computer

७ रोचक फोटो आणि त्यामागच्या तितक्याच रंजक कहाण्या!!

कोणताही क्षण कॅमेऱ्यात टिपता येणं ही विज्ञानाची कृपाच म्हणावी लागेल.सेल्फी, निसर्ग-प्राणीजगतातली फोटोग्राफी, वास्तववादी.. कोणतीही फोटोग्राफी घ्या. ती एक कला आहे आणि देशोदेशीचे फोटोग्राफर्स आपली कला सर्वत्र दाखवत असतात. एशियन पेंट्सच्या जाहिरातीत म्हणतात,"हर रंग कुछ कहता है". पण आम्ही म्हणतो, "हर फोटो भी कुछ कहता है." तर आज आम्ही घेऊन आलो आहोत सात रोमांचक फोटोज आणि त्यामागच्या तितक्याच रंजक गोष्टी!!

१.

टोण्या हार्डिंगही अमेरिकेची स्केटिंग आणि बॉक्सिंगमधली निवृत्त खेळाडू. तिचे संपूर्ण करिअरच वादग्रस्त म्हणून ओळखले जाते. वरील फोटो हा १९९४ च्या ऑलिंपिक स्पर्धेच्या दोनपैकी एका सत्रातल्या स्पर्धेचा आहे. स्केटिंग स्पर्धेतला तिचा परफॉरमन्स चालू असताना अचानक ती थांबली आणि रडत पंचांच्या टेबलाकडे गेली. आपल्या बुटाच्या तुटलेल्या लेसची तक्रार अगदी बालिशपणे करू लागली. पंचानी तिला ब्रेक घेऊन पुन्हा एक संधी देऊ केली. मजेची गोष्ट अशी आहे की ह्याच वर्षीच्या ऑलिंपिकमध्ये टोण्याची साहायक स्पर्धक नॅन्सी केरीगन हिला खेळाच्या आधी मारहाण झाली होती. संभाव्य आरोपी म्हणून टोण्या हार्डिंगपासून विभक्त झालेला तिचा पती जेफ गिल्लोली आणि तिचा संरक्षक ह्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे तिचा हा रडका फोटो म्हणजे आजही एक आश्चर्याचा धक्का देणारा फोटो वाटतो. पुढे नॅन्सी केरीगन हिला त्याच ऑलिंपिक स्पर्धेत दुसऱ्या नंबरचे बक्षीस मिळाले, तर टोण्या हिला आठव्या नंबरवर समाधान मानावे लागले.

२.

वरील फोटो हा हवाई बेटावरचा आहे. फोटोत दिसणारा ज्वालामुखी जगातल्या पाच सर्वात जिवंत ज्वालामुखींपैकी एक असलेला किलावेया ज्वालामुखी आहे. ज्वालामुखीचा उद्रेक होत असतानाचा तो क्षण मारियो तमा ह्यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपला आहे. जिवंत ज्वालामुखी म्हणजे वरचेवर त्या ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात. अशा उद्रेकानंतर जवळजवळ ३०००० फुट उंच राखेचे ढग उसळतात.

१९८३ ते २०१८ ह्या कालावधीमध्ये किलावेया ह्या ज्वालामुखीचे बऱ्याच वेळा असे छोटे मोठे उद्रेक झालेले आहेत. २०१८ साली शेवटचा उद्रेक झाला होता. तेथील रहिवाशांना आता हे अंगवळणीच पडलं आहे. म्हणूनच की काय, तेथील लोक अत्यंत निवांत गोल्फ खेळताना दिसत आहेत. हीच संधी साधून मारियो यांनी हा सुंदर योगायोग आपल्या कॅमेऱ्यात अचूक टिपलाआहे. .

३.

आपल्या विमानप्रवासात घेतलेला हा फोटो एका मनुष्याने सोशल मिडियावर टाकला होता. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे पेपरवर असलेले नाव सोडल्यास बाकी सर्व मजकूर हा वाचण्यास महाकठीण असा होता. ह्या फोटोसोबत त्याने हे देखील लिहिले होते की, “विमानात माझ्या शेजारी बसलेला माणूस हे वर्तमानपत्र वाचतोय, नेमकं चाललंय तरी काय?" सोशल मीडीयावर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये एक प्रतिक्रिया अशी होती कि कदाचित हे कोणत्या तरी औद्योगिक कला प्रदर्शनाची जाहिरात असावी आणि त्याचं नाव “ओपन कोड लिव्हिंग इन डिजिटल वर्ल्ड“ असावं.

ही एका फ्रेंच वृत्तपत्राची पुरवणी आहे. तिच्या नावाचा फ्रेंचमधला उच्चार फ्य्यल असा होतो. ही पुरवणी राजकीय विषय सोडून फक्त कला,मनोरंजन, ललित लेख, साहित्य इत्यादी विषयांवर लिहिण्यासाठी होती. त्यामुळे हा लिहिलेला मजकूर नेमका काय आहे हे कळणे कठीणच आहे.

४.

मार्लिन मन्रो हिअमेरिकेतील एक प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल. २९ सिनेमांत तिने काम केले, बऱ्याच मोठ्या कंपन्यांच्या जाहिरातीमध्ये ती झळकली. एक आख्खं दशक तिने हॉलीवूडमध्ये गाजवले. तिची प्रसिद्धी इतकी होती की तिच्या मृत्यूनंतरही तिचे सिनेमे प्रेक्षक खेचून आणण्यात प्रचंड यशस्वी ठरत होते. प्रामुख्याने विनोदी भूमिका साकारणारी मार्लिन चित्रपट सृष्टीत “ब्लाँड बॉम्बशेल “ म्हणून ओळखली जायची. ब्लाँड बॉम्बशेल हा प्रकार त्याकाळात बऱ्याच अभिनेत्रींनी साकारला, पण आजतागायत लक्षात राहते ती फक्त मार्लिन मन्रो. एक आख्यायिका म्हणून तीचं नाव आजही तितक्याच उत्सुकतेने घेतलं जातं.

१९६० च्या काळात स्त्रियांच्या सिनेमातील सेक्शुआलीटीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन तिच्यामुळे बदलू लागला. अशी हि सुंदर, बोल्ड अभिनेत्री ट्रेनमधून प्रवास करतेय म्हटल्यावर थोडं आश्चर्य तर वाटणारच. तर हा फोटो रेडबुक मासिकाच्या “द रिअल मार्लिन मन्रो” (वास्तवातील मार्लिन मन्रो) ह्या प्रोजेक्टचा एक भाग होता. एड फेन्गर्ष ह्या फोटोग्राफरने मार्लिन मन्रोला तिच्या संपूर्ण दिवसात ती काय काय करते, कशी राहते असे संपूर्ण फोटो घेतले. हा प्रोजेक्ट म्हणजे मार्लिन मन्रो खऱ्या आयुष्यात तुमच्याआमच्यासारखी अगदी साधी सरळ आहे हे सांगण्याचा हेतू होता.

५.

तुम्ही म्हणाल ही भली मोठी रांग मॅक्डोनाल्ड्सची आहे? तर हो, अगदी बरोबर आहे तुमचं.

३१ जानेवारी १९९० मध्ये मॉस्कोमध्ये मॅकडॉनाल्डसची फ्रँचायजी सुरु करण्यात आली. जेव्हा ह्या मॅकडीचे बांधकाम चालू झाले तेव्हा त्यावेळी हे जगभरात असणाऱ्या एकूण मॅक्डोनाल्ड्सपैकी सर्वात मोठे प्रशस्त होते. एकूण ९०० माणसे बसू शकणाऱ्या ह्या जागी ३५००० मधून ६०० कामगारांची नियुक्ती करण्यात आली होती.

१९९० साली मॉस्कोमध्ये आर्थिक मंदीचा काळ होता. लोकांचे सरासरी उत्पन्न हे १५० रुबल प्रती महिना इतकेच होते. मॅक्डोनाल्ड्समध्ये एक मोठा बर्गर ३.७५ रुबलला विकला जात होता. उद्घाटनच्या दिवशी साधारण १००० लोक येतील असा अंदाज बांधण्यात आला होता. पण झाले अगदी उलट. त्या दिवशी जवळ जवळ ३०००० लोकांनी तासंतास रांगेत थांबून बर्गरचा आस्वाद घेतला. आजवर मॅक्डोनाल्ड्सच्या फ्रँचायजीमध्ये हा एक रेकॉर्ड आहे.

६.

जेनिफर लॉरेन्स हिचा ८५ व्या ऑस्कर पारितोषिक वितरण समारंभातला हा फोटो आहे. जेनिफर ही हॉलीवूड मधील अत्यंत यशस्वी,हुशार,गुणी अभिनेत्री आहे. २०१५ आणि २०१६ सालची जगातील सर्वात जास्त मानधन घेणारी महिला कलाकार होती. २०१३ सालच्या टाइम्स मासिकाच्या जगातील अत्यंत १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये तिचा समावेश होता.
‘सिल्वर लायनिंग्ज प्लेबुक’ ह्या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला. ऑस्कर अवॉर्ड मिळणे हे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. तिला पुरस्कार जाहीर झाल्यावर तो स्वीकारण्यासाठी ती स्टेजवर जात असताना घाईघाईत ड्रेसमध्ये पाय अडकून पायरीवर पडली, तेव्हाचा हा फोटो आहे.

सोहळा पार पडल्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना तिने असे सांगितले की,”माझे नाव घोषित झाल्यावर मी सतत केक वॉक केक वॉक केक वॉक असा विचार करत होते, पुरस्कार मिळाल्याचा आनंद उत्सुकता ह्यासर्वांमध्ये केक वॉक माझ्या डोक्यात इतके घुमू लागले की त्या नादात माझा ड्रेसच माझ्या पायात आला कधी आणि मी पडले कधी काही कळलेच नाही, पण आत्ता मला आठवतय की माझ्या स्टायलिशने मला किक वॉक किक वॉक करण्यास सांगितले होते.”

७.

किती छान एडिटिंग केलय, अगदी असच वाटतं हा फोटो पाहून. हो ना? पण हा एडिट केलेला फोटो नाही, तर सलग २८ वेळा प्रयत्न केल्यानंतर मिळालेला हा ‘तो’ द परफेक्ट शॉट आहे. तर हा फोटो काढला कोणी? अमेरिकेचे प्रसिद्ध फोटोग्राफर फिलीफ हल्स्मन ह्यांनी हा फोटो काढला आहे.

अतिवास्तववादी (surrealist) चित्रकार साल्वाडोर दाली १९४१ मध्ये न्यूयॉर्कमध्ये फिलीप ह्यांना भेटले. ज्याला नाविन्याचे वेड नाही तो कलाकार कसला? ह्या दोघांनी मिळून दाली ह्यांच्या आधीच्या ‘लेडा आटोमिका ‘ह्या पेटिंगचा ह्या फोटोसाठी वापर केला. लेडा ही ग्रीक पौराणिक कथेतील राणी आहे. ती एका स्टूलवर बसली आहे, तिच्या डाव्या बाजूला हंस बसलेला असून आजूबाजूला पुस्तक, सेट स्केअर वगेरे ठेवले आहे अस ते पेंटिंग आहे. ह्या फोटोमध्ये ते पेटिंग डाव्या बाजूला ठेवले आहे. तिथूनच ३ मांजरे उडी मारून येत आहेत, पाणी पण उडी मारतंय, दालींच्या हातात ब्रश आणि कलर आहेत आणि दालीदेखील उडी घेताहेत, उजव्या बाजूने खुर्ची उडतेय असं एकंदर jumpology चे हे उदाहरण दाखवणारा हा फोटो आहे. हा फोटो दाली ऑटोमायकस म्हणून ओळखला जाऊ लागला.

 

लेखिका: स्नेहल बंडगर

सबस्क्राईब करा

* indicates required