कर्णबधीर आईवडिलांसाठी या ४ वर्षांच्या मुलाने जे केलं त्याचं तुम्ही सुद्धा कौतुक कराल !!
इंटरनेटवर बघितलेली आजची सर्वात चांगली गोष्ट आम्ही तुमच्या सोबत शेअर करत आहोत. नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात जिब्राएल टोसलंड नावाचा अवघ्या ४ वर्षांचा मुलगा आपल्या कर्णबधीर आईवडिलांसाठी खाणाखुणांनी टीव्ही शो समजावून सांगत आहे. हा व्हिडीओ तर खास आहेच पण त्या मुलाची गोष्टही तेवढीच खास आहे.
आई आणि वडील दोघेही कर्णबधीर असतील तर मुलांना त्यांच्याशी संपर्क साधायला कठीण जात असेल असं आपल्याला वाटू शकतं, पण जिब्राएलच्या बाबतीत उलट आहे. तो ४ महिन्यांचा होता तेव्हापासून त्याला खाणाखुणांची भाषा (sign language) शिकवण्यात आली आणि त्याने ती चटकन शिकूनही घेतली.
आता तुम्ही म्हणाल की एवढ्या लहान मुलाला खाणाखुणा कशा समजणार? तर, त्याला सुरुवातीला baby sign म्हणजे लहान मुलांसाठीच्या खुणा शिकवण्यात आल्या. जसे की दुध, अंघोळ, झोप या प्रकारच्या खुणा शिकवण्यात आल्या. तो जसजसा मोठा झाला तसतसं त्याने आणखी खाणाखुणा शिकून घेतल्या.
तो आता यात एवढा पारंगत झाला आहे की तो आईवडिलांशी सहज बोलू शकतो. दाराची बेल वाजली की तो आईला खुणांनी त्याची माहिती देतो, मेट्रो स्टेशनवर मेट्रोची घोषणा झाल्यावर तो लगेच सांगतो, दुकानाची वेळ काय आहे याबद्दल सूचना देतो. एक प्रकारे तो आईवडिलांसाठी कानांची भूमिका बजावतोय. एवढंच नाही तर ज्या मुलांना बोलताना समस्या येतात अशा मुलांशी तो लगेच मैत्री करतो.
मंडळी, जिब्राएलच्या व्हिडीओने इंटरनेटवर त्याचं भरभरून कौतुक होत आहे. तुम्ही त्याच्याविषयी काय म्हणाल?




