनी ही कार बनवली होती. रॉकेटच्या आकाराच्या या गाडीचे डिझाईन आजच्या कार डिझाईन्सनाही मात देईल असे होते. 

७.

१९५० साली का व्यक्तीलाच  वापरता येईल या उद्देशाने हे एचझेड-१ एअरोसायकल नावाचे हेलिकॉप्टर बनवण्यात आले होते. आकाशातून खालच्या प्रदेशात देखरेख ठेवण्यासाठी या हेलिकॉप्टरचा पहिल्यांदा वापर करण्यात आला.

८.

१९३० मध्ये सोव्हिएत युनियनने एका भल्या मोठ्या वॉर टँकरची निर्मिती केली होती. ज्याला टी-४२ सुपर हेवी टँक असे नाव दिले होते. अवाढव्य आकारामुळे त्याचा प्रत्यक्षात काहीच वापर करता आला नाही, शेवटी हा टँक भंगारात घालण्यात आला.

९.

आकाशातून समुद्री प्रदेशावर देखरेख ठेवण्याच्या उद्देशाने पॅन केकच्या आकाराचे हे विमान बनवण्यात आले होते. ज्याचे नाव होते वॉट व्ही-१७३. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नौदलाला या विमानांचा उपयोग होईल अशी अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात याचा वापर करणे शक्य झाले नाही. युद्धासाठी ही विमाने प्रत्यक्षात निरुपयोगीच ठरली.

१०.

१९५३ साली जनरल मोटर्सने ‘फायर बर्ड’ नावाची ही कार बनवली होती. जीचा आकार विमानासारखा असला तरी प्रत्यक्षात ती रस्त्यावरून धावणारी कार होती. जनरल मोटर्सने पहिल्यांदा या कारसाठी गॅस टर्बाईन इंजिनचा वापर केला होता. पण ही कार प्रत्यक्षात रस्त्यावरून धावताना कधी दिसलीच नाही.

११.

इलेक्ट्रिक वाहनांना २०२० पासून चांगलीच मागणी वाढली आहे. पण १८८१ पासूनच इलेक्ट्रिक गाड्या बनवण्याचे प्रयत्न सुरू होते. १८८१ साली गुस्ताव ट्रूव्हेज यांनी पहिल्या इलेक्ट्रिक कारचे मॉडेल बनवून दाखवले होते. हे पहिले इलेक्ट्रिक गाडीचे मॉडेल अगदी तीनचाकी सायकल किंवा टांगा गाडी सारखेच होते.

१२.

रशियाने १९१४ मध्ये झार टँक नावाचा हा पहिला टँकचा नमुना बनवला होता.

१३.

शत्रूच्या प्रदेशात जाऊन कारवाई करणे शक्य व्हावे या उद्देशाने चपट्या आकाराची ही विमाने बनवण्यात आली होती. यांची चाचपणी यशस्वी झाली होती. या विमानांना जास्त वेग नव्हता त्यामुळे लष्करी कार्यवाही साठी अशा प्रकारची साधने वापरणे धोक्याचे ठरत होते. शेवटी १९७३ पासून यांचा वापर कायमचा बंद केला गेला.

१४.

ब्रिटीशांनी दुसऱ्या महायुद्धात आकाशातून उडणारे वाहन निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला ‘हाफनर रोटाबगी’ हे नाव देण्यात आले होते.

१५.

नासा एडी-१ नावाचे एक प्रायोगिक विमान होते. १९७९ ते १९८२ दरम्यान या विमानांची चाचपणी करण्यात आली होती.

१६.

१९३८ साली जर्मनीने आकाशातून निगराणी करण्यासाठी आणि बॉम्ब वर्षावासाठी Blohm & Voss BV 141 नावाचा हलका बॉम्बर बनवला होता. त्याला बीव्ही १४१ हे नाव देण्यात आले होते.

१७.

रशियाने १९३३ साली कॅलीनीन के-७ नावाचे एक मोठे बॉम्बर विमान बनवले होते, पण चाचणी घेतानाच हा बॉम्बर क्रॅश झाला.

१८.

१९६० मध्ये ग्रेट ब्रिटनमध्ये पील पी-५० नावाची एक सर्वात छोटी कार बनवण्यात आली होती. सर्वात छोट्या आकाराची ही पहिली अधिकृत कार होती.

१९.

१९४० मध्ये ब्रिटीश सैन्याकडून Standard Beaverette नावाची एक शस्त्रसज्ज कार बनवण्यात आली होती. या  कारचं आवरण स्टीलचे होते आणि आतील भाग लाकडी होता.

२०.

१९५८ मध्ये अमेरिकेने आकाशात उडणारी जीप बनवण्याचा प्रयत्न केला होता. त्याला कर्टीस-राईट एरीअल जीप म्हटले जात होते. 

 

या गाड्यांची नावे, त्यांचे उद्देश आणि त्यांची बनावट पाहून कुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. प्रयोग म्हणून बनवण्यात आलेल्या या गाड्या नंतर विस्मृतीतही गेल्या. यातल्या काही गाड्या तर फ्युचर व्हेहीकल प्रकारातल्या आहेत. या जुन्या कल्पनांना नवं रूप देऊन भन्नाट गाड्या तयार करता येतील. तुम्हाला काय वाटतं?

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required