विचार करून मेंदू थकेल, पण दृष्टिभ्रम का होतोय हे कळणार नाही!!

सोशल मिडीयावर नजरेला चकवा देणारी चित्रे, व्हिडीओ अनेकदा व्हायरल होत असतात. सुरुवातीला चित्रात काही वेगळेच दिसते आणि लक्ष देऊन पाहिल्यास काही वेगळेच दिसते. आपल्याच नजरेने आपल्याला दिलेला हा धोखा खायला अनेकांना आवडतो. नेमक ‘हे’ की ‘ते’ हा दृष्टीभ्रम कदाचित आपल्या मेंदूला वेगळी चालना देत असेल. 

आता ट्विटरवर व्हायरल झालेला हा व्हिडीओच पहा ना. यात एक समलंब चौकोन दाखवला आहे. म्हणजे ज्याच्या कोणत्याही दोन संमुख बाजू समांतर नसतात असा चौकोन. तर हा समलंब चौकोन ३६०॰ अंशात फिरवल्यावर चौकोना सारखा दिसायला लागतो. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या ट्विटर युझरने व्हिडीओ पोस्ट करताना म्हटले आहे की, 'हे दृष्टीभ्रम पाहून माझा मेंदू  फुटला'. कोणी बनवलाय हा व्हिडीओ आणि इतकं मेंदू दुखवण्यासारखं काय आहे ह्या व्हिडीओ मध्ये चला पाहूया. 

ऑस्ट्रेलियाच्या डीन हटन नावाच्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ बनवला आहे. यात तो ‘द एम्स विंडो’ ही क्रिया समजावून देत आहे. व्हिडीओ तसा जुना आहे, पण एकदा का नेटीझन्सच्या हाती लागल्यावर मग काय? विचारू नका. डीन हटन हा एक ऑस्ट्रेलियन कलाकार आहे. तो असेच चकवे देणारे वेगवेगळे प्रयोग करून दाखवतो. 

डीन हटनने या व्हिडीओमध्ये समलंब चौकोनाच्या आकाराचा एक पुठ्ठा घेतला आणि त्यावर खिडकी सारख्या दिसणाऱ्या छोट्या छोट्या चौकटी आखल्या आहेत. या पुठ्ठ्याला मध्यभागी एक तार बांधून त्याला गोलाकार फिरवले आहे. पुठ्ठा गोलाकार फिरताच याची रुंद बाजू मोठी मोठी होत अगदी आपल्या समोर उभी आहे असे वाटते. आश्चर्य म्हणजे पहिल्यांदा समलंब आकाराचा दिसणारा हा पुठ्ठा नंतर चक्क चौकोनी आकाराचा दिसू लागतो. इथेच या व्हिडीओची खरी मेख आहे, पुठ्ठ्याचा आकार बदलताच आपल्याला आश्चर्य वाटायला लागतं आणि नेमकं आपण पाहिलं काय आणि आता पाहतोय काय हा प्रश्न आपल्यालाच छळायला लागतो. 

व्हिडीओ इथेच थांबत नाही तर, पुढे या चौकोनाचा मध्यभागी डीन चिकटपट्टीने एक बॉल पेन चिकटवतो आणि पुन्हा एकदा त्या पुठ्ठ्याला हवेत गोलाकार गतीत फिरवतो. आता आपल्या समोर तयार होणारा दृष्टीभ्रम आपल्याला आणखीनच गोंधळात टाकतो. कारण, पुठ्ठा गोलाकार फिरत राहतो आणि आपल्याला वाटते की चौकोनी खिडकी गोलाकार फिरत आहे आणि त्यातील मध्यावर अडकवलेला पेन उलट्या दिशेने खिडकीला छेदत आहे पण खिडकी पुन्हा पूर्ववत होते. जणू काही पेन जादूमयरित्या खिडकीतून आरपार जातो. तुम्हीही जेव्हा हा व्हिडीओ पहाल तेव्हा तुमचाही मेंदू असाच बंद पडेल. 

तर हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या मेंदूचे नेमके काय झाले ते आम्हाला सांगायला विसरू नका. 

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required