'अक्षर नंदन'च्या प्रभातफेरी आणि सायकल रॅलीला जाणार ना?

'वाहतूक आणि पर्यावरण' हे आधुनिक भारतीय जीवनातील दोन असे महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यांना टाळून कोणाही नागरी व्यक्तीला पुढे जाणे शक्य नाही. वेगवेगळ्या नागरी स्वयंसेवी संस्थांपासून ते सरकारपर्यंत या मुद्द्यांभोवती अनेक जण अनेक प्रकारचे काम करत असतात. मात्र या मुद्द्यांना रोज भिडूनही समाजात यांप्रती म्हणावी तशी जागृकता आणि पर्याय उभे रहाताना दिसत नाहीत. 

'अक्षर नंदन' ही पुण्यातील एक नामांकित शाळा. या शाळेचे यंदा रौप्य-महोत्सवी वर्ष आहे. गेली २५ वर्षे सामाजिक बांधिलकी जपणारे अनेक कार्यक्रम देणार्‍या या शाळेने २५व्या वर्षानिमित्त अनेक कार्यक्रमांची मालिका यंदा पेश केली आहे. त्याच मालिकेतील पुढिल कार्यक्रम असणार आहे 'अक्षरनंदन ते अक्षरनंदन' अशी प्रभातफेरी आणि सायकल रॅली. उद्या २५ फेब्रुवारी २०१७रोजी सकाळी ८:०० वाजता दोन्ही कार्यक्रम सुरू होतील. 

प्रभात फेरी अक्षरनंदन शाळा --> सेनापती बापट मार्गे विठ्ठल चौक --> पत्रकार नगर --> विखे पाटील मेमोरीयल शाळा --> कामगार कल्याण मंडळ --> कुसळकर पुतळा चौक --> अक्षरनंदन शाळा अशी तीन किलोमीटरची असेल.  (या मार्गाचा गुगल मॅप इथे)

सायकल रॅली अक्षरनंदन शाळा --> सेनापती बापट मार्ग --> महर्षी दधिची ऋषी चौक --> खांडेकर चौक --> हॉटेल रुपाली --> फर्ग्युसन रोड मार्गे हॉटेल अ‍ॅम्बेसेडर हॉटेल --> बीएम थोरात चौक -->  दीप बंगला चौक --> गोखले क्रॉस रोड --> अक्षरनंदन शाळा अशी २२ कि.मी. ची असेल. (या मार्गाचा गुगल मॅप इथे)

पुण्यातल्या या आगळ्या शाळेचे विद्यार्थी, पालक व शिक्षक मिळून हा कार्यक्रम आयोजित करत आहेत. त्यांनी सगळ्यांना सहभागी व्हायचं आवाहनही केलंय. सहभाग शक्य असो नसो, किमान त्यांना प्रोत्साहन द्यायला या मार्गांवर यावेळेत उपस्थित रहाल ना? 


शाळेचे आवाहन:

'वाहतूक ते पर्यावरण' हे सर्व मुद्दे उपस्थित करत 'अक्षर नंदनची' मुलं, शिक्षक व पालक उद्या  (२५ फेब्रुवारी २०१७रोजी) 8 ते 10:30 ह्या वेळात, अक्षर नंदन ते अक्षर नंदन, प्रभातफेरी व सायकल रॅली काढत आहेत.
आपण सर्वच सतत ह्या मुद्यांना काही नं काही प्रकारे तोंड देत असतो आणि त्यासाठी आपापल्या परीने पर्यायी जीवनशालीही निवडत असतो.
आपल्यासारखे सर्व समविचारी लोक एकत्र आले तर पर्यायांची ताकद वाढेल आणि सकारात्मक भविष्याची वाटचाल सोपी होईल.
उद्याच्या प्रभातफेरीत जास्तीत जास्त संख्येने आपण सहभागी होवूया आणि पर्यायी विचार आपल्या आचरणातून पसरवूया.

-'अक्षर नंदन'ची मुलं, शिक्षक, पालक.


या शाळेबद्दल माहिती नसेल तर त्यांच्या या वेबसाईटला एकदा भेट द्याच!

स्रोतः व्हॉट्स अ‍ॅप वरील मेसेज

सबस्क्राईब करा

* indicates required