सिक्युरिटी ताफ्यातल्या महागड्या कार्स. अंबानीच्या ताफ्यात यातल्या कोणत्या गाड्या आहेत?

श्रीमंत लोकांचा श्रीमंती दाखवण्याचा सोपा पर्याय असतात त्यांच्या महागड्या गाड्या. आणि मग त्या महागड्या गाड्यांच्या सिक्युरिटीसाठी तेवढ्याच महाग सिक्युरिटी कार्ससुद्धा लागतात. या सिक्युरिटी कार्समुळे मुख्य गाडीचं आणि आतल्या माणसांचं संरक्षण तर होतंच आणि ताफा असल्यानं लोकांवर वजन पण पडते. महिंद्राची स्कॉर्पिओ आणि टाटाची सफारी या गाड्या अशा कामासाठी हमखास वापरल्या जाताना दिसतात. पण अजूनही अशा खूप सिक्युरिटी गाड्या आहेत. या गाड्या स्पोर्ट्स कार इतक्याच महाग असतात. अशाच काही गाड्यांची ओळख आज आपण करून घेणार आहोत.
BMX X6 M हमान टायकून
साडे तीन कोटी किंमत असलेली ही गाडी भारतात खूप कमी पाहायला मिळते. ही कार पूनावाला कुटुंबाकडे आहे. या गाडीचा स्पीड तब्बल २५० किमी प्रतितास आहे. ताशी शून्य ते १०० किमी एवढा स्पीड फक्त ४.२ सेकंदात ही गाडी पकडते. हाय परफॉर्मन्स सिस्टम असलेली ही गाडी अनेकांच्या फेव्हरिट लिस्टमध्ये असते.
मर्सिडीज बेंझ G63 AMG
लॅंबोरघिनी हुराकॅन सारखी गाडी असली की हमखास ही कार सिक्युरिटी कार म्हणून वापरली जाते. ट्राफिकमध्ये या कारची चांगली मदत होते. २ कोटी या गाडीची किंमत आहे. ४.० लिटर V8 इंजिन असलेली ही कार जास्तीतजास्त 577 bhp आणि 850 nm निर्माण करू शकते.
टोयोटा लँड क्रूझर प्राडो
टोयोटा लँड क्रूझर ही SUV प्रकारातली गाडी आहे आणि ती बुलेटप्रूफ असते. कित्येक वर्ष टिकणारी म्हणून या गाडीची ओळख आहे. १ कोटीहून जास्त किंमत असलेल्या या गाडीचा रोड स्पीडसुद्धा भन्नाट आहे. २०१५ साली तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या सिक्युरिटी ताफ्यासाठी या ४ गाड्या मागवल्या होत्या.
BMW 7 सिरीज
१ कोटी किंमत असलेली Bmw 7 सिरीजमधील कार्स या अनेक श्रीमंतांच्या घराबाहेर रोजच्या वापरासाठी लावलेल्या दिसतील. पण या गाड्या मुख्यतः सिक्युरिटी कार्स म्हणून वापरल्या जातात. या ओल्ड जनरेशन 7 सिरीज कार्स या ब्रेन गॅरेजचा भाग आहेत आणि लॅंबोरघिनी हुराकेनचे संरक्षण करण्यासाठी वापरल्या जातात.
BMW X5
Bmw x5 कार्स या जवळपास ८५ लाखांत मिळतात. अंबानी परिवारात अनेक महाग गाड्या असतात. त्यांच्या संरक्षणासाठी सुरुवातीला महिंद्रा स्कॉर्पिओ वापरली जात असे. पण नंतर त्यांनी त्या बदलून BMW X5 त्यांच्या ताफ्यात दाखल केल्या. CISF मधील अधिकारीसुद्धा हीच गाडी वापरत असतात.
लँड रोव्हर डिस्कवरी
अंबानी परिवाराच्या ताफ्यात काही लँड रोव्हर डिस्कव्हरीसुद्धा आहेत. भारतातल्या सर्वात श्रीमंत परिवाराचा रोड प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून या गाड्या वापरल्या जात आहेत. या गाडीची किंमत ६० लाख आहे.
लँड रोव्हर रेंज रोवर स्पोर्ट
अंबानी परिवाराकडेच काही रेंज रोव्हर स्पोर्ट SUV आहेत. या गाड्या अंबानींचा मुले आकाश किंवा अनंत यांच्यासोबत दिसत असतात. त्यांच्या बेंटली बेंटय्या, रोल्स रॉयस कलीनॅन, लॅंबोरघिनी उरूस यासारख्या गाड्यांची सुरक्षा करताना ही गाडी दिसत असते. ही गाडी ९० लाखांत मिळते.