computer

कान ओढणे, किक मारणे ते उंच उडी...अलास्काच्या ऑलिम्पिक स्पर्धांमधले अफलातून खेळ पाहून घ्या!!

ऑलिम्पिक स्पर्धा म्हणजे सर्व खेळाडूंसाठी एक मोठे आव्हान असते. तसेच प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी. अनेक खेळ एकाच ठिकाणी पाहायचा आनंद सर्वजण घेऊ शकतात. जपानमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झालेली. जगभरातून खेळाडू यात सहभागी होत आहेत. आणखी एक याच प्रकारची ऑलिम्पिक स्पर्धा खेळवली जाते. या स्पर्धेला वर्ल्ड एस्किमो इंडियन ऑलिंपिक (WEIO) असे म्हणतात. अलास्कामध्ये ही WEIO स्पर्धा १९६१ पासून सुरू आहे. यात जे खेळ खेळवले जातात ते खूप वेगळे असतात. हे तिथले पारंपरिक खेळ आहेत. आज माहिती करूयात या आगळ्यावेगळ्या स्पर्धेविषयी !

या स्पर्धेचा इतिहास पाहिला तर अलास्कामध्ये उन्हाळ्यात फेअरबँक्स शहरात  फेयरबॅक्स चेंबर ऑफ कॉमर्स आणि वियेन एअर अलास्काच्या पाठिंब्याने पहिल्या WEIO आयोजन केले गेले होते. ए.इ. “बड” हॅगबर्ग आणि फ्रँक व्हेली या दोन एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेची सुरुवात केली होती. या विमान कंपन्यांनी विविध खेळांत भाग घेण्यासाठी त्यांच्या खेड्यातून खेळाडूंना शहरात जाण्यासाठी विमानाची तिकिटेही दिली होती. पहिल्या स्पर्धेत चार एस्किमो नृत्य गट, दोन इंडियन नृत्य गट (इंडियन म्हणजे भारतीय नव्हे. हा तिथला स्थानिक नृत्य प्रकार आहे), हाय किक, ब्लँकेट टॉस आणि सील स्किनिंग मधील स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेचे विशेष म्हणजे यात पारंपारिक खेळच खेळवले जातात. जसे कान खेचणे, नॅकल हॉप, उंच किक मारणे (अलास्कन हाय किक), एस्किमो स्टिक पुल, आर्म पुल, ग्रीस पोल टेक याच्या स्पर्धा होतात. संगीत व नृत्य हे ढोलकी वाजवून केले जाते. सांस्कृतिक संगीत, नृत्य हा सुद्धा स्पर्धेचा एक अविभाज्य भाग आहे.

या स्पर्धांमध्ये खेळवले जाणारे खेळ कसे वेगळे आहेत बघा. नॅकल हॉप स्पर्धा सहनशक्तीची परीक्षा घेते. पुशअप स्थितीत म्हणजे फक्त हात पायांची बोटांची पेरं जमिनीवर टेकवून पुढे उड्या मारत जायचे. यात खेळाडूच्या सामर्थ्याचे कौशल्य दिसते. तो कितीवेळ भार सहन करू शकतो हे पहिले जाते. 

स्टिक पुल म्हणजे दोन प्रतिस्पर्धी एक काठी आपल्या दोन्ही हातांनी धरतात. एकमेकांसमोर बसून हा खेळ खेळला जातो. वेळ सुरू झाली की काठी स्वतःकडे ओढायची. ज्याच्याकडे काठी येते त्याला पॉईंट मिळतात. काठी धरलेला एक हात सुटला तरी समोरच्याला गुण मिळतात.

या स्पर्धेत एक विचित्र खेळही आहे, त्याचे नाव आहे कान खेचणे. हा खेळ वेदना सहन करण्याची ताकद तपासून पाहतो. एका कानाला एक दोर लावून दुसऱ्या प्रतिस्पर्ध्याच्या कानात अडकवून ते ओढणे. या खेळात तो दोर निघेपर्यंत जोर देऊन ओढले जाते. याने कानाला इजाही होते, पण हा खेळ खूप लोकप्रिय आहे.

अजून एक खेळ खूप लोकप्रिय आहे, त्याचे नाव हाय किक म्हणजे उंच किक मारणे. यात एक फूट व दोन फूट उंचीवर बॉल बांधले जातात. या बॉलला किक मारायची, पण ती मारण्याची पद्धत खूप वेगळी आहे. उजव्या हाताने डावा पाय पकडायचा व खाली डाव्या हाताच्या आधाराने बसायचे. पूर्णपणे खाली बसायचे नाही कारण उजव्या पायाने वर अडकवलेल्या बॉल ला किक मारायची असते. यामध्ये लिफ्टिंग, किकिंग आणि लँडिंग हे खूप महत्त्वाचे ठरतात. लँडिंग करताना पडायचे नाही. हळूहळू बॉल उंचावर २ फुटापर्यंत नेला जातो. हा खेळ खूप कौशल्याचा आहे. आर्म पुल मध्ये दोन प्रतिस्पर्ध्यानी कोपरवर हात वळवत एकमेकांना वरच्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न करायचा. याखेरीज ग्रीस पोल टेक हा पूर्णपणे संतुलनाचा खेळ आहे.

या स्पर्धेमध्ये असे अनेक खेळ खेळवले जातात. पिढ्यानपिढ्या हे खेळ खेळवले जात आहेत. वयाच्या १२व्या वर्षापासून याची तयारी सुरु होते. ही स्पर्धा पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक गर्दी करतात. २४, २५ खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतात. त्यांना गोल्ड, सिल्व्हर, ब्रॉंझ मेडल्सही दिले जातात. अनेक खेळाडू अनवाणी खेळतात. इथे तरुण खेळाडू आहेतच पण काही वृद्धही सहभागी होतात. कधीकधी तर मुलं, पालक, आजी आजोबा यांच्यात स्पर्धा रंगते. तिथले लोक या ऑलिम्पिक स्पर्धेच्या वेळी खूप आनंदात असतात, कारण स्पर्धा तर बघायला मिळतेच पण अनेक नातेवाईकांनाही भेटायला मिळते. त्यामुळे त्यांना हे एक मोठ्या कौटुंबिक सोहळ्यासारखे वाटते. 

ही स्पर्धा गेले दोन वर्षे कोरोनामुळे रद्द झाली. पण ही परत सुरू व्हायची वाट अलास्कातील सर्वजण पाहत आहेत. त्यांच्यासाठी ही फक्त स्पर्धा नसून एक परंपरा आहे. हा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला पोहोचवणे खूप आवश्यक आहे.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required