अमृतांजनच्या एका बाटलीत दडलाय भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास !!

पूर्वी कोलगेट खूपच प्रसिद्ध होतं. म्हणून सगळ्याच टूथपेस्टला कोलगेट म्हणण्याची सवय लागली होती. अशीच गत मॅगी, कोका कोला, पॅराशूट, टाटा मीठ आणि इतर काही प्रसिद्ध ब्रॅन्ड्सची देखील होती. यात आणखी एक नाव आवर्जून घ्यावसं वाटतं, ते म्हणजे ‘अमृतांजन’. डोकेदुखीवर रामबाण औषध म्हणून अमृतांजन घरोघरी असायचं.

राव, तुम्हाला आश्चर्य वाटेल की या अमृतांजनचा आणि आपल्या स्वातंत्र्य चळवळीचा खूपच जवळचा संबंध आहे. १८९३ साली जन्मलेल्या अमृतांजनने अनेक पावसाळे पाहिलेत राव!!

चला तर आज जाणून घेऊया अमृतांजनची  गोष्ट.


अमृतांजनचे निर्माते


स्रोत

आंध्रप्रदेशमध्ये जन्मलेले ‘नागेश्वर राव पंतुलू’ हे एक स्वातंत्र्य सेनानी, पत्रकार आणि राजकारणी व्यक्ती होते. त्यांचं मुख्य कार्यक्षेत्र आंध्रप्रदेश होतं. महात्मा गांधींच्यासोबत त्यांनी मीठाच्या सत्याग्रहात देखील भाग घेतला होता. त्यांच्या देशभक्तीमुळे आंध्रप्रदेशात त्यांना ‘देशबंधू’ म्हणून ओळखलं जायचं.


अमृतांजनचा जन्म


स्रोत

नागेश्वर राव उमेदीच्या काळात असताना त्यांनी मद्रास (आत्ताचा आंध्रप्रदेश) मध्ये काहीकाळ व्यवसाय केला. पण काही अडचणींमुळे त्यांना कलकत्त्याला जावं लागलं. कलकत्त्यावरून त्यांनी मुंबई गाठली ते ऑफिसमध्ये काम करण्यासाठी.  पण स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. १८९३ साली त्यांनी अमृतांजन लिमिटेड नावाने आपल्या नव्या व्यवसायाची सुरुवात केली. 

अवघ्या काही काळात अमृतांजन एक औषधी मलम म्हणून लोकांमध्ये प्रसिद्ध झालं. याच अमृतांजनने नागेश्वर राव यांची वणवण थांबवली आणि त्यांना कोट्याधीश केलं. असं म्हणतात की नागेश्वर राव गाण्याच्या मैफलीत अमृतांजन मोफत वाटायचे.


नागेश्वर राव यांच्या स्मृतीत काढलेले पोस्टाचे तिकीट (स्रोत)


अमृतांजनच्या निर्मितीनंतर नागेश्वर राव  भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय झाले. त्यावेळच्या मद्रासमधून तेलगू भाषिक वेगळे राज्य तयार करण्याच्या मागणीत ते अग्रणी होते. पुढे यातूनच आंध्रप्रदेशची निर्मिती झाली. त्यांनी आंध्रपत्रिका नामक वृत्तपत्राची सुरुवात देखील केली होती.

नागेश्वर राव यांचा १९३८ साली मृत्यू झाला. त्यांच्यानंतर त्यांचे जावई आणि इतर नातेवाईकांनी अमृतांजन कंपनी जिवंत ठेवली. इतकंच नाही तर अमृतांजन पूर्वीपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं.

२००७ साली अमृतांजन लिमिटेडचं नाव बदलून ‘अमृतांजन हेल्थकेअर’ झालं आहे. कंपनीला १२४ वर्ष पूर्ण होऊन देखील अमृतांजनची काचेची डबी भारतीय कधीच विसरणार नाहीत.

 

©बोभाटा

सबस्क्राईब करा

* indicates required