computer

'कोल्ड शोल्डर'ची फॅशन काय आहे? तिची सुरुवात कुठून झाली?

२०१६ ची गोष्ट आहे. एक फॅशन अचानक व्हायरल झाली. या फॅशनमध्ये जो वेगळेपणा होता तो इतका सहज साधा होता की 'फॅशन' हा शब्द उच्चारल्यावर एकदम दचकणार्‍या सनातनी पालकांनाही तो पसंत पडला. आता फार कोड्यात न घालता सांगतो-तो ट्रेंड म्हणजे 'कोल्ड शोल्डर'! नेहमी वापरात असलेल्या टॉपच्या खांद्यावरचा छोटासा भाग कटाप केला की तयार झाला 'कोल्ड शोल्डर टॉप',! याबद्दल अधिक वाचूच पण त्या आधी फॅशनबद्दल थोडेसे वाचा!

फॅशन आली आणि गेली असे कधीच होत नाही. फॅशन नजरेआड जातात आणि पुन्हा येतात. आता बघा फुग्याच्या बाह्यांचे ब्लाउज हा ट्रेंड ७०/८० च्या दशकात जोरात चालत होता, पण प्रत्यक्षात फुग्याच्या बाह्या ही ५०/६० च्या दशकातली फॅशन होती. विश्वास बसत नसेल तर घरातले जुने फोटो काढून बघा. तुम्हांला आम्ही काय म्हणतो आहे त्याचा लगेच प्रत्यय येईल.

तर मंडळी, ही कोल्ड शोल्डरची फॅशनपण नवी नाही, तर जुनीच फॅशन नव्याने आली आहे. १९५३ च्या दरम्यान ब्रिजेट बार्डोट नावाच्या नटीने हा ट्रेंड आणला. पण यामध्ये दोन्ही खांदे पूर्ण उघडे होते. बरीच वर्षे असे उघड्या खांद्याचे टॉप ' बार्डोट टॉप' या नावाने ओळखले जायचे. त्याचे तांत्रिक नाव 'off-the-shoulder tops' असे होते. या १००% उघड्या खांद्याच्या फॅशनमध्ये १९९० च्या दशकात काही परिवर्तन आले. पार्टी गाऊन किंवा इव्हिनिंग ड्रेसेसमध्ये ही फॅशन वापरात आली. मध्यंतरी हा ट्रेंड दिसेनासा झाला आणि २०१६ नंतर पुन्हा नव्या रुपात परत आला.

(ब्रिजेट बार्डोट)

फॅशनच्या दुनियेत अमुक एखादा ट्रेंड का परत आला याचे उत्तर कधीच मिळत नाही. पण यावेळी जेव्हा आला तेव्हा जोरातच पुढे आला. उपयुक्ततेच्या नजरेतून पाहिले तर त्याला काही अर्थ नसतो. स्त्रीच्या देहाच्या इतर सौंदर्यस्थळासारखा खांदा हे एक सौंदर्यस्थळ आहे. उघड्या खांद्यातले 'सेक्सी' अपील लोकांच्या मनाला भावले इतकेच कारण आपण शोधू शकतो.

आता ही फॅशन आली आणि सोबत एक नवा प्रश्न उभा राहिला तो असा की जर खांदे उघडे असतील तर ब्रा कोणती वापरायची? हा प्रश्न साहजिकच होता कारण खांदे मिरवताना ब्राच्या पट्ट्या अडथळा ठरला असता. म्हणून सोबत बेगवेगळी ब्रा डिझाइन्स तयार करण्यात आली. (आजचा मूळ विषय कोल्ड शोल्डर पुरता मर्यादीत ठेवण्यासाठी इतकी माहिती पुरेशी आहे.)

आता विषय असा आहे की या ड्रेससोबत दागिने कोणते वापरावे? फॅशनच्या दुनियेत दागिने हे सोन्याचांदीचेच असावे असा आग्रह नसतो. पण ते मूळ फॅशनचे महत्व कमी करणारे नसावेत असा अलिखित नियम आहे. तर कोल्ड शोल्डरसोबत गळ्याशी घट्ट असे 'चोकर' स्टाइलचे नेकलेस वापरले जातात. दुसरा पर्याय खूप लांब असे नेकलेस वापरले जातात. सोबत कानातले दागिने लांब असावेत आणि अपारंपारीक असावेत असे गृहित धरले जाते.

आता हे फोटो पाहून झाले असतील तर आपण आपल्या व्यावहारीक दुनियेत परत येऊया. हे सगळे नखरे करायला वेळ तर मिळायला हवा ना? म्हणून सर्वसाधारण सर्वच टॉप्सना एक शोल्डर कट मारून फॅशन साजरी केली जाते.

फॅशनचे ट्रेंड येतात आणि जातात. कोल्ड शोल्डर आज आहे, उद्या नसेल, पण परवा पुन्हा येऊ शकेल. याचे कारण असे की स्त्री देहाचे खांदे हे एक सौंदर्याचे लक्षण आहे. त्याचे आकर्षण किती जुने आहे हे सांगण्यासाठी एका गाण्याची गोष्ट तुम्हाला सांगतो. हे त्या काळातले गाणे आहे जेव्हा भावगीत हा प्रकार नव्यानेच आला होता. भावगीत घरातल्या वडीलधार्‍यांसमोर गुणगुणणे हे अत्यंत असभ्य लक्षण समजले जायचे. तर अशा या काळात कवि ना.घ. देशपांडे यांनी लिहिलेले आणि जी. एन जोशी यांचे हे गाणे!!

फार नको वाकू जरी उंच बांधा,
फार नको झाकू तुझा गौर खांदा,
चित्त म‍ऊ माझं जशी रानकळी,
धुंद तुझी आहे नदी पावसाळी,
फार नको वाकू जरी उंच बांधा,
फार नको झाकू तुझा गौर खांदा!!

तर आज कोल्ड शोल्डरच्या निमित्ताने आपण फॅशनच्या दुनियेत पाऊल टाकलं आहे. तुम्हाला या विषयावर आणखी वाचायला आवडेल का हे आम्हाला जरूर सांगा!

सबस्क्राईब करा

* indicates required