computer

उडती तबकडी आणि एलियन्सच्या खुणा दाखवणाऱ्या ५ विचित्र घटना !!

आमीर खानचा PK पिक्चर आठवतोय? तोच तो सिनेमा, ज्यात तो अस्सल भोजपुरीमध्ये सतत सांगायचा,"हमार गोला पे लोग झूट नाही बोलत.” त्यावेळी आपल्यातील बऱ्याच लोकांनी हलकीशी का होईना त्या सत्यवादी ग्रहाची कल्पना नक्कीच केली असणार. वास्तवात मात्र ना कोई मिल गया मधला जादू कधी कोणी पाहिलाय, ना त्या सत्यवादी ग्रहावरचा PK कोणाला भेटलाय. पण जगभरातले लोक मात्र परग्रहवासियांबद्दल प्रत्येक प्रकारचे अंदाज बांधत होते, बांधत असतात आणि भविष्यातही हे सुरूच राहणार. दर काही दिवसांनी अशी एखादी बातमीही असतेच जिथे कोणाला परग्रहवासीयांबद्दल काही पुरावे मिळाले असल्याचा दावा केला जातो. बऱ्याच वेळा हे दावे अगदीच पोकळ निघतात. तर आज आपण अश्या घटना पाहणार आहोत ज्यामध्ये UFO( Unidentified Floating Object) पहिल्याचा दावा करण्यात आलाय.

अगदी सोप्या भाषेत UFO चा अर्थ असा की, अंतरिक्षातून आलेल्या, त्वरित ओळखता न येणाऱ्या किंवा ज्यांचे स्पष्टीकरण देणे कठीण असते अशा हवेत तरंगणाऱ्या वस्तू म्हणजे UFO.

पहिली घटना:

विमी हा उत्तर फ्रान्समधला भाग आहे. पाच जुलै रोजी येथे गव्हाच्या शेतामध्ये वरील चित्रात दिसतोय तसा पॅटर्न आढळून आला आहे. शेतामधील काही पिके जमीनदोस्त करून असे पॅटर्न बनतात. युरोप आणि अमेरिकेमध्ये असे पॅटर्न मागील कित्येक दशकांपासून पाहायला मिळतात. काही वैज्ञानिकांच्या मते हे पॅटर्न परग्रहवासियांची निशाणी असावी तर काही लोक ह्याला दैवीशक्तीमुळे तयार झालेले जादुई पॅटर्न असेही म्हणतात.

कुतूहल आणि भीतीपोटी हा पॅटर्न पाहण्यासाठी विमी येथे लोकांची प्रचंड गर्दी जमू लागली आहे.

दुसरी घटना:

मे महिन्यामध्ये एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये एक पांढरा प्रकाश संथ आणि स्थिर गतीने पुढे मागे जातोय असे पाहायला मिळाले होते. हा व्हिडीओ इंग्लंडमधल्या टॉर्कवे डेव्होन इथे घेतला होता. रात्रीच्या वेळी एक कुटुंब आपल्या बागेत बसले असता त्यांना ही चकाकणारा पांढरा प्रकाश आकाशात दिसला. त्यांनी व्हिडीओ बनवून सोशल मिडीयावर उपलोड केला. हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला. इंटरनेटवर परग्रहवासियांच्या अस्तित्वा बाबतच्या चर्चेला अगदी उधाण् आले होते.

तिसरी घटना:

जपानमधल्या सेन्दाई आणि मुराटा इथे जूनमध्ये सकाळी सात वाजता फुग्यासारखी दिसणारी ही वस्तू आकाशात तरंगताना दिसली. ही वस्तू एका जागी स्थिर होती. सेन्दाई येथील अधिकाऱ्यांनी काढलेल्या अनुमानानुसार ते एक हवामानाचा अंदाज बांधणारे यंत्र होते. तिथल्या हवामान खात्याने मात्र ते जपानचे नाही असे स्पष्ट सांगितले. असाही अंदाज बांधण्यात आला होता की कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढवण्यासाठी उत्तर कोरियाने केलेली ही चाल असावी.

चौथी घटना:

हॅल कमिन्स ही अमेरिकेतल्या साऊथ कॅरोलायनामध्ये राहणारी महिला आहे. एका दुपारी ती आपल्या बागेत बसली असता अचानक तिला आकाशात काहीतरी चमकताना दिसले. तिने त्याचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडीयावरील UFO प्रेमींच्या ग्रुपवर टाकला. गूढरीत्या आकाशात चमकणारा प्रकाश पाहून सगळेच थक्क झाले होते. त्यांनतर परग्रहवासियांच्या अस्तित्वाबाबतच्या चर्चेला नव्याने प्रोस्ताहन मिळाले होते.

पाचवी घटना:

डर्बीशायर या इंग्लंडच्या भागात एप्रिलमध्ये एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. सतत आकार आणि रंग बदलणारी एक वस्तू आकाशात रात्रीच्यावेळी दिसली. मजेची गोष्ट अशी आहे की एक सारख्या ह्या दोन घटना दोन्हीवेळी दोन भिन्न बायकांनी पाहिल्या. उपग्रह निरीक्षण विभागाच्या निरीक्षणानुसार अशी कोणतीही वस्तू त्यावेळी तिथे पाहण्यात आली नव्हती. त्यामुळे चमकणारी रंगीत वस्तू नेमकी काय होती ही एक गूढ बनून राहिलेली गोष्ट आहे.

अश्या अजूनही बऱ्याच वस्तू इथून पुढील काळातही पाहायला मिळतील. लवकरच वैज्ञानिकांच्या प्रयत्नांना यश मिळो आणि परग्रहवासियांच्या अस्तित्वासंबंधी ठोस पुरावे मिळोत.

 

लेखिका : स्नेहल बंडगर

सबस्क्राईब करा

* indicates required