computer

इस्रोने २०१८ साल असं गाजवलं.. वाचा त्यांच्या ८ महान कामागिऱ्यांबद्दल

मंडळी, २०१८ वर्ष हे ‘इस्रो’साठी (ISRO) फार महत्वाचं होतं. इस्रोने या एका वर्षात १२ मिशन्सची योजना आखली होती. भारतात प्रत्येक योजनेचे तीन तेरा होतात, पण इस्रोने फक्त योजना आखल्या नाहीत तर त्या योजना पूर्ण केल्या आहेत.

२०१९ मध्ये इस्रोने मागच्या वर्षीच्या टार्गेटपेक्षा पुढे जाण्याचं ठरवलं आहे. त्यांनी तब्बल ३२ मिशन्सची योजना आखली आहे. यात ‘मिशन चांद्रायान २’ आणि ‘गगनयान’ या मिशन्सचा समावेश असेल.

मंडळी, २०१९ मध्ये या योजना तर पूर्ण होतीलच, पण त्यापूर्वी २०१८ मधील महत्वाच्या मिशन्सबद्दल जाणून घेऊ !!

१. PSLV-C40 मिशन – १२ जानेवारी, २०१८

हे मिशन इस्रोचं शंभरावं सॅटलाईट मिशन होतं. या मिशन मध्ये भारतीय उपग्रहांच्या Cartosat-2 सिरीज  सोबत परदेशातील २८ उपग्रहांचा समावेश होता.

२. GSAT-6A – २९ मार्च, २०१८

हे सॅटलाईट मिशन काहीसं अयशस्वी ठरलं. कारण, उपग्रह अवकाशात सोडल्यानंतर अवघ्या दोन दिवसात त्याच्याशी संपर्क तुटला होता.

३. PSLV-C41 – १२ एप्रिल, २०१८

PSLV-C41 या मिशन अंतर्गत IRNSS-1I हा उपग्रह अवकाशात सोडला होता. IRNSS-1I सिरीज मधला हा ८ वा उपग्रह आहे.

४. PSLV-42 – १६ सप्टेंबर, २०१८

या मिशन अंतर्गत ब्रिटिश कंपन्यांचे २ उपग्रह अवकाशात सोडले होते. हे एक व्यावसायिक मिशन होतं

५. GSAT-29 – १४ नोव्हेंबर, २०१८

या मिशन मध्ये इस्रोने तब्बल ३४२३ किलो वजनाचा उपग्रह अवकाशात सोडला होता. इस्रोने लाँच केलेला हा आजवरचा सर्वात जास्त वजनाचा उपग्रह आहे. या उपग्रहामुळे दूरसंचार आणि ब्रॉडबँड सेवा खेड्यापाड्यात पोहोचण्यासाठी मदत होईल.

६. HysIS – २९ नोव्हेंबर, २०१८

याला PSLV-C43 मिशन पण म्हणतात. या मिशन अंतर्गत इस्रोने ३० परदेशी तर १ भारतीय उपग्रह अवकाशात सोडला.

७. GSAT-11 - ५ डिसेंबर, २०१८

GSAT-11 मिशनची योजना मे २०१८ मध्येच पूर्ण होणार होती पण काही तांत्रिक कारणांमुळे त्याला पुढे ढकलण्यात आलं. हा उपग्रह ‘हाय स्पीड डाटा’साठी अवकाशात सोडण्यात आला आहे.  

८. GSAT-7A – १९ डिसेंबर, २०१८

इस्रोने अवकाशात सोडलेल्या ‘अॅग्री बर्ड’ सॅटलाईट सिरीजमध्ये या उपग्रहाचा समावेश होतो. या सिरीजला ‘अॅग्री बर्ड’ हे नाव का दिलं ? खरं तर त्याचं असं सबळ कारण माहित नाही. एवढंच सांगू शकतो, की हा उपग्रह खास सैनिकांच्या दूरसंचारसाठी बनवण्यात आला आहे. त्यामुळेच कदाचित त्याला ‘अॅग्री बर्ड’ असं विचित्र नाव देण्यात आलं असावं.

तर मंडळी, अशा प्रकारे २०१८ हे वर्ष इस्रोसाठी अफलातून ठरलं. २०१९ मध्ये गगनयान मिशन मधून इस्रो तर्फे पहिल्यांदाच मानवाला अवकाशात पाठवण्यात येणार आहे. या मिशन अंतर्गत २ भारतीय अवकाशात जातील. या आणि येणाऱ्या अशा अनेक मिशन्ससाठी इस्रोला बोभाटा तर्फे शुभेच्छा.