computer

पेपराचे गठ्ठे उचलणारे मुरलीधर शिंगोटे आठ वृत्तपत्रांचे मालक कसे झाले याची प्रेरणादायक कथा!!

अगदी लहान वयात मुरलीधर शिंगोटे जुन्नरजवळच्या एका खेड्यातून मुंबईत पोट भरायला आले. हातात भांडवल नसलेल्या कोणत्याही माणसाला जो व्यवसाय करता येतो तो म्हणजे वर्तमानपत्र विकण्याचा! सकाळी शक्य तितक्या लवकर म्हणजे चाकरमान्यांची रस्त्यावर वर्दळ सुरू होण्या आधीच पेपरचे गठ्ठे उचलायचे आणि एक वाहत्या गर्दीचा कोपरा पकडून पेपर विकायचे. विकल्या पेपरचे पैसे मिळतात, तर न विकलेले परत देता येतात. थोडक्यात, १०० टक्के मेहेनतीचा हा धंदा शिंगोट्यांनी सुरू केला.

शेतकरी असल्याने मेहनत करणे हे त्यांना नवीन नव्हते. पण सोबत त्यांनी अक्कल हुशारीची जोड या धंद्याला दिली. त्यांच्यासारख्याच १०० मेहनती पोरांना त्यांनी पेपर लाईनमध्ये आणून स्वतःची एक मोठी सेल्स टीम उभी केली. या दरम्यान 'नवाकाळ' या वृत्तपत्राचे मालक निळकंठ खाडिलकर यांचे लक्ष मुरलीधर शिंगोटे यांच्याकडे गेले. नवाकाळचा खप वाढवण्यासाठी त्यांना असा माणूस हवाच होता. त्यांनी शिंगोट्यांना एजन्सी दिली. त्यांचा अंदाज योग्यच होता, थोड्याच दिवसात ‘नवाकाळ-अग्रलेखांचा बादशहा’चा खप पाच लाखाच्या वर गेला. शिंगोट्यांच्या टीममध्ये आता जवळजवळ 225 मुलं दाखल झाली होती. काम धुमधडाक्यात सुरू होते आणि असं काही घडलं, की निळकंठ खाडिलकर आणि मुरलीधर शिंगोटे यांची जोडी फुटली.

त्याचं झालं असं की, १९९४ दरम्यान कालनिर्णयच्या साळगावकरांनी नवा पेपर काढायचे ठरवले. नव्या पेपरला डिस्ट्रिब्युटरही तितक्याच दमाचा हवा म्हणून त्यांनी मुरलीधर शिंगोट्यांची निवड करून त्यांना एजन्सी दिली. ही बातमी नवाकाळच्या ऑफिसला पोहोचली आणि खाडीलकर संतापले. त्यांनी शिंगोट्यांची  नवाकाळची एजन्सी काढून घेतली. आता उपाय शिल्लकच नव्हता. 

दुर्दैव असे की काही महिन्यातच साळगावकरांचा पेपरही बंद पडला. नवाकाळ गेला आणि कालनिर्णय संपला. शिंगोटे आणि त्यांची २२५ लोकांच्या टीमवर बेरोजगार होण्याची वेळ आली. पण शिंगोटे परिस्थितीमुळे हार मानणारे नव्हतेच. त्यांच्या मूळ शेतकरी स्वभावातला चिवटपणा पुन्हा कामाला आला.

नवाकळच्या वितरणामुळे त्यांना जनतेच्या वाचनाची नस त्यांना नेमकी माहिती होती. अनेक वार्ताहर ओळखीचे होते. कागद पुरवठादार आणि प्रिंटरही जोडलेले होते. मुरलीधर शिंगोट्यांनी स्वतःचाच पेपर सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा नवा पेपर लोकसत्ता – मटा यांच्या वर्गात बसणारा पांढरपेशा पेपर नव्हता. हा खास ब्लु कॉलर पेपर म्हणजे श्रमजीवी जनतेला वाचायला आवडेल असा पेपर होता. आणि १ मे १९९४ रोजी 'मुंबई चौफेर'  आणि पुढच्या सहा महिन्यात आला 'आपला वार्ताहर'.!!

नवाकाळ वाचणारे आता वार्ताहरचे वाचक झाले. काहीच दिवसात वार्ताहरचा खप लाखात गेला आणि पाच लाखाचा नवाकाळ पन्नास हजाराला गेला.

यानंतर मुरलीधर शिंगोटेंनी मागे वळून बघितलेच नाही. त्यांनी श्रमजीवी वाचकांची नस घट्ट धरून ठेवली आणि त्यातून ‘यशोभूमी’ जन्माला आला. मुंबईत आलेल्या उत्तरप्रदेशी भय्याला त्याच्या गावाची बातमी द्यायला सुरुवात केली आणि प्रत्येक हिंदी भाषिकांच्या हातात 'यसोभूम' दिसायला लागला. हेच तंत्र त्यांनी कर्नाटकातून मुंबईत आलेल्या हॉटेल कामगारांवर वापरले आणि थोड्याच दिवसात उडुपी अण्णाच्या हातात 'कर्नाटक मल्ला' दिसायला लागला.

यानंतर ज्याला आज आपण इन्फोटेन्मेंट म्हणतो, त्या क्षेत्रातला माहिती ज्ञान मनोरंजनाचा मिलाप असलेला ‘पुण्यनगरी’ सुरू झाला.

आता एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा, इतके सगळे पेपर छापणारे मुरलीधर शिंगोटे स्वतः मात्र अंगठाबहादूर होते. त्यांना सही करण्यापलीकडे काहीही येत नव्हते. पण त्यांचे मॅनेजमेंटचे तंत्र हे दहा डिग्ऱ्यांच्या बरोबरचे होते.

इतकी वर्षे या क्षेत्रावर राहून मुरलीधर शिंगोटे यांचे पाय कायम जमिनीवर घट्ट रोवलेले होते. वार्धक्याने नाईलाज होईपर्यंत रोज वृत्तपत्राच्या दैनंदिन कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. त्यामुळे त्यांना सगळेच ओळखायचे आणि आपुलकीने 'बाबा शिंगोटे' असे संबोधायचे!

वयाच्या ८४ वर्षी ६ ऑगस्ट २०२०ला मुरलीधर शिंगोटे यांचं निधन झाले। बोभाटातर्फे विनम्र श्रध्दांजली!

सबस्क्राईब करा

* indicates required