computer

भारतातील पारंपारिक चित्रकलेचे ८ प्रकार...यातला तुमचा आवडता चित्रकला प्रकार कोणता?

भारत हा विविध परंपरा आणि संस्कृतींनी नटलेला देश आहे. खाद्य, लेखन, वेष या सर्व संस्कृतींसोबतच भारतीय चित्रसंस्कृतीही तितकीच प्राचीन आणि दैदिप्यमान आहे.  आपल्या भारतीय परंपरेचा चित्रकलेच्या बाबतीत एक गौरवपूर्ण इतिहास आहे. आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण भारतीय चित्रकला परंपरेतील मैलाचा दगड ठरलेल्या ८ चित्रकला प्रकारांची माहिती घेणार आहोत.

चला तर सुरुवात करूया. 

१. मधुबनी चित्रकला:

विकीवरची माहिती खरी मानायची तर, मधुबनीची पाळंमुळं नेपाळ आणि बिहारच्या उत्तर भागातली. बिहारमध्ये मधुबनी नावाचा जिल्हा आहे , पण हिचं मूळ ते नेपाळच्या मधुबनी-जनकपुर नगरीतलं. जनक राजानं म्हणे सीतेच्या स्वयंवराच्या वेळेस नगर सुशोभित करायला सांगितलं आणि या भित्तीचित्रकलेचा उगम झाला. पूर्वी फक्त लग्नकार्याच्या वेळेस सीमीत असलेली ही कला मुख्यतः ब्राह्मण, कायस्थ व दुसाध (पास्वान) स्त्रियांकडून जोपासली गेली. नंतर मग विसाव्या शतकात भूकंपाच्या वेळेस विल्यम आर्चर नावाच्या एका ब्रिटिश अधिकार्‍याच्या नजरेस पडली. त्याने त्यावर एका भारतीय-नेपाळी मासिकामध्ये एक लेखही लिहिला. काही काळानंतर मग दुष्काळानंतर अर्थार्जनासाठी म्हणून या कलेला भिंतींवरून कागदांवर आणण्यात आलं.

 या चित्रकलेला मिथिला चित्रकला असेही म्हणतात. ह्या चित्रकलेचा उगम कसा झाला याची एक कथा सांगितली जाते. मधुबनी शैलीत रामायण आणि राधा कृष्णाची चित्रे, मासे, सूर्य चंद्र यांची वैशिष्ट्यपूर्ण चित्रे काढली जातात. घराच्या सारवलेल्या भिंती, देव्हारे यांच्यावर ह्या प्रकारची चित्रं काढली जात. ही चित्रे काढण्यासाठी काड्या, पेनचे निब आणि काहीवेळा तर नुसत्याच हातांचा वापर केला जातो. तांदळाचे पाण्यात कालवलेले पीठ, आणि नैसर्गिक रंग यांच्यापासून ही चित्रे काढली जात असत.

मधुबनी चित्रे मुख्यत: रेषांचा उपयोग करून रंगवली जातात. चित्र हे पूर्णपणे भरलेले असते. मुख्य चित्र वगळता रिकामा भाग हा पाने आणि फुले यांनी भरला जातो.चित्रांच्या कडांची खास भौमितिक सजावट मधुबनी चित्रांचे वेगळेपण दाखवते. मधुबनी चित्रकलेचे पाच वेगवेगळे प्रकार आहेत. भरणी, काचनी, तांत्रिक, गोडन आणि कोहबार.

या चित्रकलेच्या जपणुकीसाठी मिथिला भागात वेगवेगळ्या संस्था कार्यरत आहेत. दरभंगा येथे कलाकृती, मधुबनी येथे वैदेही, ग्रामविकास परिषद या वेगवेगळ्या संस्था या पुरातन कलेला नवीन काळात जपून ठेवत आहेत. काळाच्या ओघात मधुबनी चित्रे आता ॲक्रिलिक रंगातही रंगवली जातात. ती पेपर, कॅनव्हास आणि कपड्यांवर रंगवता येतात. 

२. राजपूत चित्रकला

ही चित्रकला सतराव्या आणि अठराव्या शतकात उदयास आली आणि उत्तर भारतातल्या राजपुताना घराण्यामुळे ती बहरली. या चित्रकलेस राजस्थान चित्रकला असेही म्हणतात.

राजपूत चित्रकलेत विविधता आढळून येते. राजघराण्यातील लोकांचे शिकारीची चित्रे, तसेच हिंदू पुराणांमधील चित्रे राजपूत चित्रकलेत रेखाटली गेली आहेत. राजपूत चित्रकलेचे खास वैशिष्ट्य म्हणजे चित्रकलेत वापरले जाणारे रंग हे दुर्मिळ आणि बनवण्यास अवघड असतात. हे रंग वनस्पती, शंख आणि शिंपले तसेच विविध रंगांच्या खड्यांपासून बनवले जातात. सोने आणि चांदी या दोन्ही धातूंचा चित्रे काढताना वापर केला जातो.

चित्रे काढताना जागेचा पुरेपूर वापर करून घेतला जातो. व्यक्ती आणि आजूबाजूचा परिसर हा तितकाच प्रभावी असतो. मेवाडच्या राजकारणाचा आणि राज्यकर्त्यांचा प्रभाव या चित्रावर आढळून येतो. त्या त्या काळातील समाजकारणाचा प्रभाव राजपूत चित्रकलेत आढळून येतो. मेवाड येथे ही चित्रकला शिकवणाऱ्या अनेक शाळा आहेत.

३. गोंड चित्रकला:

मध्यप्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगण या राज्यांमध्ये गोंड भाषा बोलणारी जमात दिसून येते. या जमातीत उगम पावलेल्या चित्रकलेला गोंड चित्रकला असे म्हणतात. 

चित्रे काढण्यासाठी माती, कोळसा आणि पानांचा वापर केला जातो. चित्रे काढण्यासाठी लागणारे रंग गडद आणि उठावदार असतात. निसर्गात असणाऱ्या सर्व गोष्टींची चित्रे गोंड चित्रकलेत काढली जातात. निसर्गातील सर्व घडामोडींचे बारीक चित्रण हे या चित्रकलेचे वैशिष्ट्य आहे. प्राणी, पक्षी, झाडे आणि त्यांवरच्या रेषा ही गोंड चित्रकलेची खासियत मानली जाते.

ही प्राचीन चित्रकला जगभरात पसरावी म्हणून गोंड जमातीतील अनेक तरुण प्रयत्न करत आहेत.

४. वारली चित्रकला

वारली ही बहुतकरून महाराष्ट्रात राहणारी आदिवासी जमात आहे. सह्याद्रीच्या रांगा, डहाणू, पालघर, मोखाडा, जवाहर येथे वारली लोक राहताना दिसतात. ही अतिशय सुंदर दहाव्या शतकाच्या आधीपासून अस्तित्वात आहे. वारली लोकांची मातीशी घट्ट नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे त्यांच्या जी चित्रात त्यांचे दैनंदिन व्यवहार, नित्याची कामे तसेच शेतीची कामे, उत्सव यांचे चित्रण केले जाते. ही चित्रे शक्यतो तांदळाच्या ओल्या पीठाने विटकरी रंगांच्या भिंतीवर आणि अंगणात केले जाते. वारली समाजाच्या बायका शक्यतो ही चित्रे काढतात.

या चित्रांचे खास वैशिष्ट्य असे की ही चित्रे गोल, त्रिकोण आणि तिरप्या रेषा यांच्या साहाय्याने काढली जातात. ही चित्रे फक्त या तीनच भौमितिक आकृत्या वापरून काढल्या तरी त्यांच्यात विविधताअसते आणि ही चित्रे अतिशय सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण दिसतात. एकमेकांत हात गुंफलेल्या स्त्रियांचे चित्र तसेच शेतीची वेगवेगळी कामे आणि गुरे वगैरे यांचे सुंदर रेखाटन या चित्रांमध्ये दिसून येते.

तार्पा नाच हा तेथील नृत्यप्रकार आहे. या प्रसंगी बायका नाचताना त्यांची चित्रे काढली गेली आहेत. ही चित्रे अतिशय सुंदर दिसतात.

वारली चित्रे आता व्यवसायाचे रुप घेत आहेत तसेच वारली चित्रे शिकण्यासाठी मुंबई आणि ठाणे भागात बरेच क्लासेस उपलब्ध आहेत. आदिवासी युवा सेना संघाने वारली जमातीला वारली चित्रकलेचे कायदेशीर हक्क इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ॲक्टद्वारे मिळवून दिले आहेत.

५. तंजावर चित्रकला/तंजौर चित्रकला:

इसवी सन सोळाशेच्या सुमारास विजयनगरच्या रायानी तंजावर चित्रकलेच्या प्रकाराला प्रोत्साहन दिले. ही चित्रकला मराठा राजवट असताना बहरास आली. हिंदू मंदिरांतील चित्रे ही या काळात काढण्यात आली. सोन्याचा मुलामा ही या चित्रांची खासियत म्हणायला हरकत नाही. या चित्रांचे वैशिष्ट्य असे की एक किंवा दोन देवता यांचे चित्र असते आणि त्याभोवती चमकदार सोनेरी रंगाची नक्षी पसरलेली असते. देवदेवतांचे कपडे पण सोनेरी असतात. काचेचे मणी, मोती आणि रत्नांचा वापर करून ही चित्रे काढली गेलेली असतात. पुराणकाळातील आणि हिंदू ग्रंथांतील विविध देव देवतांची चित्रे ही या चित्रकलेची वैशिष्ट्ये आहेत. यानंतर जैन, शीख आणि मुसलमान या धर्मातील चित्रे या शैलीत पाहायला मिळू लागली.

ही चित्रे शक्यतो लाकडी पृष्ठभागावर काढली जातात, त्यांना स्थानिक भाषेत पलगाई पदम म्हणतात.या चित्रांमध्ये गडद रंग वापरले जातात, तसेच ही चित्रे देवघरात वगैरे लावली जातात. लाल, हिरवे आणि निळे रंग तसेच सोने वापरले गेल्याने ही चित्रे उठावदार दिसतात. काहीवेळा ही चित्रे कॅनव्हास, भिंतीवरही आणि काचेवरही काढली जातात. काचेवर चित्रे काढून त्याच्या मागून चंदेरी कागद लावला जातो.

कॅनव्हासवर गोपीचंदन लावून किंवा चुन्याची पावडर लावून त्यावर चित्रे काढण्याच्या तंजावर चित्रकलेला गेसो काम असे म्हणतात. नंतर ती चित्रे मौल्यवान खड्यांनी आणि सोने चांदीच्या वर्खाने सजवली जात. 

राज्य सरकारने आता वेगवेगळ्या संस्था सुरु केल्या आहेत, तसेच बऱ्याच खाजगी संस्था ही चित्रकला शिकवतात. नैसर्गिक रंगांची जागा आता कृत्रिम रंगांनी घेतली आहे.पण तंजावर चित्रकलेची वैशिष्ट्ये जपण्यात आली आहेत.

६. कलमकारी चित्रकला:

कलमकारी चित्रकला ही भारतात आंध्र प्रदेशात आणि तेलंगण येथे उदयास आली. या चित्रकलेचे दोन प्रकार आहेत. एक श्रीकलाहस्ती शैली आणि दुसरी मछलीपट्टन शैली.

श्रीकलाहस्ती शैली ही एक अवघड प्रकारची चित्र शैली आहे. या शैलीत नेहमी पेनाचाच उपयोग केला जातो. हे काम मुक्तहस्त शैलीने केले जाते. मंदिरांच्या गर्भगृहात आणि आतल्या इतर बाजूस या शैलीचे नमुने दिसून येतात.

कलमकारी चित्रकला ही मूलतः पट्टचित्र या नावाने ओळखली जात होती. हिंदू पुराणकथा सांगणारे लोक गावोगावी फिरत असत. लोकांना चित्रांच्या आधारे पुराणकथा सांगताना ह्या चित्रकलेचा उगम आणि प्रसार झाला.

गोवळकोंड्याच्या राजवटीत कलामकरी चित्रकला बहारास आली. नंतर ह्या कलेला मुघलांचा वारसा मिळाल्याने कलमाकरी चित्रकलेत पर्शियन ठसा उमटला. आता कलमकरी चित्रकला ही बहुत करून सिल्क, कॉटन आणि मलमलच्या साड्यांवर पाहायला मिळते. कलमकारी चित्रकलेसाठी फक्त नैसर्गिक रंग वापरले जातात. वनस्पतींची मुळे, पाने, फुले आणि धातूंचे क्षार वापरले जातात. शेण आणि वनस्पतींच्या बिया यांचाही वापर होतो.

७. कालीघाट चित्रकला.

कलकत्यात असणाऱ्या कालिघाट या बाजारावरून या चित्रकलेचे नाव कालीघाट चित्रकला असे पडले आहे. एकोणिसाव्या शतकात बंगालमधल्या खेड्यांमधून अनेक चित्रकार कालीघाट परिसरात देवीच्या मूर्ती बनवण्यासाठी आले आणि त्यांनी ही कला विकसित केली. कागदावर गडद रंगांनी वेगवेगळे चित्र बनवले गेले. या चित्रांचा मागचा भाग हा गडद असतो आणि काली लक्ष्मी, कृष्ण, गणेश, शिव अशा अनेक देवतांची चित्रे काढली जातात. या चित्रकलेत बंगालच्या सामाजिक विषयांबद्दल चित्रण केले जाते. 

कालीघाट चित्रकला ओडिसामध्येही दिसून येते. दिव्याची काजळी आणि वनस्पती तसेच वेगवेगळ्या रंगांच्या खड्यांपासून ही चित्रे रंगवली जातात. मुख्यतः कपड्यांवर रेखाटली जातात.

८. मुघल चित्रकला

मुघल चित्रकला ही भारतात सोळाव्या ते अठराव्या शतकात उदयास आली. फारसी आणि भारतीय चित्रकलेचा संगम म्हणजे मुघल चित्रकला. या चित्रकलेत मुख्य म्हणजे मुघल सम्राट, त्यांचा राजदरबार आणि मानमरातब यांची चित्रे रेखाटली जात. तसेच, शिकारीला निघालेले राजे, प्राणी, पक्षी यांची चित्रेही काढली जात.
राजा जहांगीरच्या काळात झेब्रा आणि शहामृग यांची चित्रे काढली गेली आहेत. ही चित्रे बहुत करून कागदावर काढली गेली आहेत. त्याशिवाय काही चित्रे भिंती आणि हस्तिदंतावर काढली गेली आहेत. सोनेरी आणि हलक्या गडद रंगांचा वापर जास्त करून केला आहे. चांदी आणि सोने या धातूंचा वापरही रंग देण्यासाठी केला गेला आहे.

तर, हे होते ८ भारतीय चित्रकला प्रकार. या चित्रकला प्रकारांकडे बघून भारतीय कलेच्या समृद्धीचा सार्थ अभिमान वाटल्याखेरीज राहत नाही.

 

लेखिका: क्षमा कुलकर्णी 

सबस्क्राईब करा

* indicates required