मधोमध झाड आणि काचेच्या भिंतीपासून तयार केलेलं हे ट्रि हाऊस प्रत्येकाच्या स्वप्नातील घर आहे !!

जंगलाच्या बरोबर मधोमध एक स्वतःच घर असावं. सकाळी डोळे उघडले की नजर पोहोचेल तिथपर्यंत फक्त हिरवीगार झाडंच असावीत. पक्ष्यांचा मधुर आवाज दिवसाच्या सुरुवातीला ऐकलेला पहिला आवाज असावा. आपल्या ह्या दगदगीच्या आयुष्यातून एक दिवस असा काढायला कोणाला नाही आवडणार? कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात आपलंही एखाद फार्म हाऊस असावं असं नक्कीच वाटत असणार.
तर झालंय काय माहितेय का? एका ३८ वर्षीय यशस्वी व्यवसायिक आहेत. रोजच्या धावपळीच्या वेळापत्रकामुळे त्यांना स्वतःच्या आध्यात्मिक विकासासाठी वेळ देता येत नव्हता. पैसा आहे पण मानसिक सुख,शांती नाही. तेव्हा त्यांनी ट्री हाऊस बनवायचे ठरवले.
आशिया खंडाच्या मधोमध आणि अफगाणिस्तानच्या उत्तरेला असलेल्या कझाकस्तान देशातील अल्माटी भागात हे ट्रि हाऊस आहे. अल्माटी हे कझाकस्तानमधील सर्वात मोठे महानगर आहे. हे महानगर ट्रान्स-इली अलाटाऊ पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे. त्यात जमेची बाजू म्हणजे आजूबाजूला निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केली आहे. मुख्य शहरापासून जवळच जंगलाचा भाग असल्याने इथे घर बनवणं हे फायद्याचे आहे म्हणा. मग ह्या गृहस्थांनी जंगलात ट्री हाऊस बांधले.
तर नक्की ट्री हाऊस हा काय प्रकार आहे?
दोन माणसांसाठी बांधलेल्या ह्या घरात चार मजले आहेत. खालून वरपर्यंत काचेच्याच भिंती आहेत. एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पांढरा गोलाकार जिना आहे. ह्या घराच्या बांधकामात मेटल कॉमस, प्लास्टरबोर्ड पॅनेल्स, काँक्रीट ह्यांचाही वापर केलेला आहे. घराच्या जमिनी ह्या लाकडी आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे घराच्या बरोबर मध्ये एक जीवंत झाड आहे. आणि म्हणूनच ह्या घराला "ट्री हाऊस" असं म्हटलं गेलंय.
खाली दिलेल्या चित्रात हे सर्व मुद्दे कळून येतील.
आता तुम्ही म्हणाल की इतकं सुंदर आणि जगावेगळं घर बांधायला खर्च पण भरपूर आला असणार. तर अजिबात नाही. अल्माटी मध्ये साधारण घरांची किमंत ६,२५,००० डॉलर्स इतकी आहे. आणि ट्री हाऊस बनवण्यासाठी आलेला एकूण खर्च आहे फक्त २,२५,००० डॉलर्स.
तर, आजकालच्या धावपळीच्या जगात प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या तणावाखाली आहे. प्रत्येकाकडे जरी ट्री हाऊस नसला तरी निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवणं ह्यासारख दुसरं सुख आणि औषध कोणतंही नाहीये.
लेखिका: स्नेहल बंडगर